वन विभागात पशुवैद्यक भरती करा; राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना

    19-Apr-2025
Total Views |
veterinarian appointment in forest department



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
गेल्या सहा वर्षांपासून वन विभागात रखडलेली पशुवैद्यकांची कॅडर भरती लवकरात लवकर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पार पडलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत दिल्या (veterinarian appointment in forest department). मंडळातील सदस्यांनी रखडलेल्या पशुवैद्यक कॅडर भरतीचा प्रश्न मांडल्यावर यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या (veterinarian appointment in forest department). शासन निर्णय असूनही वन विभागात प्रतिनियुक्ती आणि कंत्राटी पद्धतीनेच पशुवैद्यकांची नेमणूक सुरू असल्याची बाब, दै. 'मुंबई तरुण भारत'ने प्रकाशित केली होती. (veterinarian appointment in forest department)
 
 
२०१८ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १३ व्या बैठकीत पशुवैद्यकांचे स्वतंत्र कॅडर तयार करण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्र्यांनी वन विभागाअंतर्गत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र पदे निर्माण करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भातील शासन निर्णय २०१९ साली प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार वन विभागाअंतर्गत पशु वैद्यकीय अधिकारी (६ पदे), पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त-वन्यजीव (३ पदे) आणि पशुसंवर्धन उप आयुक्त-वन्यजीव (१ पद) अशी १० पदे निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली. या पदांना वित्त विभागाने देखील मान्यता दिली. त्याचा आकृतीबंध देखील तयार झाला. मात्र, वन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत यासंदर्भात पाठपुरावा न केल्याने गेल्या सहा वर्षांपासून या नियुक्त्या रखडेलल्या होत्या.
 
 
गुरुवारी दि. १७ एप्रिल रोजी पार पडलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या २४ व्या बैठकीत मंडळाचे सदस्य आणि 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे संचालक किशोर रिठे यांनी रखडलेल्या पशुवैद्यक भरतीचा मुद्दा उपस्थित केला. याविषयी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना रिठे म्हणाले की, "वन विभागात वन्यजीव उपचार पद्धतीचा अनुभव असणाऱ्या पशुवैद्यकांची पूर्णनियुक्ती होणे गरजेचे आहे. याबाबतच्या सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्या असूनही केवळ पाठपुरावा न केल्याने या पदांच्या भरती रखडलेल्या होत्या. बैठकीत हा प्रश्न उपस्थित केल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन रखडलेल्या नियुक्तीबाबत खंंत व्यक्त करत लवकरात लवकर भरती करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या." या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचे मुख्य अर्थसल्लागार प्रवीण परदेशी यांनी पशुवैद्यकांची ही पदे सहाय्यक वनसंरक्षक दर्जाची म्हणजे क्लास वन अधिकाऱ्याची असावी, असे प्रस्तावित केले.
 
 
नॅशनल पार्कमधील पशुवैद्यकाचे काम असमाधानकारक !
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पशुसंवर्धन विभागातून प्रतिनियुक्तीवर आलेल्या पशुवैद्यकाचे काम समाधानकारक नसल्याने त्यांना मुदतवाढ देऊ नये, असे पत्र वन विभागाच्या प्रशासन, दुय्यम संवर्ग विभागाने शासनाला पाठवले आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'ने बोरिवली राष्ट्रीय उद्यानात झालेल्या वाघाटींच्या मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर झालेल्या चौकशीअंती प्रशासन, दुय्यम संवर्ग विभागाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकाच्या अकार्यक्षम कामाविषयी काही वन्यजीव बचाव संस्थांनी देखील वन विभागाकडे तक्रार केल्या आहेत