मुंबई : मंगळवारच्या जोरदार पडझडीनंतर शेअर बाजाराने यशस्वी पुनरागमन केले आहे. मंगळवारी १४०० अंशांची आपटी खाल्यानंतर बुधवारी शेअर बाजाराने ५९२ अंशांची उसळी घेतली आहे. या उसळीमुळे शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७६,६१७ अंशांवर बंद झाला. त्यामुळे गुंतवणुकदारांची चांदी झाली असून त्यामुळे गुंतवणुकदारांनी ३ लाख कोटी परत मिळवले. निफ्टीमध्येही १६६ अंशांची भर पडली, त्यामुळे निफ्टी निर्देशांक हा २३,३३२ अंशांवर पोहोचला. या जोरदार पुनरागमनाने गुंतवणुकदारांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आयातशुल्कवाढीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने केलेले कमबॅक हे उल्लेखनीय ठरते.
तंत्रज्ञान तसेच बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांची जोरदार चलती दिसली. सर्वात जास्त मागणी असलेल्या कंपन्यांमध्ये झोमॅटो, टायटन, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. या उलट अल्ट्राटेक सिमेंट, नेस्टले इंडिया, बजाज फायनान्स, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. क्षेत्रांमध्ये बोलायचे झाले तर बँका, ग्राहकोपयोगी वस्तु, आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्या यां क्षेत्रांतील कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
यावाढीवरुन असे दिसते की भारतीय शेअर बाजार हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातशुल्क वाढीच्या निर्णयावर तोडगा निघण्याच्या अपेक्षेत आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांत सुरु झालेल्या खरेदीच्या सपाट्याने बाजाराचा उत्साह दिसून आला. यामुळे भारतीय शेअर बाजाराचे लक्ष चौथ्या आणि शेवटच्या तिमाहीतील अर्थव्यवस्थेच्या प्रगतीकडे आणि त्यातून पुढील आठवड्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या बैठकीकडे लागले आहे. या दोन्ही मधून अर्थव्यवस्थेला अनुकुल असेच निर्णय होतील अशीच अटकळ बाजार बांधत आहे असे मत मेहता इक्विटीजचे संशोधन विभागाचे उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनी मांडले आहे.