स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या मुंबई उपपीठातील शिरसाडच्या कार्यक्रमात हिंदूंकडून जोरदार स्वागत
21-Apr-2025
Total Views |
(Image - स्वामी नरेंद्राचार्य संस्थान, वसई)
मुंबई : देशात धर्मांतर आणि त्यावरून हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. मात्र, शुक्रवार, दि. १८ एप्रिल रोजी वसईतील ५०६ धर्मांतरित कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या मुंबई उपपीठातील शिरसाड येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल हिंदू समाजातून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल मानला जातो. येथील दुर्गम खेड्यापाड्यात रहिवास करणार्या या समाजात अद्यापही शिक्षण, पायाभूत सोयीसुविधा आणि बदलत्या जीवनशैलीचा अभाव दिसतो. यामुळे त्यांच्या भोळेपणाचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन वेगवेगळे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते.
हिंदूंना विविध आमिषे दाखवून भूलथापा देऊन त्यांच्या अज्ञानाचा, गरिबीचा गैरफायदा घेऊन सनातन हिंदू धर्माबाबत अपप्रचार करून आणि अनेकदा धमकावून त्यांचे धर्मांतरण करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे सनातन हिंदू धर्माची मोठी हानी झालेली आहे. मात्र, अशा धर्मांतर केलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले जात आहे. या कुटुंबांना पुन्हा विधिवत धर्मप्रवेश देण्याचे महाअभियान जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जात आहे.
शिरसाड (वसई) येथे शुक्रवार, दि. १८ एप्रिल रोजी असाच एक सोहळा संपन्न झाला. यावेळी ५०६ कुटुंबांनी स्वधर्मात प्रवेश केला. याअंतर्गत आतापर्यंत १ लाख, ५१ हजार, २७८ जणांना पुन्हा हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे.
धर्मांतर करून पूर्वीची उपासनापद्धती सुरू
“मिशनरी वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून हिंदू धर्मीय लोकांचा बाप्तिस्मा करतात. त्यांचे धर्मांतर करून घेतात. मात्र, त्यांचे मूळचे नाव बदलत नाहीत. ज्या लोकांना हिंदू धर्मातील उपासनापद्धती बदलल्यामुळे अपराधी वाटत होते, ते आम्हाला येऊन भेटले. म्हणून आम्ही त्यांना पूर्वीची उपासनापद्धती सुरू करून दिली आहे,” अशी माहिती जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी दिली.
विधिवत धर्मामध्ये प्रवेश
या कार्यक्रमासाठी पालघरचे खा. डॉ. हेमंत सावरा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रमेश ओझे उपस्थित होते. या सोहळ्यात पालघर, नाशिक, गुजरातमधील धर्मांतरित कुटुंबांना विधिवत हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. तीन तास हा विधी सुरू होता. त्यात गोमाता पूजन, होम हवन असे विधी झाले. या सर्व बांधवांना जगद्गुरूंनी शपथ दिली. त्यानंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.