महाविद्यालयीन जीवनापासून सायकलस्वारीची आवड जोपासताना आता वयाच्या 57व्या वर्षीदेखील तोच उत्साह राखणार्या, मोहन नरसू पाटील यांच्या ‘लाईफ ऑन व्हील’विषयी जाणून घेऊया.
मोहन यांचा जन्म मुंबईत झाला. प्राथमिक शिक्षण लोअर परळच्या ना. म. जोशी मार्ग विद्यालयात, तर माध्यमिक शिक्षण राजश्री शाहू विद्यालय येथे झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी नायगावच्या व्होकेशनल कॉलेज आणि बीएससी केमिस्ट्री दादरच्या कीर्ती महाविद्यालय येथे पूर्ण केले. अकरावीमध्ये असताना ‘बेस्ट’ बसपेक्षा सायकलने जाणे पसंत केले आणि तिथेच त्यांच्या सायकल स्वारीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
पुढे कीर्ती महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत शिक्षण सुरू असताना मोहन यांनी, ‘एनसीसी’मध्ये ‘बी’ आणि ’सी’ प्रवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त केले. याच ‘एनसीसी’ ग्रुपतर्फे त्यांनी, 1989 साली मुंबई ते दिल्ली सायकलवारीची पहिली मोठी मोहीम फत्ते केली. त्यासाठी त्यांना, जवळपास 13 दिवस प्रवास करावा लागला. गियर नसलेली सायकल, आधुनिक सामुग्री असे काहीही नसताना त्यांनी ही किमया केली. या मोहिमेनंतर सायकलिंगमध्ये त्यांना खर्या अर्थाने गोडी निर्माण झाली. पुढे चार-पाच सहकार्यांना घेऊन त्यांनी, मुंबई ते रायगड किल्ला, मुंबई ते वज्रेश्वरी मंदिर अशी सायकलवारी पूर्ण केली. वज्रेश्वरी येथे जाताना त्यांनी, ‘फिक्स्ड व्हील सायकल’चा वापर केला.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोहन यांनी 1992 साली, पहिली नोकरी पत्करली. 1996 सालापर्यंत त्यांनी सायकलिंगचा नियमित सराव केला. डोंबिवलीत राहत्या घरापासून रेल्वेस्थानकपर्यंत वाहनाचे साधन म्हणून, त्यांनी पुन्हा सायकल चालवली. 1997 साली मोहन यांचा विवाह नीलम यांच्यासोबत झाला.
कोविड काळात मोहन यांनी सायकलिंग आणि धावणे, याला आपले मिशन केले. याच काळात त्यांनी. एका रनर क्लबचे सदस्यत्व घेतले. त्यांनी 2024 सालापासून त्यांनी 16 वैयक्तिक धाव स्पर्धा केल्या आणि त्यात त्यांना प्रावीण्यपत्र प्राप्त झाले.
मोहन यांच्याकडे आज अद्ययावत ‘आर सी 100 ट्रिबन डी कथलॉन’, ‘अर्बन टेरियन’ आणि ‘एक सिंगल स्पीड’ साधी सायकल आहे. त्याची देखभाल-दुरुस्ती ते स्वतः करतात.त्यांनी आपल्या घरात, इनडोअर सायकलदेखील आणून ठेवली आहे. 2021 साली त्यांनी ‘रनर्स क्लान’ या संस्थेचे सभासदत्व स्वीकारले. या संस्थेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या, ‘एक दौड जवानो के लिये’ या 65 किमी ‘अर्बन अल्ट्रा’ स्पर्धेत त्यांनी सलग चार वर्षे पायलट सायकलस्वार म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच, आपला सहकारी ओमकार भोईटे यांच्यासोबत याच अल्ट्रा अर्बन रनसाठी त्यांनी, रोड रेकीचे कामही चार वेळा केले आहे.
डोंबिवलीतील नामांकित सायकलपटूंसोबत मोहन यांची दर शनिवारी आणि रविवारी, नियमितपणे सायकलवारी सुरू आहे. यामध्ये 50 किमी परिक्षेत्रातील विविध मंदिरे, ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गस्थळांना ते भेटी देतात. नियमित सरावासाठी मोहन रोज सकाळी 5.15 सुरुवात करतात. 2024 सालापासून त्यांनी धावायलादेखील सुरुवात केली. त्यांना पूर्वी सायटिकाचा त्रास होता. हा त्रास सायकलिंग, धावणे आणि नियमित व्यायामामुळे बंद झाल्याचे ते सांगतात.
मुलुंड येथील ‘कॅनकिड्स’ या संस्थेच्या, सलग 41 दिवस दररोज सायकल चालवण्याच्या उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला. ही संस्था कॅन्सरग्रस्त मुलांना आर्थिक साहाय्य करते. या संस्थेसह आतापर्यंत मोहन यांना, एकूण 27 गौरवचिन्ह प्राप्त झाले आहेत. 2025 सालच्या नवीन वर्षाचा संकल्प म्हणून, मोहन यांनी डोंबिवलीतील सुप्रसिद्ध प्रशिक्षक सचिन कडवे यांच्याकडे धावण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे.
बाहेरचे खाणे पिणे टाळणे, घरात शिजवलेले साधे अन्न ग्रहण करणे यावर भर दिल्याने, बॉडी मास इंडेक्सपेक्षा कमी वजन राखण्यात त्यांना यश आले आहे. याचा फायदा आपल्याला वयाच्या 57व्या वर्षीदेखील होत असल्याचे, त्यांनी आवर्जून सांगितले. सचिन कडवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धावण्याचे 100 दिवस, हा उपक्रम हाती घेतला आहे. दिवसभरात कमीत कमी दररोज दोन किमी, सध्या धावण्याचा सराव ते करीत आहेत. तब्बल 36 वर्षांच्या ब्रेकनंतर, त्यांनी पुन्हा धावण्यास सुरुवात केली आहे. महाविद्यालयात असताना ते क्रॉस कंट्री स्पर्धेत ते सहभागी व्हायचे.
आपल्या नित्य जीवनात आपल्या सभोवतालच्या लोकांना ते शारीरिक तंदुरुस्ती आणि सायकलिंगबाबत जनजागृती करतात. त्यांनी प्रोत्साहित केलेल्यांपैकी आदित्य मिश्रा या युवकाची, इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट अधिकारीपदी नियुक्ती होणार आहे.
सायकलवारी करणार्या सुप्रसिद्ध ‘यूट्युब ब्लॉगर’ महेश दाभोळकर यांनी मोहन यांच्यावर एक खास व्हिडिओ केला आहे. त्यांचे इतर व्हिडिओ पाहून आपल्याला प्रोत्साहन मिळते, असे मोहन सांगतात.आपल्या या प्रवासात अंबरनाथ येथील ‘रनहोलकोलिक्स’ संस्थेचे अनिल कोरवी यांना मोहन आपला आदर्श मानतात.
रोज पहाटे घड्याळाचा गजर न लावता लवकर उठा, चालणे, धावणे आणि सायकलिंगसारखे सहज पर्याय निवडून, शारीरिक तंदुरुस्ती राखण्याचे आवाहन आजच्या युवा पिढीला मोहन पाटील करतात. फिटनेसचा फंडा पुढे असाच चालू ठेवण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!