Pope Election Process : रोमन कॅथलिक चर्चचे ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हॅटिकनने दिलेल्या व्हिडिओ संदेशातून त्यांच्या निधनाचे बातमी देण्यात आली आहे. पोप फ्रान्सिस यांच्यावर गेल्या बऱ्याच काळापासून उपचार सुरु होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील जेमेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती आधी ढासळली होती पण नंतर हळूहळू त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आज सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आजारपणादरम्यान ते पदाचा राजीनाम्याविषयी आणि पुढील उत्तराधिकारी कोण असणार याबाबत सर्वत्र चर्चा होत्या. मात्र आता त्यांच्या निधनानंतर खरंच त्यांच्या जागी कोण पोपपदी निवडून येणार, या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. मात्र, नवीन पोपची निवड कशी केली जाते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून घ्या पद्धत.
कशी केली जाते पोपची निवड?
पोप यांचा अकाली मृत्यू किंवा कोणत्याही कारणास्तव पदावरून राजीनामा दिल्यास नवीन पोपची निवड केली जाते. कॅथलिक परंपरेनुसार, ’पोप कॉन्क्लेव्ह’च्या माध्यमातून नवे पोप निवडले जातात. पोप पदासाठीचा उमेदवार हा स्त्री नव्हे, तर पुरुषच असावा लागतो. कॅथलिक चर्चमधील सर्वोच्च दर्जाचे पादरी ज्यांना ‘कार्डिनल’ म्हणून ओळखले जाते, ते नव्या पोपची निवड करतात. नवीन पोप निवडण्यासाठी हे कार्डिनल, अनेक बैठका घेतात. व्हॅटिकन सिटीच्या ‘सिस्टिन चॅपल’मध्ये, नवीन पोपसाठी मतदान होते. यात ८० वर्षांखालील कार्डिनलना, मतदानाचा अधिकार असतो. मतदान आणि बैठकीची संपूर्ण प्रक्रिया गुप्त ठेवली जाते. विशेष म्हणजे, या काळात कार्डिनल्सना बाहेरील जगाशी संपर्क ठेवण्याची कुठलीच परवानगी नसते. हे कार्डिनल मग गुप्त मतपत्रिकेद्वारे मतदान करतात. मतदानाच्या दिवशी सकाळी सुरुवातीला, १२० कार्डिनल्स सिस्टिन चॅपलमध्ये एकत्र जमतात. हे कार्डिनल गोपनीयतेची शपथ घेतात, नवीन पोपची निवड होईपर्यंत स्वतःला कॉन्क्लेव्हमध्येच बंदिस्त करतात. मतदानाच्या पहिल्या दिवशी, नवा पोप मिळेलच याची शाश्वती नसते.
पोप निवडीशी काळ्या आणि पांढऱ्या धूराचा काय संबंध?
निकाल जाहीर करण्यासाठी, तीन कार्डिनल नियुक्त केले जातात. हे कार्डिनल प्रत्येक मतपत्रिकेचे निकाल मोठ्याने वाचतात. कोणत्याही उमेदवाराला निर्धारित दोन तृतीयांश मते न मिळाल्यास, मतपत्रिका चुलीत पेटवली जाते. त्या अशा रसायनांद्वारे जाळल्या जातात की, त्यातून प्रचंड काळा धूर निघतो. याउलट एखाद्या उमेदवारास जेव्हा दोन तृतीयांश मते मिळतात, तेव्हा आधी त्याच्या विजयाबाबत जाहीर केले जात नाही. तत्पूर्वी कार्डिनल्स कॉलेजच्या डीनला विचारले जाते की, विजयी उमेदवार स्वीकारार्ह आहे की नाही? जर डीनने मान्य केले, तरच शेवटच्या फेरीत मतपत्रिका जाळल्या जातात. यावेळी मात्र त्या अशा रसायनांद्वारे जाळल्या जातात की, त्यातून पांढरा धूर निघतो. त्यामुळे बाहेरील जगाला कळते की, नवीन पोप निवडला गेला आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\