दर्याखोर्यांच्या कुशीत लपलेलं, काळाच्या कितीतरी पल्याडचं एक गूढ दालन म्हणजे भीमबेटका. येथे पावलापावलावर इतिहास सजीव होतो आणि शिळांवर उमटलेल्या रेषा आपल्याला आदिमानवाच्या जगात नेऊन ठेवतात. झाडाझुडपांच्या सावलीत दडलेली ही शैलाश्रय फक्त चित्र नाहीत, तर ते त्या काळच्या माणसाचं जगणं, त्याच्या भावना, आणि निसर्गाशी असलेलं नातं यांची मौनगाथाच आहे. या मौनगाथेचा घेतलेला हा आढावा....
आपण आतापर्यंतच्या लेखांमध्ये वेगवेगळी मंदिरे-शिल्प बघितली. यानंतरही अगदी भारताबाहेरच्या काही हिंदू मंदिरांचा परिचय आपण करून घेणार आहोत. मानवी संस्कृतीशी निगडित वारसा सुरक्षित राहावा, या विचाराने आपण दि. 18 एप्रिल रोजी ‘जागतिक वारसा दिवस’ साजरा करतो. या अनुषंगाने आपण एका वेगळ्या वारसा स्थळाचा विचार या लेखात करणार आहोत. आपण बघत असलेल्या भव्य वास्तू आपल्या आचार्य, स्थपती यांनी उभ्या केल्या. आपल्या कलाकारांनी उत्तम शिल्प घडवली. हे सर्व वैभव उभे करत असताना, त्या माध्यमातून ही लोकं व्यक्त होत गेली. कलाकाराचे व्यक्त होणे हे नक्की कधी सुरू झाले? याचा मागोवाही आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत.
यासाठी आपल्याला जायचे आहे ते थेट मध्य प्रदेशमध्ये. भोपाळपासून साधारण 40 किमी अंतरावर विंध्य पर्वतरांगांमध्ये, रत्नपाणी वन्यजीव संरक्षित जंगलामध्ये दिमाखात उभी असणारी जागा म्हणजे भीमबेटका. इतिहासात थोडाफार उल्लेख असलेल्या या जागेला, 1958 साली उज्जैनच्या ‘पद्मश्री’ डॉ. विष्णू श्रीधर उर्फ हरिभाऊ वाकणकर या अवलियाचा परिसस्पर्श झाला आणि या सांस्कृतिक वारसा स्थळाचे खरे वैभव, जगासमोर मोकळे झाले. या जागेचे मानवी इतिहासातले महत्त्व लक्षात घेऊन, 2003 साली भीमबेटकाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश केला गेला.
14 वर्षांच्या अथक अभ्यासात या परिसरातील 700पेक्षा जास्त शैलाश्रय म्हणजे आदिमानव राहत होता त्या गुहा, हरिभाऊंनी शोधून काढल्या. यामध्ये पुण्यातल्या डेक्कन महाविद्यालयाचादेखील मोलाचा सहभाग आहे. या 700 शैलाश्रयांपैकी 400पेक्षा अधिक शैलाश्रय ही चित्रित आहेत, म्हणजेच या गुहांमध्ये आदिमानवाने वेगवेगळी चित्रे काढलेली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रांकित असलेली शैलाश्रये, ही जगभरामध्ये खूप दुर्मीळ असून, त्यापैकी एक स्थान म्हणजेच भीमबेटका. मागच्या सलग लाख-दीड लाख वर्षांपासून, हे मानवी वस्तीचे ठिकाण आहे. अशा पद्धतीने सलग मानवी वस्ती असणारे भीमबेटका, हे जगातील दुर्मीळ स्थानांपैकी एक आणि भारतातील तर एकमेव स्थान आहे, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
या शैलाश्रयांपैकी काहीच शैलाश्रय आपल्याला बघता येतात, तेथील बोलकी चित्रे बघता येतात. यासाठी पुरातत्त्व खात्याकडूनच व्यवस्थित मार्ग आखून देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी लोकांचा हस्तक्षेप होऊ नये म्हणून, छोटे बॅरिकेट्स लावलेले आहेत. हा लेख लिहिण्यामागे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे, भिमबेटका या ठिकाणी मी सगळ्यात पहिल्यांदा 2014 मध्ये गेलो आणि त्यानंतर 2024 पर्यंत, अनेकदा या ठिकाणी जाण्याचा योग आला. या प्रत्येक भेटीमध्ये, चित्रांचे रंग काहीसे फिकट झाल्यासारखे जाणवले. कदाचित अजून काही वर्षांनंतर यातली अनेक चित्रे, ही फक्त आधी काढलेल्या फोटोंमध्येच शिल्लक राहतील. तर, ती वेळेत सर्वांना बघण्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा लेख प्रपंच.
मुख्य प्रवेशद्वारामधून आत प्रवेश केल्यावर, थोडे चालल्यावर समोर 20 मीटर उंचीचा एक मोठा खडक दिसतो. याच खडकाच्या खालीच अनेक उत्खनने झालेली आहेत आणि त्यात दीड लाख वर्षे जुना मानवी सांगाडासुद्धा मिळाला आहे. इथे वरच्या बाजूला, हत्तीची वगैरे चित्रे काढलेली दिसतात. या बाजूने आत पुढे चालत गेल्यानंतर, डॉ. हरिभाऊ वाकणकरांनी ज्या गुहेला सभागृह म्हटले आहे ती गुहा दिसते आणि मग, त्याला सभागृह का म्हटले आहे हे आपल्या लक्षात येते. 39 मीटर लांब, चार मीटर रुंद आणि 17 मीटर उंच अशी ही प्रचंड मोठी गुहा आहे. इथेच एका बाजूला, त्या दगडांमध्ये तयार केलेले छोटे छोटे खोलगट गोलाकार आकार (र्र्लीिीश्रशी) दिसतात. पुरातत्त्व अभ्यासकांनुसार, हे मानवनिर्मित गोलाकार खड्डे अगदी अडीच-तीन लाख वर्षे जुनेदेखील असू शकतात. या गुहेमध्ये, वेगवेगळ्या रंगांमध्ये चित्र काढलेली आहेत, ज्यात बिबट्या, हरीण, म्हैस, वाघ, हत्ती इत्यादी प्राणी आहेत. त्याचबरोबर इतर काही वेगवेगळ्या आकृती आणि काही मनुष्य आकृतीदेखील दिसतात. याचबरोबर एका लहान मुलाचा पंजादेखील काढलेला आहे. ही एखादी खूण किंवा सहीदेखील असण्याची शक्यता आहे.
इथून पुढे आपण, अजून एका वेगळ्या गुहेच्या बाजूला जातो. भव्य अशा गुहेमध्ये 453 आकृती आहेत आणि यापैकी 252 चित्रे, ही वेगवेगळ्या प्राण्यांची आहेत. कदाचित यामुळेच या गुहेला ‘झू रॉक’ हे नाव मिळाले असावे. अजून एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे, या चित्रांमध्ये 15 पेक्षा जास्त घोड्यांची चित्र आहेत आणि त्यातल्या अनेकांवर घोडेस्वारदेखील बघायला मिळतात. ‘सी-21’ नावाच्या गुहेवर, काही धार्मिक विधी सुरु असलेली चित्रे आपल्याला बघायला मिळतात. ‘सी-19’ नावाच्या दगडावर, एका भल्या मोठ्या रानडुकराचे चित्र काढलेले आहे. त्याच्या आजूबाजूला काढलेली माणसे, ही त्या मानाने खूप खुजी काढलेली आहेत. माणसांपेक्षा भव्य दिव्य काढलेला हा प्राणी, कदाचित त्या काळच्या लोकांमधला कुणीतरी पवित्र, दिव्य कथांमधला प्राणी असावा. अशाच एका भव्य आणि वेगळ्या प्राण्याची चित्रे, शेजारच्या गुहांवरतीदेखील बघायला मिळतात.
या सर्व गुहांमध्ये काढलेली चित्रे ही फक्त काही प्राणी आणि शिकारीचे काही प्रसंग एवढ्यापुरतीच मर्यादित नसून, मानवी आयुष्याची निगडित वेगवेगळ्या घटना आणि पैलूदेखील या ठिकाणी चित्रित केलेले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या कालखंडामध्ये, मानवाशी निगडित असणार्या धार्मिक संकल्पनादेखील या चित्रांमधून व्यक्त होतात.
आपण वर जी काही चित्रे बघितली, त्यातली काही चित्रे ही अगदी 15 ते 17 हजार वर्षे जुनी आहेत. माणसाचे व्यक्त होणे हे नक्की कधी सुरू झाले? याचा अगदी प्राथमिक विचार जरी करायचा झाला, तरी आपल्याला कमीत कमी एवढी वर्षे मागे जावे लागेल. त्या गुहांमध्ये राहणार्या माणसाने ही चित्रे का काढली? याच्यावरदेखील खूप विचार झाला. कुठले प्राणी हे घातक ठरू शकतात? कुठल्या प्राण्यांची आपण शिकार करतो? हे आपल्या येणार्या पिढ्यांना कळावे, कदाचित यासाठी ही चित्रे काढली असावीत. या चित्रांच्या पाठीमागे, त्या काळच्या माणसांची धार्मिक कारणेदेखील असू शकतात. शिकारीसाठी बाहेर पडताना आपल्याला यश मिळावे आणि ती शिकार आपण परत सगळ्यांसाठी घेऊन येऊया, भावनेतूनदेखील ही चित्रे निर्माण झाली असावीत. गोष्टी सांगण्यासाठीदेखील यातल्या अनेक चित्रांचा वापर केला गेला. पण, या सगळ्यातून एक गोष्ट मात्र खूप प्रकर्षाने आपल्याला जाणवते, ती म्हणजे त्या काळच्या माणसाचे व्यक्त होणे! रंग बदलले, माध्यमे बदलली आहेत, शैलीमध्ये फरक पडला आहे; पण आपले व्यक्त होणे थांबलेले नाही. या कलेचे मूळ आपल्या सर्वांच्या लक्षात यावे, म्हणून आज भीमबेटकाची ओळख तुम्हाला सर्वांना करून दिली.
साधारण जुलैपासून ते मार्चपर्यंत या भागामध्ये आपण जाऊ शकतो. बाकीच्या काळातदेखील जाऊ शकतो. पण, हवामान आपल्याला साथ देत नाही. मुख्य रस्ता सोडून एकदा आपण आतमध्ये वळलो की, खायला प्यायला काहीही मिळत नाही, हे मात्र सर्वांनी नक्की लक्षात घ्या.
इथूनच जवळ भोजराजाने बांधलेले प्रचंड मोठे, पण अर्धवट राहिलेले मंदिरसुद्धा आहे. सांची, विदिशा, उदयगिरी ही अत्यंत महत्त्वाची वारसा स्थळेदेखील याच भागांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. भीमबेटक्याला जाताना, ही ठिकाणेदेखील बघायला विसरू नका!
इंद्रनील बंकापुरे
7841934774
heritagevirasat@gmail.com