नाशिकमधील ज्येष्ठ स्वयंसेवक अशोक अमृतकर यांचे वयाच्या 71व्या वर्षी दि. 11 एप्रिल रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा हा लेख...
नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील योगविद्याधाम जवळ गेली अनेक वर्षे नियमित चालत आलेली टिळकप्रभात शाखा. आता या शाळेच्या मैदानावर, अशोक अमृतकर बाकी म्हणून दिसणार नाहीत. दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान अशोकराव अमृतकर यांच्या पार्थिवाने या संघस्थानाचा अंतिम निरोप घेतला. संघस्थानाजवळून ही अंत्ययात्रा जात होती. हे संघटन व अशोक अमृतकर यांचे अविभाज्य असे संघनिष्ठेचे नाते होते.
डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. खूप वेळा संघ कार्यकर्ते, स्वयंसेवक, प्रचारक, संघाचे पदाधिकारी यांना अशोकरावांच्या घरी जाण्याचे योग येत असे. गृहप्रवेश करण्याअगोदर घराच्या भिंतीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा व त्यांच्या अमर कवितेच्या ओळी, ‘हे मातृभूमी, तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण’ यांचे दर्शन होत असे. तुम्ही गृहप्रवेश करतानाच घरात प्रवेशद्वारावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा व त्यांच्या चिरंजीव देशभक्तीची आठवण करून देणार्या ओळी. मला असे वाटते, हे फारच दुर्मीळ उदाहरण. येथेच अशोकराव यांची विचारांची बैठक व दृढ श्रद्धा,निष्ठा यांचे दर्शन होते.
घरात आल्यानंतर येणार्याचे मनःपूर्वक, आपुलकीने स्वागत होत असे. औपचारिकता राहत नसे. हे सर्व कुटुंब संघविचारांमुळे स्वयंसेवक आहेतच; पण त्यांच्या पत्नी हेमाताई अमृतकर या राष्ट्र सेविका समितीच्या गेल्या अनेक वर्षांपासून पदाधिकारीही आहेत. दोन्ही मुले हितेश व कल्पेशही हे संघकामात सक्रिय आहेत. अशोकराव यांच्या घरात जेव्हा केव्हा संघ स्वयंसेवक एकत्र येत असत, तेव्हा एकमेकांची चेष्टा करणे, आपुलकी, अनौपचारिकता यांमुळे संघकामाच्या चर्चेत खूप आनंद व प्रसन्नता वाटे. घरात मोठे देवघर, त्यात असलेले पू. निर्मलामाता यांचे भव्य चित्र. अशावेळी तुमचे हात नमस्कारासाठी आपसूकच जोडले जातात.
दैनंदिन शाखेत अशोकराव शाखा घेणे, शाखेतील कार्यक्रम, प्रार्थना पूर्ण होऊन संघ शाखा विसर्जित होईपर्यंत सर्व गोष्टी बघत. शाखेतील सर्व गोष्टी संघाच्या पद्धतीने काटेकोर होण्याचा दृष्टिकोन अशोकरावांचा असे. पण, शाखा सुटल्यावर जेव्हा आम्ही एकत्र निघत असू, तेव्हा शाखेचे एक वेगळ्या स्वरूपाचे दर्शन होत असे व त्यांचे मुख्य कारण म्हणजे, अशोकरावांची मैत्रीपूर्ण चेष्टा, विनोद होय. अनेक वेळा एकत्र चहा-भजी, मिसळ, पोहे खाणेही होत असे, त्याचवेळी शाखेच्या कामाची चर्चाही हसत-खेळत व्हायची. सर्वांना आनंद वाटणारे असे हे प्रसंग होते.
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यासारख्या ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेले अशोकराव, हे संघाचे अगदी तळागाळात काम करणारे कार्यकर्ते होते! स्वयंसेवकाच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी हजर राहणे, फोन करून संपर्क ठेवणे हा त्यांचा स्वभाव. शाखेत नवीन नवीन माणसे जोडली जावीत, असे त्यांना मनापासून वाटत असे. संघाचे सहाही उत्सव व इतर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडले जावेत, याचा अशोकराव अमृतकर यांचा आग्रह असे व त्यात त्यांचा पुढाकारही असायचाच. तसे ते चांगले व्यवस्थापकच!
अशोकराव यांच्याकडे नाशिक शहराच्या भांडाराची जबाबदारी असे. विजयादशमी, संघ शिबीर, संघ शिक्षा वर्ग यावेळी गणवेश विक्रीसाठी त्यांची भरपूर धावपळ असे. गणवेश विक्री करताना, त्यांचे विक्री कौशल्य उपयोगी येई. भांडार व्यवस्था वर्षानुवर्षे सांभाळल्यामुळे, शहरातील व जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवक त्यांना परिचित असत. कितीही कष्ट पडो, कितीही वेळ जाऊ देत, अशोकराव ही जबाबदारी न कंटाळता कधीही थोडेही निरुत्साही न होता, योग्य ती शिस्त पाळून निभावत असत. गेली कित्येक वर्षे अशोकराव ही जबाबदारी सांभाळत होते. येणार्या संघ शिक्षा वर्ग व शिबिरातील भांडार व्यवस्थेत आता सर्वांना अशोकराव न दिसणे, मोठे मानसिक अस्वस्थ करणारे तसेच भावनाविवश करणारे असेल.
पाटबंधारे खात्यातील सरकारी सेवेतून निवृत्तीनंतर, गेल्या कित्येक दिवसांपासून शंकराचार्य न्यासामधील संघ कार्यक्रम, भांडार कार्यालयात होणारे कार्यक्रम व व्यवस्थापन यांची जबाबदारी ते सांभाळत होते. संघ सहलीत अशोकराव फार चांगले व आपुलकीचे, सर्वांना आनंद देणारे वातावरण ठेवत असत. त्यामुळे सर्वांना सहलीचा आनंद नक्कीच वाटत असे. त्यांनी शाखेतील स्वयंसेवक व कुटुंबीयांच्या मिळून, अनेक सहली केल्या आहेत. अमृतकर यांचा नातेवाईक व समाजात मोठा संपर्क होता. त्यांच्या ओळखीचा परीघ विशाल होता. अमृतकर यांची फारशी काळजी वाटावी, अशी त्यांच्या तब्येतीची तक्रार नसे. पण, आजाराने अगदी गुपचूप दबा धरून त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला. फसगत झाली व संघाचे एक ज्येष्ठ स्वयंसेवक, क्रियाशील कार्यकर्ता, आपल्या उपस्थितीने सर्वांना आनंदी ठेवणारे अशोकराव अमृतकर यांनी दि. 11 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजता, आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला आणि टिळकप्रभात संघस्थानाला अखेरचा दंडवत घातला.
अशोकरावांसारखे संघाचे कार्यकर्ते व स्वयंसेवक हे संघकार्याचे खरे आधारस्तंभ आहेत. कै. अशोकराव पुंजा अमृतकर यांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली! श्रीराम!
अॅड. के. जी. कुलकर्णी
9822399031