वाखान:एक भू-राजकीय रणभूमी

    22-Apr-2025
Total Views |

Wakhan A geopolitical battleground 
 
अफगाणिस्तानातील वाखान या भागामध्ये व्यापारी उद्देशाने चीन आपली पकड मजबूत करत आहे. अर्थात, यामुळे मध्य आशियामध्ये प्रवेश करणे चीनला सहज साध्य होईल. याच भागाबाबत भारत, अमेरिका आणि रशिया या जगातील शक्तींचे हितही लपले आहे. त्यामुळे सध्या वाखान प्रांताला भू-राजकीय रणभूमीचे स्वरूप आले आहे.
 
खान कॉरिडोर हा अफगाणिस्तानच्या उत्तरेतील एक संकुचित भूभाग, आज जागतिक राजकारणात महत्त्वाची रणभूमी बनला आहे. चीन, पाकिस्तान आणि मध्य आशियाच्या इतर देशांशी त्याची भौगोलिक जोडणी, यामुळे वाखान कॉरिडोर एक महत्त्वाचा सामरिक दुवा झाला आहे. तालिबानच्या सत्ता स्थापनेनंतर चीनने अफगाणिस्तानमधील या क्षेत्रावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे याचे सामरिक महत्त्व आणखीच वाढले. याच भागातून चीनला शिनजियांग प्रांतापासून मध्य आशियाच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळू शकतो. त्यामुळेच भारतासाठी, वाखान कॉरिडोर एक संवेदनशील मुद्दा आहे.
 
कारण, त्याचा सामरिक व आर्थिक हितावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे वाखान कॉरिडोरच्या भविष्यावर जागतिक शक्तींचे सामरिक हित आणि प्रतिस्पर्धा निश्चित होणार आहे.
 
वाखान कॉरिडोर - नवी संघर्षभूमी?
 
वाखान कॉरिडोर, आज एक नवी भू-राजकीय रणभूमी बनू पाहत आहे. ज्याकडे चीन, तालिबान, भारत, अमेरिका आणि रशिया यांसारख्या प्रमुख शक्ती, सामरिक आणि आर्थिक हितसंबंधांच्या दृष्टीने लक्ष ठेवून आहेत. तसेच, आवश्यक हस्तक्षेपही करत आहेत. वाखान कॉरिडोर हा अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील एक चिंचोळा भाग. त्याच्या ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्वामुळे जगाच्या राजकारणामध्ये, नवा मुद्दा उपस्थित झाला आहे. तालिबानच्या अफगाणिस्तानवरील कब्जामुळे, वाखान कॉरिडोरमध्ये चीन आणि तालिबान यांच्यातील सहकार्य सुरू झालेे. मात्र, याच्या आड अनेक संघर्ष, विरोध आणि अस्वस्थतेचे बीज दडलेले आहेत. हे संघर्ष केवळ या दोन देशांच्या मर्यादेत न राहता, त्याचा प्रभाव व्यापक पातळीवर जाणवतो.
 
चीनने अफगाणिस्तानमध्ये स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी वाखान कॉरिडोरचा वापर सुरू केला. चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुस्लिमांवरील दडपशाहीमुळे तणाव निर्माण झाला आणि अफगाणिस्तानच्या वाखान कॉरिडोरमधून, हा दबाव टाळण्याची एक संधी मिळाली. चीनने अफगाणिस्तानसाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा केली असून, ज्यामध्ये सुमारे 60 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत चीन आहे. यामुळे वाखान कॉरिडोरला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. तालिबानच्या कट्टरपंथी धोरणांना, चीनची सत्ता व स्थिरता आवश्यक आहे. परंतु, तालिबानच्या नेत्यांची धार्मिक व राष्ट्रीय निष्ठा, चीनच्या वाढत्या दबावासोबत संघर्ष करू शकते. विशेषतः चीनच्या उइघुर मुस्लिमांबाबतच्या धोरणांमुळे, तालिबान आणि चीनमधील संबंध अत्यंत जटिल होऊ शकतात. याचे परिणाम चीन आणि अफगाणिस्तानच्या सीमापलीकडे जाऊ शकतात आणि यामुळेच, भारतासाठी एक मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
 
वाखान कॉरिडोरबाबत अमेरिका आणि रशिया यांचा दृष्टिकोन, परस्परांपासून भिन्न आहे. अमेरिकेचा दृष्टिकोन वाखान कॉरिडोरच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे. अफगाणिस्तानमधून आपल्या सैन्याला माघारी घेतल्यानंतर, अमेरिका अधिकाधिक त्याच्या स्थायिक धोरणावर काम करत आहे. अफगाणिस्तानच्या आंतरिक राजकारणावर प्रभाव असतानाही, अमेरिकेची प्राथमिकता आता त्याच्या आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनात सुसंगतता साधण्यासाठी व इतर क्षेत्रीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे ही आहे. वाखान कॉरिडोरमधून चीनच्या प्रभावामुळे अमेरिका चिंतेत आहे. कारण, अफगाणिस्तानमध्ये चीनने आपली पायवाट मजबूत केल्यास, चीनला मध्य आशियामध्ये रणनीतिक संधीचा लाभ होऊ शकतो. म्हणूनच याच्या विरोधात अमेरिकेने, धोरणात्मक पाठिंबा देण्याची सुरुवात केली आहे. तथापि, अफगाणिस्तानमधील या बदलांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिका हा नवे सामरिक सामर्थ्य वापरण्याचा विचार करत आहे. विशेषतः रशिया आणि चीन यांच्याशी असलेल्या प्रतिस्पर्धेत, अमेरिका आपल्या स्थानिक प्रभावाचा विस्तार आणि जागतिक सामर्थ्याच्या पुननिर्माणासाठी पाऊले उचलण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची धोरणे तेच सांगतात.
 
रशियाच्या दृष्टिकोनातून वाखान कॉरिडोर अधिक चिंताजनक आहे. सोव्हिएत काळात, रशियाने अफगाणिस्तानमध्ये आपला प्रभाव राखला होता आणि आजही मध्य आशियामध्ये रशियाचे सामरिक हितसंबंध कायम आहेत. वाखान कॉरिडोरचा उपयोग करून चीनला अफगाणिस्तानमध्ये धोका निर्माण होऊ शकतो आणि यामुळे, रशियाचा दबावही निर्माण होईल. रशिया त्याच्या ऐतिहासिक भागीदार असलेल्या तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान आणि इराणसह, मध्य आशियातील वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करत आहे. रशिया अफगाणिस्तानमध्ये, शांततेचे वातावरण निर्माण करणे आवश्यक मानतो. परंतु, वाखान कॉरिडोरच्या संदर्भात चीनच्या वाढत्या महत्त्चामुळे, रशियाला त्याच्या रणनीतिक योजनेत अडथळे येऊ शकतात. रशिया कदाचित मध्य आशियामध्ये चीनच्या प्रभावाचा विरोध करेल, तसेच तालिबानच्या प्रभावी भूमिका निर्माण होण्यापूर्वी, अफगाणिस्तानमध्ये राजकीय स्थिरतेसाठी अधिक दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतो.
 
भारतासाठीही वाखान कॉरिडोर आणि त्याभोवती बदलणार्‍या सामरिक समीकरणाचा विषय, अत्यंत महत्त्वाचा ठरतो. वाखान कॉरिडोरच्या माध्यमातून, चीनने अफगाणिस्तानच्या सीमारेषांवर आपली पकड मजबूत केली आहे. यामुळे भारताच्या कनेक्टिव्हिटी आणि व्यापारी मार्गावर दबाव वाढला आहे. वाखान कॉरिडोरमधून चीनला आर्थिक, ऊर्जा आणि संसाधनांचा फायदा मिळू शकतो, जो भारतविरोधी ठरेल. भारताने अफगाणिस्तानमध्ये आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी, त्याच्या मध्य आशियामधील संबंधांना प्राधान्य द्यायला हवे. तसेच, इराण आणि रशियाशी अधिक सहकार्य करणे आवश्यक आहे, ज्यामुळे वाखान कॉरिडोरवरील चिनी प्रभाव कमी करता येईल. भारताच्या दृष्टिकोनातून वाखान कॉरिडोरच्या संदर्भातील अमेरिका आणि रशिया यांचे दृष्टिकोन धोकादायक असू शकतात. त्यामुळे त्यावर संतुलित व सुसंगत धोरण आखणे आवश्यक आहे.
 
वाखान कॉरिडोरमधील युद्धाशिवाय सुरू असलेली रणनीतिक स्पर्धा, चीन आणि तालिबानमधील संबंधांची गडबड व भारताच्या सामरिक शक्तीचे महत्त्व वाढवते. अमेरिका आणि रशिया यांचा हस्तक्षेप, वाखानच्या भविष्यावर परिणाम करणारा आहे. जागतिक शक्तींच्या परिप्रेक्षात भारताने आपला धोरणात्मक दृष्टिकोन निश्चित करत, या नवीन जागतिक सत्तांमधील संधी व आव्हानांचा सामना करण्याची गरज आहे.