दि. 15 एप्रिल म्हणजे गझलसम्राट सुरेश भट यांची जयंती. त्यांच्या जन्मदिनानिमित्त गझल या काव्यप्रकाराचा आढावा घेणारा आगळावेगळा कार्यक्रम मुंबईच्या ‘एनसीपीए’ येथे नुकताच संपन्न झाला. ‘गझल’ या काव्यप्रकाराचे अंतरंग धुंडाळत कवितेच्या एका अद्भुत विश्वाचे दर्शन गझलकार चंद्रशेखर सानेकर यांनी घडवून आणले. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाची तसेच ‘गझल’ या काव्यप्रांतातील ही मुशाफिरी!
रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा!
गुंतूनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा!
सुरेश भटांनी मराठी काव्यरसिकांच्या पदरात ‘गझल’ या नव्या काव्यप्रकाराचे दान टाकले. कवितेच्या गंगेत वाहणार्या कवींच्या अभिव्यक्तीला दोन ओळींचा नवा बांध गवसला. सुरेश भट यांनी आपल्या हयातीत ‘गझल’ हा काव्यप्रकार केवळ फुलवला आणि रुजवलाच नाही, तर त्याची भूमीसुद्धा विस्तारली. आपल्या ’एल्गार’ या कवितासंग्रहात सुरेश भट म्हणतात की, “वास्तविक ‘गझल’ हाही मुक्त छंदातील कवितेसारखाच एक काव्यप्रकार आहे.” हा विचार मांडून सुरेश भट यांनी ‘गझल’ या काव्यप्रकाराची भूमिका आणि भूमी मोठी केली आहे. कुठल्याही एका विशिष्ट बंधनात गझलेला न अडकवता, या कविता प्रकाराचा विचार मुक्त केला.
कवितेतल्या या मुक्त अभिव्यक्तीने लोकांच्या मनावर थोड्याच कालावधीत अधिराज्य करायला सुरुवात केली. अनिल कांबळे, श्रीकृष्ण राऊत यांच्यापासून ते वैभव जोशी, गोविंद नाईक यांच्या ‘गझल’अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्या. गझलकारांच्या या मांदियाळीत आणखी एका मुलखावेगळ्या गझलकाराचे नाव मानाने घेतले जाते, ते म्हणजे चंद्रशेखर सानेकर यांचे. चंद्रशेखर सानेकर एक उत्तम गझलकार तर आहेतच, परंतु त्यांना ऐकताना त्यांचे आणि ‘गझल’ या काव्यप्रकाराचे असलेले वेगळे नातेसुद्धा नजरेस येते. ‘गझल’ हा काव्यप्रकार म्हणजे केवळ त्यांची अभिव्यक्ती नसून, तो त्यांच्या जगण्याचा आणि चिंतनाचा विषय. सुरेश भटांच्या जयंतीनिमित्त ‘एनसीपीए’च्या ‘लिटील थिएटर’मध्ये ’एका उन्हाची कैफियत’ या मैफिलीचा प्रयोग पार पडला.
‘एनसीपीए’च्या ’पेज टू स्टेज’ या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे सानेकर यांनी आपल्या गझला या कार्यक्रमात सादर केल्याच, त्याचसोबत या काव्यप्रकाराच्या अनेक वेगवेगळ्या कंगोर्यांनाही त्यांनी स्पर्श केला. ‘गझल’ म्हणजे ’अल्पाक्षरी विलक्षण भाष्य.’ ‘गझल’ या काव्यप्रकाराचे मर्मच एकप्रकारे यामध्ये समाविष्ट झाला आहे, असे आपल्या लक्षात येते. गझलेची व्याख्या करताना सुरेश भट म्हणतात, “कवितांची कविता म्हणजे गझल!” गझलेच्या मुक्त स्वभावाचा सानेकरांनी श्रोत्यांशी परिचय करून दिला. या स्वभावाचा परिचय करून देताना, पुढचा प्रश्न येतो तो हा की गझल लिहावी कोणी? यावरसुद्धा सुरेश भटांचे उत्तर आहे,
जन्मले घेऊन जे पायात काटा, त्या भणंगानीच यात्रेला निघावे.
गझलेचा आशय लक्षात घेतल्यास असे दिसते की, इथे केवळ दोन ओळींचा अवकाश आहे. या अवकाशात, आशयाची पेरणी कवीला करावी लागते. याच पार्श्वभूमीववर आपण चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलांकडे वळूया. चंद्रशेखर सानेकर आपल्या आशयघन गझलांसाठी ओळखले जातात. सानेकरांची ‘गझल’ म्हणजे कुतूहल आणि भाष्य या दोन गोष्टींचा अद्भुत संगम...
जागे असलेल्यांचे इतके हाल हाल झाले की
तमाम झोपेच्या सोंगांना दिवस सुगीचे आले
सानेकर यांच्या गझलांमध्ये एका प्रकारची तंद्री आपल्याला अनुभवायला मिळते. या तंद्रीमुळेच श्रोता त्यांच्या गझलांसोबत एकरुप होतो. या एकरुपतेमुळे सादरकर्त्या कवीचा आणि श्रोत्यांचा संवाद यशस्वी होतो आणि म्हणूनच सानेकर यांची ‘गझल’ लोकांना आवडते.
सानेकर यांच्या गझललेखनाच्या प्रांताचा जरी आपण विचार केला, तर आपल्याला दिसून येते की, यामध्ये विषयाची विविधता तर आहेच, परंतु ही विविधता समर्थपणे पेलण्याचे सामर्थ्यसुद्घा त्यांच्या लेखणीमध्ये आहे.
तुलाच ठावूक होते, सगळा खेळ कशासाठी होता तुझ्याचसाठी तू केलेला एक पसारा होतो मी
एका बाजूला हे लिहिणारे सानेकर, दुसर्या बाजूला काळावर भाष्य करताना म्हणतात
किती घरांना ज्वालांची जाणीव होते ते पाहू
वणवा गावाच्या वेशीवर उभा ठाकला आहे.
गझलांच्या प्रवासाबद्दल सांगताना ते म्हणतात की, “जे दिसतंय त्याच्या पलीकडे जाणे म्हणजे ‘गझल’ आहे आणि याच कारणामुळे सानेकर यांचे ‘गझल’ सादरीकरण वेगळे ठरते. इथे केवळ ती व्यक्ती स्वतःचे अनुभवकथन न करता, एक वेगळी अनुभूती प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या गझला काव्यसमृद्धीचा अनुभव देणार्या आहेत, हे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.”
चंद्रशेखर सानेकर यांनी सादर केलेल्या या विविधांगी गझलांच्या माध्यमातून कवितेची भूमी, भूमिका आणि व्यापती किती विस्तृत असू शकते, याची प्रचिती आपल्याला येते. शब्दांचा वापर करताना त्यांचे नेमकेपण, त्या त्या शब्दांची गरज आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कवितेची असणारी लय या गोष्टींच्या समग्र आकलनानंतरच त्यांची ‘गझल’ आपल्यासमोर येते आणि एक स्वतंत्र अनुभूती आपल्याला देऊन जाते. या अनुभूतीचा साक्षात्कार केवळ कलारसिकांनीच नव्हे, तर सामान्यांनीसुद्धा घ्यायला हवा.
‘गझल’ या काव्यप्रकाराचा भावार्थ सांगणारा कार्यक्रम
चंद्रशेखर सानेकर यांचा ‘एका उन्हाची कैफियत’ हा कार्यक्रम खूपच रंगतदार होता. त्यांनी एकाप्रकारे ‘गझल’ या काव्यप्रकाराचा भावार्थ रसिकांपर्यंत पोहोचवला. या कार्यक्रमाला युवकांनी दिलेला प्रतिसाद दिलासादायक आहे. ‘एनसीपीए’मध्ये ‘पेज टू स्टेज’ या उपक्रमाअंतर्गत अनेक लेखकांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ देण्यात आले. वाचनसंस्कृती रुजावी, नव्या लेखकांना आपली कलाकृती लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम आम्ही राबवला. प्रख्यात लेखक नरेश फर्नांडिस यांच्यापासून ते मराठीतील लोकप्रिय लेखक देवा झिंजाड यांच्यापर्यंत अनेकांनी या व्यासपीठावर आपले साहित्य सादर केले. अभिवाचनाच्या पलीकडे जाऊन दृकश्राव्य माध्यमातून आपली कलाकृती सादर करण्याचे स्वातंत्र्यसुद्धा इथे लेखकांना दिले जाते. चंद्रशेखर सानेकर यांनी आपल्या ‘गझल’ सादरीकरणाच्या माध्यमातून कवितेच्या अत्यंत वेगळ्या प्रांतांमध्ये लोकांना सफर घडवून आणली.
- सुजाता जाधव, ‘पेज टू स्टेज’ उपक्रम समन्वयक, एनसीपीए
साहित्यिक वारसा जपला जातोय याचा आनंद!
चंद्रशेखर सानेकर यांच्या या कार्यक्रमामुळे मराठी साहित्याचा समृद्ध वारसा जपला जातोय, याचा आम्हाला ग्रंथाली समूह म्हणून आनंद होतोय. अशा कार्यक्रमांमुळे लेखकांना त्यांचे लिखाण सादर करण्यासाठी एक समृद्ध व्यासपीठ मिळत आहे. यामुळे साहित्य हे एकाचवेळी ऐकण्याचे, अनुभवण्याचे आणि परसपरांमध्ये संवाद घडवणारे माध्यम म्हणून समोर येते.
- सुदेश हिंगलासपूरकर, विश्वस्त, ग्रंथाली