नाशिकचे महारांगोळीकार

    19-Apr-2025
Total Views | 5
 
nilesh deshpande nashik
 
रांगोळीला ‘महारांगोळी’चे स्वरूप देऊन त्याला सामाजिक जनजागृतीची जोड देणार्‍या नाशिकच्या निलेश मधुकर देशपांडे यांच्याविषयी...
 
निलेश मुरलीधर देशपांडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातला. आई शिक्षिका तर वडील व्यावसायिक कलाकार. निलेश यांना कलेचे बाळकडू वडिलांकडूनच मिळाले. खोलेश्वर विद्यालयातून त्यांनी इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांना मदत करताना, निलेश यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली.
 
त्यावेळी लग्नकार्यात घरांवर चित्रे काढण्याची प्रथा होती. वडिलांना वेळ नसेल, तेव्हा स्वतः निलेशही घरांवर चित्रे काढू लागले. एकत्रित कुटुंब असल्याने आर्थिक परिस्थितीही नाजूकच. इयत्ता दहावीनंतर विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. परंतु, तिथे मन रमलेच नाही. चित्रकलेतही पदवी घेता येते अशा अनेक गोष्टी समजू लागल्यानंतर, त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत विज्ञान शाखेला रामराम केला. त्यामुळे वर्ष वाया गेले. पुढे त्यांनी चित्रकला क्षेत्रात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. बीडला कैलास कला निकेतनमध्ये, एक वर्ष फाऊंडेशन कोर्स केला. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे ‘बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स’साठी प्रवेश घेतला. त्यावेळी यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत होता. परिणामी, निलेश दोन-तीन दिवसांतून एकदाच जेवायचे.
 
तेव्हा एक रुपयाला सहा पाणीपुरी मिळत असे. जेव्हा प्रचंड भूक लागेल, तेव्हा एक किंवा दोन प्लेट पाणीपुरी खाऊन घेत. कधी पोहे, तिखट-मिठाची पोळी आणि पाणीपुरी हे निलेश यांचे ठरलेले खाण्याचे प्रकार. पोटाला ताण देऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पुढे मनमाडमध्ये एटीडीचे शिक्षण पूर्ण केले. काहीतरी काम करायचे म्हणून ते नाशिकला आले. भाऊ योगेशसोबत ते कॉट बेसिसवर राहत होते. जे काम येईल त्याला हो म्हणायचे आणि मग ते काम शिकायचे, असा फंडा त्यांनी वापरला. पुढे निलेश नाशिकलाच स्थायिक झाले.
 
2004 साली अकल्पित मराठी सिनेमा प्रदर्शित होणार होता. एका सीएकडे सहज चेक देण्यासाठी निलेश गेले असता, पत्ता चुकले आणि ते पोहोचले संगीत क्लासेसमध्ये. त्यावेळी त्यांनी पाच बोटांची रांगोळी काढली आणि तेथील एका महिलेने भावाला त्याविषयी सांगितले. तो भाऊ हा चित्रपटाचा दिग्दर्शक होता. त्यावेळी त्यांनी निलेश यांना पोर्ट्रेट काढता का? असे विचारल्यानंतर, निलेश यांनी पोर्ट्रेट येत नसतानाही होकार देऊन टाकला. घरी आल्यानंतर निलेश यांनी सराव केला. आईने रांगोळी चाळून दिली. सर्व तयारी करून, दिव्या अ‍ॅडलॅब येथे चित्रपटाचे पोर्ट्रेट काढले. त्यानंतर आईचे निधन झाले. केटीएचएममध्ये पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे रांगोळी पोर्ट्रेट रेखाटत, त्याचे प्रदर्शन भरविले. महिलांचे संरक्षण महिलाच करू शकतात, हा विचार घेऊन त्यांनी नवदुर्गा प्रदर्शन भरविले. यात त्यांनी 15 यशस्वी महिलांची रांगोळी काढून, नऊ महिलांना उद्घाटनासाठी बोलावले.
 
2015 सालच्या सिंहस्थात त्यांनी गोदावरी किनार्‍यावरील मंदिरांची 2 हजार, 015 चौरस फुटांची रांगोळी साकारली. रांगोळीतून आयुर्वेदाचे अष्टांग आणि इतर माहिती सांगण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. 1857 सालच्या उठावाला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी, क्रांतिकारकांच्या रांगोळींचे प्रदर्शन भरविले. सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी, जागतिक विक्रम केला. यावेळी 125 महिलांची भजने सुरू असताना, त्या वेळेत त्यांनी 151 गणपती साकारले. दहा तासांत 3 हजार, 500 चौरस फुटांचा गणपती साकारला. चरितार्थासाठी निलेश सजावटीचा व्यवसाय करतात. मात्र, आवड जोपासण्यासाठी ते रांगोळी काढतात.
 
पुढे निलेश ‘संस्कार भारती’शी जोडले गेले. सध्या ते ‘संस्कार भारती’चे, नाशिक महानगर रांगोळी प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त, त्यांनी शहरात 75 रांगोळ्या काढल्या होत्या. शंकराचार्य न्यासमध्ये देशातील महान व्यक्तींचे पोर्ट्रेट काढून, प्रदर्शन भरविण्यात आले. बंगळुरुमध्ये कलासाधक कार्यक्रमातही, त्यांनी संत एकनाथांची रांगोळी काढली होती. चेन्नईला आयआयटीच्या मुलांना रांगोळीचे प्रशिक्षण देण्यात आले. रामकुंडावरही अहिल्यादेवी होळकरांची भव्य महारांगोळी निलेश यांनी साकारली. सिंहस्थात ध्वजारोहण मिरवणुकीत रांगोळीवर कुणीही पाय दिला नाही, फक्त त्यावरून रथच गेला या घटनेने निलेश प्रभावित झाले. रांगोळी येत नसतानाही त्यांनी धाडस दाखवत, त्यात प्रावीण्य मिळवले. त्यांना आई उर्मिला यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. योगेश बक्षी, वृंदा लवाटे, शीतल धामणे, रवी बेडेकर, प्रशांत कुलकर्णी, जयंत गायधनी यांचेही सहकार्य त्यांना लाभते.
 
“रांगोळी सामाजिक संदेश देण्यासाठी महत्त्वाचे साधन आहे. रांगोळीतही पुरुषांची संख्या वाढत चालली आहे. रांगोळीत विचारशक्ती, संकल्पना, विविध आकार आहेत. रांगोळी हे कौशल्य प्रशिक्षण आहे. रांगोळीतून समाजसेवेचा पायंडा घालून द्यायचा आहे,” असे निलेश सांगतात. तसेच, ज्याला जी कला वाटेल ती कला जोपासता येईल, अशी कलानगरी अर्थात स्टुडिओ उभारण्याचा त्यांचा मानस आहे. रांगोळीला महारांगोळीचे स्वरूप देऊन, त्याला सामाजिक जनजागृतीची जोड देणार्‍या निलेश देशपांडे यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121