एका स्वयंसेवकाचा बौद्धिक वर्ग

    02-Apr-2025   
Total Views |

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला येणार, संघ कार्यालयाला भेट देणार, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची भेट घेणार, दोघांत चर्चा होणार, याची (निरुद्योगी) वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया यावर प्रचंड चर्चा सुरू होती. जणूकाही हा प्रसंग संघ आणि भाजपच्या इतिहासाला कलाटणी देणारा प्रसंग ठरणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या घोळूनघोळून आणि निवेदक आपण संघासंबंधीचे महाज्ञानी आहोत, या आविर्भावात सांगत होते. या सर्वांचे दोन शब्दांत वर्णन करायचे, तर ‘महा करमणूक’ (The Great entertainment) या शब्दात करावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघ स्वयंसेवक आहेत. भाजपमध्ये पाठविण्यापूर्वी ते संघ प्रचारक होते. ते तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक आहेत. तृतीय वर्षासाठी नागपूरच्या रेशीमबागेत (संघ कार्यालयात) एक महिनाभर राहावे लागते. गुजरातचे प्रचारक या नात्याने नागपूरला मोदी यांनी असंख्य वेळेस भेट दिली असेल, तेव्हा माध्यमे झोपलेली असल्यामुळे त्यांच्या ते लक्षात आले नाही.
 
नरेंद्र मोदी 2014 सालापासून देशाचे पंतप्रधान आहेत. साहजिकच पंतप्रधान म्हणून ते प्रसिद्धीच्या झोतात राहतात. पंतप्रधान या नात्याने संघाचे मुख्यालय आणि रेशीमबाग या दोन्ही ठिकाणी त्यांची ही प्रथम भेट होती. खरं तर त्यातही आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पंतप्रधानांनी उठसूट संघ कार्यालयात यावे, अशी संघाची अजिबात अपेक्षा नसते; उलट अपेक्षा असते की, पंतप्रधानांनी संघ कार्यालयात येऊ नये. जे दायित्व त्यांच्या खांद्यावर आले आहे, ते त्यांनी पार पाडावे, वेळ आणि शक्ती त्यासाठी खर्च करावी. विभिन्न कार्यक्षेत्रांत गेलेल्या आणि पाठविलेल्या सर्व कार्यकर्त्यांकडून संघाची हीच अपेक्षा असते. नरेंद्र मोदी ही अपेक्षा शतप्रतिशत पूर्ण करीत आहेत.
 
संघाचा मंत्र आहे, ‘राष्ट्र प्रथम’; नरेंद्र मोदींचा संकल्प आहे, ‘राष्ट्र प्रथम.’ संघाचा मंत्र आहे, ‘समग्र समाजाचे संघटन’, नरेंद्र मोदींचा मार्ग आहे, ‘सबका साथ, सबका विकास, सबका सहयोग.’ संघाचा मंत्र आहे, ‘धर्मरक्षण, धर्मपालन आणि धर्मरक्षण शक्ती संवर्धन’, मोदींचा मार्ग आहे, सनातन धर्म सबलीकरण, धार्मिक आस्थांचा आदर, धर्मपुरुषांना वंदन, सनातन धार्मिक आचाराचे पालन. संघाचा मंत्र आहे, उपासना पंथाच्या आधारे फुटीरतेला विरोध, वेगळ्या वागणुकीला विरोध, मोदींचा मार्ग आहे ‘कुणाचेही तुष्टीकरण करणार नाही, सर्वांना समान वागणूक मिळेल’. संघाचा विचार आहे, देश चालविण्याचा सर्वोच्च कायदा आपले संविधान आहे. त्याचा आदर, सन्मान आणि पालन सर्वांनीच केले पााहिजे; मोदींचे म्हणणे आहे, संविधान आमचा राज्य ‘धर्मग्रंथ’ आहे. तो श्रद्धेय असून त्याचे पालन निष्ठेने करायचे आहे.
 
संघ आणि मोदी यांच्यात अभेद आहे. मोदी राजसत्तेच्या माध्यमातून राष्ट्रसंवर्धनाचे काम करीत आहेत. संघ समाज सत्तेच्या माध्यमातून राष्ट्र बलवान करण्याचे काम करीत आहे. दोन्ही कामे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या माध्यमांनी यावेळेला शोध लावला की, भाजपचे अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, नवीन अध्यक्षांची निवड करायची आहे आणि मोदींना त्याची संघाकडून अनुमती हवी आहे. हे माध्यमांनी कुठून शोधले, हे त्यांचे त्यांना ठावूक. अध्यक्ष भाजपने निवडायचा आहे आणि तो कोण निवडायचा, हे त्याचे त्यांनी त्यांचे ठरवायचे आहे. अन्य पक्षातून आलेला कुणीही अध्यक्ष होऊ शकत नाही. जो अध्यक्ष होईल, तो वैचारिक निष्ठा प्रमाण मानणाराच असेल, मग त्याची चिंता कशाला करायची?
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘माधव नेत्रालय प्रिमियम सेंटर’चा शिलान्यास करण्यासाठी नागपूरला आले होते. दिवस गुढीपाडव्याचा होता. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा हा जन्मदिवस, त्यामुळे रेशीमबागेतील त्यांच्या स्मृतिमंदिरात जाणे आणि त्यांना वंदन करणे, तेथेच असलेल्या माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांच्या ज्योतीला वंदन करणे क्रमप्राप्त होते. डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरूजी दोघेही प्रत्येक संघ स्वयंसेवकांच्या हृदयमंदिरात विराजमान असतात. नरेंद्र मोदी संघ स्वयंसेवक आहेत, त्यांच्या हृदयमंदिरातदेखील ते विराजमान आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘माधव नेत्रालय प्रिमियम’ शिलान्यास प्रसंगी जे भाषण झाले, त्याला ‘एका स्वयंसेवकाचा बौद्धिक वर्ग’ असे म्हणायला पाहिजे. हे जाहीर भाषण नाही, हा जाहीर बौद्धिक वर्ग आहे. राजकीय नेता भाषणात खूप टोलवाटोलवी करीत राहतो. बौद्धिक वर्ग हा अंतर्मुख करणारा असतो. तो विचारप्रवृत्त करतो. आपण कोण आहोत? येथवर कसे आलो? कोणत्या साधनाने आलो? आजचे आपले स्थान काय आणि आपल्याला कोठे जायचे आहे? हे सर्व नरेंद्र मोदी यांनी आपल्या बौद्धिक वर्गात मांडले.
 
त्यावर राजकीय चर्चा चालू आहे, ती चालू द्यावी. ज्याचे जेवढे संघज्ञान तेवढी त्याची चर्चेची पातळी! ज्याचा जसा चष्मा, तशी त्याची दृष्टी. या दोन्ही गोष्टी आपण बदलू शकत नाही, हे जितके खरे तितकेच अशा सर्व (फालतू) चर्चांचा संघकामावरील परिणामदेखील शून्यवतच असतो. म्हणून त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण शेवटी झाले, अगोदर सरसंघचालक बोलले. संघाचा संकेत असा आहे की, सरसंघचालकांच्या भाषणानंतर अन्य कुणाचे भाषण होत नाही. संघाने हा संकेत बाजूला ठेवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी संघ स्वयंसेवक आहेत, हे खरे. पण, त्याचवेळी ते देशाचे पंतप्रधान आहेत. देशाचा पंतप्रधान देशाचा सर्वोच्च कार्यकारी अधिकारी असतो. ते घटनात्मक पद आहे, त्याचा योग्य तो सन्मान राखणे, म्हणजे राज्यघटनेचा सन्मान करणेच आहे. संघ फार बोलत नाही, संघ फक्त कृती करतो. त्या कृतीचा अर्थ ज्यांना समजतो, त्यांना संघ काही प्रमाणात समजला असे मानले पाहिजे.
 
रेशीमबागेला भेट देण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीवर जाऊन आले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून आले. डॉ. आंबेडकर ते डॉ. हेडगेवार हा त्यांचा नागपूर प्रवास आहे. त्यात खूप खोलवरचा अर्थ आहे. सामाजिक बंधुभावनेच्या आधारे समाज उभा राहावा, हे दोन्ही डॉक्टरांच्या कार्याचे समान सूत्र आहे. परंतु, मार्ग भिन्न आहेत. भिन्न मार्ग असले तरी एकरस, बलसंपन्न, सर्व दोषांपासून मुक्त संघटित समाज हे समान लक्ष्य आहे. मोदी ते जाणतात. मीडियावर शेरेबाजी करणार्‍यांना ते किती समजते, हे त्यांच्या शेरेबाजीतून आपण जाणून घ्यावे.
9869206101