सब मिले हुए हैं जी

    02-Apr-2025   
Total Views |

delhi to get six new air quality stations to fight pollution
 
तुम्हारे सियासत के कारनामे कहाँ नहीं थे?
गंदे पानी में, शराब की बोतलो में, दिल्ली दंगल
रोहिंग्या के आगमन में और दुषित हवाओ में।
 
काय म्हणता, माझ्या कारकिर्दीमध्ये हे सगळे घडले? असू दे बदनाम हुआ तो क्या हुआ? नाम तो हुआ!! आता काय दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता माझ्या या कारनाम्यांचा समाचार घेणार का? कधी कधी वाटतं, ‘हवा भी शामिल हैं उनके साजिश में।’ हो, त्याशिवाय का माझी दिल्लीतली सत्ता गेल्या गेल्या दिल्लीच्या हवेची गुणवत्ता सुधारली. मी असेपर्यंत तर दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण होते. मी गेल्या गेल्या प्रदूषण कमी कसे झाले? ‘सब मिले हुए हैं जी।
 
आमच्या विरोधात ‘पुरी कायनात’ एकवटली आहे. त्याशिवाय का हवेची गुणवत्ता सुधारली आहे? काय म्हणता, त्यासाठी दिल्लीच्या नवीन भाजप सरकारने रात्रंदिवस एक करून काम केले? प्रदूषण कमी कसे करता येईल, याबाबत अभ्यास करून त्यानुसार त्वरित कार्यवाही केली. मग आमच्या मंत्र्यांनी पण दिल्लीचे प्रदूषण कमी व्हावे, यासाठी आदेश दिले होते. बघा, आदेशावर सह्या वगैरे दिसतील आमच्या मंत्र्यांच्या. काय म्हणता, दिल्लीची हवा ही आम आदमी पक्षाच्या सरकारची नोकर नाही की, आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांनी आदेश दिल्या दिल्या, त्या हवेतले प्रदूषण गायब होईल. काय म्हणता, आमचे डझनभर मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात होते. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या सत्ताकाळात दिल्लीच्या भल्यासाठी काम करणारे निर्णय घेणारे कोणीही दिल्लीत नव्हते. तर ही नेतेमंडळी तुरुंगात होती! मीसुद्धा होतो हो तुरुंगात. काय म्हणता, ‘जहाँ चाह होती हैं, वहाँ राह होती हैं? त्यामुळे भाजपने दिल्लीचे प्रदूषण कमी केले? काय म्हणता, बजेटमध्ये पर्यावरण आणि वन विभागाला ५०६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचबरोबर ३०० कोटी रुपये प्रदूषण नियंत्रण आणि तत्कालीन उपाययोजनेसाठी राखीव ठेवले आहेत? त्याशिवाय सहा नवे ‘कन्टिन्युअस एम्बिएन्ट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन’ (सीएएक्यूएम) स्थापित करण्यात येणार आहे? या सगळ्यामुळे दिल्लीची हवा प्रदूषणरहित होण्यास मदत होणार? असू दे, आमची सत्ता नसतानाही सगळी यंत्रणा दिल्लीचे हवामान सुधारणार आहेत का? ते पण भाजपला सामील आहेत. में तो पहले से बोलता हू सब मिले हुए हैं जी। बाजींदर अकेला नहीं...
बाजींदर अकेला नहीं...
कॅन्सरच्या रुग्णांना बरे करतो, भूताखेतांची बाधा असेल, तर त्याच्या एका कटाक्षाने तो भूतांना बाहेर हकलवतो, दिव्यांग, मतिमंद व्यक्तींना त्याने स्पर्श केला, तर ते लगेच त्यांचे भले होते. ‘इशू इशू मेरा इशू’ असे तो म्हणत असतो. पंजाबमध्ये त्याची मोठी चर्चसंस्था आहे. लाखो लोक त्याच्या ‘चंगाई सभे’ला येतात. समाजात मान्यता असलेले अनेक राजकारणी, अभिनेता, अभिनेत्री त्याच्या सभेला हजेरीसुद्धा लावतात, तर अशा या पास्टर बाजींदरला मोहाली न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ‘पॉक्सो’अंतर्गत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. काही वर्षांपूर्वी त्याने एका अल्पवयीन मुलीला लैंगिकदृष्ट्या त्रास दिला होता, धमकावून ब्लॅकमेलसुद्धा केले होते. सात वर्षांनंतर या गुन्ह्याचा निकाल देण्यात आला आहेे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश (एडीएसजे) विक्रांत कुमार यांनी हा निर्णय दिला आहे.
 
पंजाबच्या आर्थिक, सामाजिक दुर्बल घटकांतच नव्हे, तर सर्वच दृष्टीने संपन्न असलेल्या समाजघटकांमध्येही बाजींदरचे चांगलेच प्रस्थ आहे. काही वर्षांपूर्वी त्याने ज्या मुलीला त्रास दिला होता, तिने पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, त्यानंतर तिला आणि पुढे तिचा विवाह झाल्यावर तिच्या पतीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे बाजींदर याला शिक्षा सुनावण्यात आली असली, तरी आपल्या जिवाला धोका आहे, असे या मुलीला वाटते. पंजाबमध्ये काँग्रेसी गवतासारखे स्वयंघोषित मसिहा निर्माण झाले आहेत. त्यांच्या ‘चंगाई सभे’ला आयाबायांची त्यांच्या मुलाबाळांची गर्दी असते. इतकेच काय? या ‘चंगाई सभे’मध्ये विनामूल्य राहण्याची सोय असते, कुणी कुणाला रोखणारे नसते, त्यामुळे अनेक युवक-युवती एकमेकांसोबत वेळ घालवता यावा म्हणूनही या लोकांच्या सभेला जाताना दिसतात. बाजींदरचे घृणित कृत्य उघड झाले. अशा कितीतरी मुली, महिला, बालक आणि पुरुषही पीडित असतील. पण, आमच्या विरोधात ‘ब्र’ शब्द काढलात, तर येशू तुमचे वाटोळे करेल, ही भीती त्यांना अत्याचार मुकाट सहन करायला लावते. येशूच्या नावाने गरीब, अज्ञानी, भोळ्या लोकांच्या आयुष्याचा खेळ करणार्‍या बाजींदरसारख्यांना आयुष्यभराचा कारावास ही शिक्षाही कमीच वाटते. पंजाबमध्ये असे पाखंडी फादर एक शोधले, तर हजार मिळतील. पण, बाजींदर अकेला नहीं।

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.