पाटणा : ( Kharge expelled district president because chairs remained empty during rally ) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या रॅलीत गर्दी जमलीच नाही त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांसमोर त्यांना भाषण आटपावे लागले. याचा राग मनात ठेवत त्यांनी बिहारच्या बक्सरचे जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज पांडे यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.
याबद्दल काँग्रेसने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, जिल्हाध्यक्ष पांडे यांनी कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय साधला नाही, म्हणूनच खरगेंची रॅली फोल ठरली. जिल्हाध्यक्ष पांडेवर कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केल्याचा आणि योग्यरित्या काम न केल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. खरगेंच्या रॅलीत गर्दी जमली नाही म्हणून ते चांगलेच संतापले होते.
याच कार्यक्रमातील एका व्हायरल व्हिडिओत लाल खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसत आहे. शनिवार, दि. १९ एप्रिल रोजी झालेल्या या रॅलीत मल्लिकार्जून खरगे यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष, भाजपवर व जेडीयू जोरदार टीका केली, परंतु त्यांचे ऐकण्यासाठी गर्दी जमलीच नाही. खरगे म्हणाले की, “राहुल आणि प्रियांका गांधी कुणला घाबरणारे नाहीत.” मुख्यमंत्री नितीश कुमारांवर खुर्चीसाठी बाजू बदलल्याचा आरोपही खरगेंनी केला.
पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकातील माहीतीनुसार, दलसागर क्रीडा मैदानावर झालेल्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्या रॅलीत तयारी आणि समन्वयाचा अभाव होता. कारण जिल्हा काँग्रेस समितीने आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली नाही. असा आरोप काँग्रेस पक्षाचे कार्यालय सचिव उमेश प्रसाद सिंह यांनी एका परिपत्रकाद्वारे केला आहे. ज्याच्या प्रती पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि पक्षाचे राज्यातील प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. अलिकडेच काँग्रेसने सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे.
काँग्रेस पक्षाचे माध्यम प्रमुख राजेश राठोड म्हणाले की, “निष्काळजीपणासाठी आणखी अनेक लोकांवर कारवाई केली जाईल.” त्यांनी सांगितले की, “कार्यक्रम संपल्यानंतर अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही जिल्हाध्यक्षांनी चांगले काम केले नसल्याची खंत व्यक्त केली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशावरुन जिल्हाध्यक्षांना काँग्रेसचे बिहार प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांनी निलंबित केले आहे. दुसरे एक प्रमुख कारण म्हणजे बिहारच्या काँग्रेस पक्षाचा केडर जवळजवळ मृतावस्थेत आहे. कन्हैया कुमारच्या भेटीद्वारे ते पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू तो प्रयोगही खरगेंच्या रॅली प्रमाणे अयशस्वी ठरला.