मुंबई : भारतीय पौराणिक महाकाव्य महाभारत यावर भव्य चित्रपट बनवण्याचं स्वप्न अनेक दिग्दर्शकांनी पाहिलं आहे. मात्र आजवर कुणीही ते साकार करू शकलं नाही. आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी स्वतःच महाभारत साकारण्याची अधिकृत घोषणा केली असून, यामुळे सोशल मीडियावर एस. एस. राजामौली यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
महाभारतबद्दल आमिर खानचं मोठं वक्तव्य
The Hollywood Reporter India ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ते महाभारतवर आधारित एक भव्य चित्रपट मालिका (फ्रँचायझी) तयार करत आहेत आणि त्यावर यंदाचं वर्षभरात काम सुरू होईल. "हे माझं आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न आहे," असं सांगत त्यांनी लेखन प्रक्रियेलाच अनेक वर्षं लागतील, असंही कबूल केलं.
ते स्वतः यात अभिनय करणार का, यावर त्यांनी अद्याप स्पष्ट मत दिलं नाही. मात्र, या भव्य प्रकल्पासाठी Lord of the Rings प्रमाणे एकाच वेळी वेगवेगळ्या युनिट्सवर चित्रीकरण करण्याची योजना असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे कदाचित एकापेक्षा अधिक दिग्दर्शकांची गरज भासू शकते.
२०१८ मध्येच आमिर खान यांनी प्रथमच महाभारत साकारण्याचा आपला मनसुबा जाहीर केला होता. तेव्हा या चित्रपटाचा अंदाजे बजेट १००० कोटींपेक्षा अधिक असेल, अशी चर्चा होती. मात्र २०२२ मध्ये लाल सिंग चड्ढाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी सांगितलं होतं की, "महाभारत म्हणजे केवळ चित्रपट नाही, ती एक यज्ञक्रीया आहे. मला वाटतं मी अजून त्यासाठी तयार नाही. महाभारत आपल्याला कधीच फसवणार नाही, पण आपण महाभारतला फसवू शकतो."
एस. एस. राजामौली आणि महाभारत – एक स्वप्न
दुसरीकडे, एस. एस. राजामौली यांनी अनेक वेळा सांगितलं आहे की महाभारत हा त्यांचा अंतिम आणि स्वप्नवत प्रोजेक्ट असेल. RRRच्या यशानंतर त्यांनी एका चर्चेत सांगितलं, "देशभरात उपलब्ध असलेल्या सर्व महाभारताच्या आवृत्त्या वाचायला मला एक वर्ष लागेल. आणि त्यानंतर कदाचित मला १० भागांची मालिका करावी लागेल."
नेटिझन्सचं मत – कोण योग्य उमेदवार?
आमिर खान यांनी अधिकृत घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही बाजूंचे समर्थक सक्रिय झाले. राजामौलींच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, “आमच्या आवडत्या दिग्दर्शकाचं स्वप्न दुसऱ्याने पूर्ण केलं, आणि त्यात राजामौलींचाच सहभाग नाही,” अशा प्रतिक्रियांनी इंटरनेट भरलं आहे.
बाहुबली आणि RRRसारख्या यशस्वी ऐतिहासिक चित्रपटांनी सिद्ध झालं आहे की, राजामौली हेच या महाकाव्याला योग्य न्याय देऊ शकतील, असं अनेकांचं मत आहे. तर मग... महाभारत साकारायचं स्वप्न कोणी पूर्ण करावं? आमिर खान की एस. एस. राजामौली? हे आता प्रेक्षकच ठरवतील!
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.