...म्हणून घेतला बदलाचा निर्णय! संग्राम थोपटेंनी सांगितलं पक्ष सोडण्यामागचं कारण

    21-Apr-2025
Total Views |

Sangram Thopte 
 
मुंबई : काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, वर्षानुवर्षे भोर विधानसभा मतदारसंघावर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या संग्राम थोपटे यांनी अचानक हा निर्णय का घेतला? याबद्दल त्यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे.
 
संग्राम थोपटे म्हणाले की, "माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली. २००९ साली मी पहिल्यांदा या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो. पक्षाने मला उमेदवारी दिली आणि जनतेने कौल दिला. त्यानंतर २०१४ साली पुन्हा एकदा जनतेने मला निवडून दिले. २०१९ ला महाविकास आघाडीते सरकार सत्तेत आले. त्यावेळी काँग्रेसच्या वाट्याला १२ मंत्रीपदे आली. पुण्यालाही मंत्रीपद मिळेल आणि त्यासाठी मला संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना होती. पण मला तिथे संधी मिळाली नाही. पुढे दोन वर्षांनंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आतातरी आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. यासाठी मी सातत्याने पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात होतो. परंतू, त्यावेळीही मला संधी मिळाली नाही. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी आशा होती पण तेसुद्धा मिळाले नाही."
 
 
"पुण्यासारख्या जिल्ह्यात सलग तीनवेळा निवडून येऊनही पक्षाकडून राजकीयदृष्ट्या ताकद दिली जात नाही. त्यामुळे या तालुक्यात विकासकामांना अधिकचे झुकते माप मिळावे यासाठी बदलाचा निर्णय घ्यावा, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. शेवटी भोर तालुक्याच्या भवितव्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे," असे संग्राम थोपटे यांनी सांगितले आहे. दरम्यान, येत्या २२ एप्रिल रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.