विवेकशून्य व्यवस्थेची गोष्ट

    02-Apr-2025
Total Views |

Hindu
ब्रिटनच्या पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या अलीकडच्या अहवालात, हिंदू समाजाला कट्टर उजव्या विचारसरणीच्या गटाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हा निष्कर्ष केवळ पूर्वग्रहदूषित नाही, तर हिंदूंच्या शांतताप्रिय प्रतिमेला डाग लावणाराच आहे. हा आरोप म्हणजे, विवेकहीनतेचे उत्तम उदाहरण. ब्रिटनमधील हिंदू समाज दीर्घकाळ विविध समुदायांसोबत सलोख्याने राहिला आहे. त्यामुळे या अहवालाने निर्माण केलेल्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
 
गेल्या काही वर्षांत ब्रिटनमधील हिंदू समाज अनेक आघाड्यांवर संकटांना तोंड देत आहे. हिंदूंच्या आस्थांवर सातत्याने हल्ले होत असून, समाजमाध्यमांवर हिंदूविरोधी प्रचार वाढताना दिसतो. मात्र, या घटनांवर कठोर कारवाई करण्याऐवजी ब्रिटनच्या पोलिसांना, ब्रिटनमधील हिंदू कसे उजव्या विचारसरणीचे आहेत, हे दाखवण्यातच स्वारस्य असल्याचे दिसते.
 
आजमितीला ब्रिटनमधील खलिस्तानी आणि इस्लामी मूलतत्त्ववादी गट हिंदूंविरुद्ध खुलेआम द्वेष पसरवताना दिसतात. परंतु, त्यांच्यावर ब्रिटनमध्ये कठोर कारवाई होत नाही. त्याचवेळी हिंदू समाजाला ‘कट्टरवादी उजवे’ म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न दिसतो. हा दुहेरी मापदंड पोलीस आणि प्रशासनाच्या पूर्वग्रहांना अधोरेखित करतो. वास्तविक पाहता, काहीच दिवसांपूर्वी युरोपातील हिंदू कसे मध्यममार्गी जीवन जगत सहअस्तित्वाच्या संकल्पनेला बळकट करण्यास सहकार्य करतात, हे सांगणारा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच ब्रिटन पोलिसांचा आलेला हा अहवाल, हिंदूविरोधी राजकारण स्पष्ट करणारा आहे.
 
ब्रिटनच्या पोलिसांना अनेक गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई करता आलेली नाही. उदाहरणार्थ, पाकिस्तानी ‘रेप गँग’ प्रकरणांमध्ये हजारो अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले, तरी ब्रिटिश पोलिसांनी राजकीय दबावाखाली यावर फारशी कठोर कारवाई केली नाही. खर्‍या समाजविघातक शक्तींना रोखण्यात अपयशी ठरलेल्या या प्रशासनाने, शांतताप्रिय हिंदूंना लक्ष्य करणे अधिक सोपे मानले आहे.
 
ब्रिटनमधील सध्याचे स्टार्मर यांचे डाव्या विचारांचे सरकार हिंदूंविरोधी भूमिकेत आहे, हे वारंवार दिसून येते. प्रशासनाने खलिस्तानी आणि इस्लामी कट्टरतावाद्यांवर कारवाई करण्यास उदासीनता दाखवली. मात्र, हिंदूंवर कट्टरतावादाचा शिक्का लावण्यातच धन्यता मानलेली दिसते. हे धोरण केवळ राजकीय स्वार्थासाठी राबवले जात असून, यामुळे ब्रिटनमधील हिंदू समाज अधिकच असुरक्षित होणार आहे.
 
ब्रिटनमधील हिंदू समाज हा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्तरांवर मोठे योगदान देत आला आहे. भारतातून स्थलांतरित झालेले हिंदू डॉक्टर्स, अभियंते, उद्योजक आणि शास्त्रज्ञ ब्रिटनच्या विकासात मोलाची भूमिका बजावत आहेत. तरीही, त्यांना ‘फार-राईट’ म्हणून लेबल लावण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे. हिंदू समाज हा केवळ श्रद्धाळूच नाही, तर सहिष्णुतेचा पुरस्कार करणारा आहे. जगभर हिंदू मंदिरे इस्लामिक राष्ट्रांमध्येही उभारली जात आहेत. कारण, हिंदू समाज कोणत्याही समुदायाशी शांततेने सहजीवन जगणे नैसर्गिकपणे मान्य करतो. अशा स्थितीत हिंदूंना ‘कट्टर उजवे’ म्हणून जोडण्याचा हा स्टार्मर सरकारचा प्रयत्न केविलवाणा असाच!
 
ब्रिटनमधील हिंदू समाजाने संयम आणि सहिष्णुतेचा आदर्श कायमच दाखवला आहे. मात्र, त्यांना हेतुपुरस्सर लक्ष्य करून, राजकीय बळी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू दिसतो. या अहवालामुळे, ब्रिटनच्या तथाकथित धर्मनिरपेक्ष व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
 
ब्रिटिश प्रशासनाने या अहवालाचा फेरविचार करावा आणि खर्‍या समाजविघातक शक्तींवर कारवाई करावी, अन्यथा ब्रिटनमधील हिंदू समाजाच्या अस्मितेला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होईल. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत हिंदू समाजाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे या समाजावर होणार्‍या अन्यायाने ब्रिटनच्या आर्थिक परिस्थितीवरही परिणाम होऊ शकतो. हिंदू समाजाच्या विरोधातील अन्यायकारक धोरणे, दीर्घकालीन असंतोष निर्माण करू शकतात. जर प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर ब्रिटनमधील हिंदू युवक आपल्या राजकीय आणि सामाजिक भविष्याचा पुनर्विचार करू शकतात. त्यामुळे स्टार्मर सरकारने त्यांची भूमिका जाहीर करणे, ही काळाची गरज म्हणावी लागेल.

कौस्तुभ वीरकर