अमेरिकेच्या व्यापार युद्धामुळे जागतिक स्तरावर उद्योगविश्व ढवळून निघाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा परिणाम, भांडवली बाजारामध्येही तत्काळ बघायला मिळाला. अनेक राष्ट्रांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच भविष्यात उद्योगविश्वाला कोणती नवी कलाटणी मिळणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. या बरोबर या व्यापारयुद्धाचा व्यापक परिणाम लक्षात घेणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये विचार करत असताना बर्याचदा चर्चेत न येणारा मुद्दा म्हणजे, या धोरणांचा कलाक्षेत्रावर होणारा दूरगामी परिणाम. व्यापार क्षेत्रातील बदलांची झळ इतर क्षेत्रांना बसणे ही गोष्ट जरी स्वाभाविक असली, तरीसुद्धा एका व्यापक दृष्टिकोनातून या परिणामांकडे बघणे आवश्यक आहे.
सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातकराच्या नव्या धोरणाचा परिणाम कलाविश्वावर होईल का? याविषयी साशंकता होती. या शंकेचे निरसनसुद्धा कोणी केल्याचे दिसून आले नाही. कायदेतज्ज्ञ निकोलस एम. ओ’डोनेल याविषयी भाष्य करताना म्हणाले की, सर्वसामान्यपणे चित्रे, शिल्प या सगळ्या गोष्टी आयातकरापासून मुक्त असतात. परंतु, ट्रम्प यांच्या नव्या शासनात काही गोष्टींमध्ये बदल झाला. आयातकराचे हे धोरण प्रचंड गुंतागुंतीचे आहे. अर्थातच अमेरिकेच्या कलाविश्वात याचे परिणाम लगेचच दिसून आले.
शिल्पकलेसाठी लागणारा पोर्सिलेन आणि अॅल्युमिनियमचा कच्चा माल, अमेरिकेतील कलाकार बाहेरच्या देशांमधून आयात करत असतात. करशुल्कातील वाढीमुळे, आता या वस्तूंच्या खरेदीवर संक्रांत आली आहे. अमेरिकेत बर्याच ठिकाणी, ऐतिहासिक वस्तूंचे कलाप्रदर्शन वर्षभर सुरू असते. या कलाप्रदर्शनालासुद्धा ट्रम्प यांच्या आयातकराची झळ बसली आहे. काही ठिकाणी ही प्रदर्शने स्थगित केली गेली, तर काही वस्तुसंग्रहालय आर्थिक गणिताची फेरमांडणी करत आहेत.
कलाविश्वाचा विचार केल्यास, कॅनडा या देशाला ट्रम्प यांच्या धोरणांचा जबर फटका बसला आहे. न्यूयॉर्कमध्ये भरणारे कलाप्रदर्शन अनेक कलाकारांसाठी, व्यवसायिकांसाठी हक्काचे दालन असते. टोरंटो येथील स्टीफन बगलर, गेली अनेक वर्षे या कलप्रदर्शनामध्ये सहभागी होत आहेत. परंतु, यावेळी मात्र आर्थिक घडी विस्कटल्यामुळे त्यांना अमेरिकेमध्ये आपली कला सादर करता येणार नाही. दुसर्या बाजूला कॅनडातील सुप्रसिद्ध कलादालन कुपरकोल इथल्या प्रतिनिधींनी माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली आहे की, आता ट्रम्प यांच्या या धोरणामुळे ते आपले लक्ष युरोपातील कलादानांकडे वळवणार आहेत. अमेरिकेमध्ये फ्लॉरेडासारख्या ठिकाणी जिथे स्थानिक राजकारणामुळे प्रदर्शनात अडथळे येतात, तिथे अजून अडचणींचा सामना आम्ही करू इच्छित नाही.
अमेरिकेने सुरू केलेल्या या व्यापार युद्धामुळे कॅनडामध्ये, ’Buy Canadian’ नावाची त्यांची स्वदेशी चळवळ सुरू झाली. यामुळे अमेरिकेसोबत असलेल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांचा पुनर्विचार होताना आपल्याला दिसून येतो.
अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे, परस्परांमध्ये असलेले सांस्कृतिक संबंधसुद्धा ताणले गेले आहेत. अमेरिकेतल्या कलाकारांसाठी चीनमध्ये कलाप्रदर्शनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिला जाईल का? यावर शंका उपस्थित करण्यात आली.तसेच, दुसर्या बाजूला अमेरिकेतील करप्रणालीशी जुळवून घेत कलाप्रदर्शन भरवणे, आव्हानात्मक असल्याचे कलाकारांच्या नजरेस आले आहे.
कलाकार आणि त्यांचे कलाविश्व हे मुळातच स्वतंत्र असते. आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, तत्कालीन सरकारवर भाष्य करण्याचे काम ते करत असतात. ट्रम्प यांच्या आगमनानंतर, सांस्कृतिक पटलावर हा अवकाश कमी झाल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कला हा काही लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो तर, काही लोकांसाठी त्यांची कला हेच त्यांचे आयुष्य असते. त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातूनच त्यांचा उदरनिर्वाह सुरू असतो. जागतिक पातळीवर जेव्हा सामाजिक-राजकीय स्थित्यंतरे घडतात, तेव्हा संस्कृती, कलाविश्व यांवर त्याची आपसूकच छाप पडते. एकूणच जगासाठी आपले 21वे शतक, कमालीच्या बदलांनी भरलेले आहे. या परिवर्तनाचा वेगही तितकाच जास्त आहे. आता या स्थित्यंतरामध्ये, कलाविश्वाला त्याचे अवकाश मिळावे हीच आशा.