वसुंधरा सप्ताह साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

    21-Apr-2025
Total Views |
world earth day



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी असलेल्या 'जागतिक वसुंधरा दिना'च्या निमित्ताने वसुंधरा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे (world earth day). २२ एप्रिल ते १ मे या कालावधीत स्वच्छता, प्लास्टिकमुक्ती, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, पाण्याचा पुनर्वापर, हरित उर्जा आणि रिड्यूस-रियूज-रिसायकल यांचा अंगीकार करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. (world earth day)
 
 
जगभरात दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग देखील या दिनाच्या पार्श्वभूमीवर काही विशेष अभियानाचे आयोजन करत असतो. यंदा विभागाकडून वसुंधरा सप्ताह साजरा केला जाणार आहे. २२ एप्रिल ते १ मे या कालावधीत हा सप्ताह पार पडेल. या सप्ताहात नागरिकांनी काही पर्यावरण पूरक जीवनशैली दैनंदिन जीवनात अंमलात आणण्याचे आवाहन विभागाने केले आहे. यामध्ये स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर न करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रित करणे, पाण्याचा पुनर्वापर करणे आणि हरित उर्जेला प्रोत्साहन देण्यासारख्या उपायांचा समावेश आहे.
 
 
या सत्पाहाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे की, "पर्यावरण हा सर्वांच्या जिव्हाळाचा आणि काळजीचा विषय आहे. जागतिक स्तरावर हा विषय फार गांभिर्याने घेतला जात आहे. शाश्वत विकासाच्या संकल्पनेत पर्यावरणाचा समतोल राखणे, ही आता आपली सर्वाची जबाबदारी आहे. महाराष्ट्राचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग वसुंधरा दिनाच्या निमित्ताने विशेष अभियान राबवत आहे. या अभियानात आपण सर्वांनी परिसर, नदी आणि तलावांची स्वच्छता, प्लास्टिक न वापरण्याचा निर्धार, ध्वनी प्रदूषण टाळण्याचा संकल्प, पाण्याचा पुनर्वापर, हरित उर्जेचा वापर आणि रिड्यूस-रियूज-रिसायकल या त्रिसूत्रीचा अवलंब करुन, आपण यात सहभागी होऊ शकतो. आपण सर्वांनी या अभियानाला प्रतिसाद देऊन यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे."