खेळ कोणताही असो त्याचे असणारे फायदे असंख्य असतात. खेळ माणसाला विविध गोष्टी शिकवतो. त्यामुळेच खेळाचा उपयोग जगभरात सद्भावना वृद्धीसाठी करण्यात येऊ लागला होता. त्याच अनुषंगाने आता जागतिक क्रीडा दिनही साजरा केला जातो. यावर्षीच्या क्रीडा दिनाचे औचित्य साधून शांततेच्या प्रसारात खेळाचे महत्त्व काय याचा घेतलेला आढावा...
स्थानिक, राज्य, राष्ट्रीय पातळीवरचे विविध क्रीडा दिन साजरे होताना जसे आपण बघत असतो, तसाच अजून एक क्रीडा दिन 2014 सालापासून, आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत आला आहे. 1896 साली झालेल्या पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक खेळांशी ऐतिहासिक दुवा निर्माण करून, 2013 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दि. 6 एप्रिल रोजीचा हा दिवस विकास आणि शांतीसाठी ‘आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून घोषित केला. त्यामुळे 2014 सालापासून तो दिवस दरवर्षी साजरा केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्त राष्ट्रांचे कायमस्वरूपी निरीक्षक म्हणून सामाजिक बदल आणि मानवी विकासात योगदान देण्यामध्ये, क्रीडा संघटनांच्या भूमिकेला मान्यता देताना, या उपक्रमाला प्रस्तावासहित समर्थन दिले.
1894 साली स्थापनेपासूनच विकास आणि शांततेला चालना देण्यासाठी खेळांचा आधार घेणे, हे ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’च्या ध्येयांपैकी एक ध्येय आहे. आधुनिक ऑलिम्पिक खेळांचे संस्थापक आणि ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’चे सह-संस्थापक पियरे डी कुबर्टिन यांनी, ऑलिम्पिकवादाचा वापर व्यक्ती आणि राष्ट्रांमध्ये कॅज्युअल सरावापासून ते स्पर्धात्मक खेळांपर्यंत सर्व स्तरांवर, सुसंवाद वाढविण्यासाठी करण्याची इच्छा स्पष्टपणे व्यक्त केली.
’एसडीजीं’मध्ये साहाय्यक म्हणून खेळाची भूमिका बळकट करण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’ने, ‘ऑलिम्पिझम 365’ हे धोरण सुरू केले. ‘ऑलिम्पिझम 365’ धोरणामुळे ऑलिम्पिक चळवळीच्या आतील आणि बाहेरील संघटनांशी सहयोग करता येत आहे जेणेकरून, 176 देशांमध्ये 550 सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रमांना पाठिंबा मिळेल. या सामूहिक कृतीद्वारे, ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’ लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहे. त्यांचे आरोग्य आणि जीवनमानदेखील सुधारत आहे, शिक्षणाचा प्रसारदेखील केला जात आहे. तसेच, वर्षातील 365 दिवस खेळाद्वारे अधिक समावेशक आणि शांततापूर्ण समाज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या उपक्रमांचा प्रभाव दि. 3 ते दि. 5 जून रोजी दरम्यान, स्वित्झर्लंडमधील लॉसाने येथे होणार्या ‘ऑलिम्पिझम 365’ शिखर परिषदेतील चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. चांगल्या जगासाठी खेळ ही यावेळेची या परिषदेची संकल्पना आहे.
‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमादरम्यान, ऑलिम्पिक चळवळ, संयुक्त राष्ट्रांच्या संस्था, विकास आणि वित्तपुरवठा संस्था, नागरी समाज आणि विविध व्यवसायांचे प्रतिनिधी सर्वोत्तम पद्धती सामायिक करतील, या धोरणात्मक कार्याचा होणार्या सामूहिक परिणामावरही चर्चा होईल आणि गुंतवणूकीच्या नवीन संधींचाही शोध घेतला जाईल.
2015 साली क्रीडा आणि ऑलिम्पिक चळवळीसाठी एका ऐतिहासिक क्षणी, खेळाला अधिकृतपणे शाश्वत विकासाचा महत्त्वाचा समर्थक म्हणून मान्यता देण्यात आली. तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांमध्येही त्याचा समावेश करण्यात आला. 2024 साली शाश्वत विकासाचा समर्थक म्हणून, ‘खेळ’ या शीर्षकाचा ठराव सर्व 193 संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यांनी एकमताने मंजूर केला. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावात हे मान्य केले आहे की, अपंग व्यक्ती आणि दुर्मीळ आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी खेळासह, शांतता आणि विकास, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, लिंग समानता, महिला सक्षमीकरण, मानवी हक्कांचा आदर, वंशवाद आणि वांशिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात खेळाची महत्त्वाची भूमिका आहे. दि. 25 जुलै 2024 रोजी पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक खेळांच्या पूर्वसंध्येला, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’चे अध्यक्ष थॉमस बाख यांच्या प्रेरणेने एक अभूतपूर्व शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. पहिली ‘स्पोर्ट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट शिखर परिषद’ ही, या विषयावर आयोजित केलेली आतापर्यंतची सर्वांत मोठी बैठक होती. यामध्ये अनेक संघटनांनी 2030 पर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या ‘एसडीजीं’मध्ये खेळाचे योगदान वाढवण्यासाठी, अभूतपूर्व चळवळ सुरू केली. या संदर्भात ‘आयडीएसडीपी’ सुरक्षित, शाश्वत, समावेशक क्रीडा सहभाग आणि संबंधित पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणुकीचे समर्थन करण्यासाठी, एक महत्त्वाचे व्यासपीठ प्रदान करते.
शांततापूर्ण आणि समावेशक समाजांना प्रोत्साहन देणे, ‘आयडीएसडीपी’ खेळाडू आणि संपूर्ण ऑलिम्पिक चळवळ, खेळाद्वारे शांततापूर्ण समाजात कसे सक्रियपणे योगदान देतात हे दाखविण्याचा एक क्षणदेखील प्रदान करते. या वचनबद्धतेचा सर्वांत स्पष्ट पुरावा म्हणजे, ऑलिम्पिक खेळ जे 206 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या आणि आओसी निर्वासित ऑलिम्पिक संघातील खेळाडूंना एकत्र आणतात. ऑलिम्पिक खेळांमध्ये, खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करतात, तर ऑलिम्पिक गावात एकाच छताखाली शांततेनेही एकत्र राहतात.
2006 सालच्या टोरिनोपासून ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये ‘ऑलिम्पिक ट्रस म्युरल’चा समावेश आहे, जो शांतता प्रस्थापित करण्याच्या खेळाच्या क्षमतेचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. जगभरातील खेळाडूंना शांती, आदर, एकता, समावेश आणि समानता या मूल्यांना पाठिंबा देण्याची एक अनोखी संधी देतो. ‘ऑलिम्पिक ट्रस म्युरल’ संयुक्त राष्ट्रांच्या ऑलिम्पिक विश्वासाच्या ठरावाचे, दृश्य प्रतिनिधित्व म्हणूनदेखील काम करते. जे सर्व राष्ट्रांना शत्रुत्व थांबवण्याचे आणि खेळांदरम्यान ऑलिम्पिक विश्वास पाळण्याचे आवाहन करते.
आंतरराष्ट्रीय दिवस आणि आठवडे, हे जनतेला महत्त्वाच्या मुद्द्यांवर साक्षर करण्यासाठी, जागतिक समस्या सोडवण्यासाठी, राजकीय इच्छाशक्ती आणि संसाधने एकत्रित करण्यासाठी, मानवतेचा संदेश देण्यासाठी असतात. आंतरराष्ट्रीय दिवसांचे अस्तित्व संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपूर्वीपासूनचे आहे. परंतु, संयुक्त राष्ट्रांनी या संकल्पनांचा एक शक्तिशाली साधन म्हणून उपयोग केला. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनामध्ये भारतीय हॉकी तारका, शांती-क्रीडा चळवळीशी एकता दर्शवत ‘जागतिक व्हाईट कार्ड मोहिमे’त अभिमानाने सामील झाल्या.
खेळातील इतर पत्त्यांप्रमाणेच, व्हाईट कार्डमध्येही शक्तिशाली प्रतीकात्मकता आहे. दंडात्मक कार्डप्रमाणे व्हाईट कार्ड शांतता, समावेश आणि आशेचे प्रतीक आहे. यावर्षीची मोहीम एका महत्त्वाच्या जागतिक मुद्द्याकडे लक्ष वेधते. 460 दशलक्ष मुले संघर्षग्रस्त भागात राहतात. खेळाच्या मैदानांसारख्या सुरक्षित जागांपासून आणि दर्जेदार शिक्षणापासून ही सारीच मुले वंचित आहेत. या आव्हानात्मक वातावरणात, खेळ महत्त्वपूर्ण भुमिका बजावतो. तो एक जीवन जगण्याचे उदिष्ट होतो. सहकार्य, परस्पर आदर आणि लवचिकता यांसारख्या कौशल्यांचे संगोपनही करतो.
विकास आणि शांतीसाठीच्या या आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने जगभरातील विविध देश, नागरी समाज आणि क्रीडा संघटनांना खेळाला शांती आणि शिक्षणाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून ओळखण्याचे आवाहन करण्यात आले. भारतीय हॉकी संघ या दृष्टिकोनाच्या मागे ठामपणे उभा आहे. विजेते केवळ मैदानावरच नव्हे, तर जागतिक हितासाठी भुमिका घेतात हेच हे भारतीय हॉकी संघाने सिद्ध करून दाखवले आहे. खेळ आणि एकतेचे राजदूत म्हणून, भारतीय महिला हॉकी संघाच्या सदस्य यासाठी पुढे आले आहेत.
भारतीय महिला हॉकी संघाची अनुभवी खेळाडू लालरेमसियामी याबद्दल म्हणते की, “खेळात कोण्त्याही भाषेचे किंवा पार्श्वभूमीतून आलेल्यांच्या जीवनातील अडथळे पार करण्याची आणि लोकांना एकत्र आणण्याची शक्ती आहे. ‘व्हाईट कार्ड मोहीम’ मैदानावर आणि मैदानाबाहेर आपण ज्या मूल्यांवर जगतो, त्याचा आदर,सांघिक कार्य आणि शांती यांचे चित्रण करते. माझे व्हाईट कार्ड दाखवताना आणि सर्वत्र मुलांसाठी अधिक समावेशक आणि सुरक्षित जगाचे आवाहन करताना, मला अभिमान वाटतो.”
भारतीय संघाची गोलकीपर सविता म्हणाली, “खेळामुळे जीवन कसे बदलते हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे मला आत्मविश्वास आणि एक उदिष्टही मिळाले. संघर्षग्रस्त भागातील मुलांसाठीही ते असेच साबित होऊ शकते. ‘व्हाईट कार्ड मोहिमे’त सामील होऊन प्रत्येक मुलाला खेळण्यासाठी, शिकण्यासाठी आणि शांततेत वाढण्यासाठी सुरक्षित जागेची आवश्यकता आहे, हा संदेश आम्ही पुढे नेण्याची आशा करतो.”
तसेच, संघाची उदयोन्मुख स्टार आणि ड्रॅगफ्लिकर दीपिका पुढे म्हणते, “हॉकी मैदानाने मला शिस्त, धैर्य आणि आदर शिकवला. खेळ म्हणजे फक्त पदके जिंकणे नाही, तर ते चारित्र्य आणि समुदाय घडवण्याचीही जबाबदारी आहे. ही ‘व्हाईट कार्ड मोहीम’ शांततेसाठी आणि पुढच्या पिढीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी आमची वचनबद्धता दर्शवते.”
हॉकीसारख्या क्रीडाप्रकारांत हिरवे, पिवळे, लाल अशा रंगाची कार्ड वापरली जातात. पण, अनोख्या असलेल्या पांढर्या कार्डचा वापर, बाकीच्या कार्डसारखा प्रचलित नाही. साधारणत: प्रत्येक रंगाच्या कार्डचा वापर, एक इशारा देण्यासाठी केला जातो. पिवळे कार्ड खेळाडूला, किमान पाच मिनिटांसाठी खेळातून काढून टाकण्यासाठी वापरले जाते आणि लाल कार्ड खेळाडूला खेळायला अपात्र ठरवते. लाल, पिवळे कार्ड प्रामुख्याने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल, शिक्षा करण्यासाठी किंवा इशारा देण्यासाठी वापरले जातात. व्हाईट कार्डलाही एक इतिहास आहे.
खेळाडू, अधिकारी किंवा प्रेक्षकांना क्रीडाभावनेसाठी त्वरित बक्षीस देण्यासाठी, पोर्तुगालच्या ‘राष्ट्रीय क्रीडा योजने’साठी ’पीएनईडी’ने फुटबॉलमध्ये पांढर्या कार्डची संकल्पना मांडली. ’फेअरप्ले कार्ड ’म्हणूनही ओळखले जाणारे पांढरे कार्ड, हे सुंदर खेळातील सकारात्मक वर्तनाचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व आहे. ‘आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन बोर्ड’ने अद्याप खेळाच्या कायद्यांमध्ये, ते समाविष्ट केलेले नाही. तथापि, ‘पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशन’ने, त्यांच्या सर्व स्थानिक स्पर्धांमध्ये ज्यामध्ये टॉप-टियर लीगा पोर्तुगालचा समावेश आहे, व्हाईट कार्ड सिस्टम लागू केली आहे.
या कार्डचा उद्देश, खेळात थेट सहभागी असलेल्या खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, इतर एजंट्स तसेच प्रेक्षकांच्या नैतिकदृष्ट्या संबंधित दृष्टिकोन आणि वर्तन ओळखणे, अधोरेखित करणे आणि त्यांना बक्षीस देणे हा असल्याचे ‘पीएनईडी’ने म्हटले आहे.
फुटबॉलमध्ये पांढर्या कार्डांचा वापर
दि. 21 जानेवारी 2023 रोजी लिस्बनमधील एस्टाडिओ दा लुझ येथे, स्पोर्टिंग लिस्बन आणि बेनफिका यांच्यातील टाका डी पोर्तुगाल (पोर्तुगाल कप) महिला सामन्यात, टॉप-फ्लाईट फुटबॉलमध्ये पहिल्यांदाच व्हाईट कार्डचा वापर करण्यात आला.
बेनफिका, स्पोर्टिंग लिस्बनवर 3-0 अशी आघाडी घेत होती. त्यावेळी हाफटाईमच्या अगदी उंबरठ्यावर असताना जेव्हा बाजूला असलेला एक खेळाडू आजारी पडला, तेव्हा दोन्ही संघांचे वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी धावले.
प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात परिस्थितीला त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल, पोर्तुगीज पंच कॅटरिना कॅम्पोस यांनी दोन्ही संघांच्या वैद्यकीय कर्मचार्यांना पांढरे कार्ड दाखवले.
पोर्तुगाली महिलांनी सामन्यात मिळवलेले व्हाईट कार्ड आणि भारतीय महिलांनी प्रतिपादित केलेली ही ‘व्हाईट कार्ड मोहीम’, सगळ्यांनी अवलंबिली पाहिजे. त्याने खेळाडूंचे मूल्यवर्धन व्हायला मदत होईल आणि दि. 6 एप्रिल रोजीच्या दिनाचे ते क्रीडा क्षेत्राच्या रूपाने जगाला मिळालेले एक वरदानच असेल. जगात रोज ठिकठिकाणी 244 मिलियन मुले शाळेत जात नसून, 80 टक्के विद्यार्थी पौगंडावस्थेतच शाळा सोडतात. ‘संयुक्त राष्ट्रसंघा’कडून आलेल्या या आकडेवारीची, क्रीडाविश्व योग्य ती दखल घेत खेळांच्या साहाय्याने जागतिक स्तरावर युवक-युवतींचे भविष्य उज्ज्वल करत राहो.
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704