ठाणे - बोरीवली भुयारी मार्गाचा विरोध तुर्तास शमला

- एमएमआरडीए आणि रहिवाश्यांच्या बैठकीत खा. म्हस्के यांची यशस्वी शिष्टाई

    19-Apr-2025
Total Views | 11
 
Opposition to Thane-Borivali subway
 
ठाणे: ( naresh mhaske on Opposition to Thane-Borivali subway ) ठाणे - बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पाला होत असलेला विरोध अखेर शमला आहे. शनिवारी मानपाडा येथील सभागृहात एमएमआरडीए आणि रहिवाश्यांच्या बैठकीत खा. नरेश म्हस्के यांनी यशस्वी शिष्टाई केल्याने रहिवाश्यानी तुर्तास नमते घेतले.
 
मात्र, रहिवाश्यांनी आपल्या विविध मागण्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधीसमोर मांडल्या. त्यावर प्रत्येक सोसायटीमधील सदस्य एकत्र येऊन एक कमिटी तयार करण्यात येणार असुन, त्या कमिटीच्या माध्यमातून एमएमआरडीएच्या वरीष्ठ अधिका-यांपर्यंत म्हणणे पोहचवा, अशी सुचना करून खा. म्हस्के यांनी रहिवाशांनी केलेल्या मागणीनुसार उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना बजावले.
 
ठाणे - बोरीवली भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे. हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराखालून काढण्यात येणार असून त्याचे एक टोक ठाण्यातील मानपाडा येथील मुल्लाबाग भागात निघणार आहे. याठिकाणी सुमारे १२ हजाराहून अधिक नागरिक राहत आहेत. परंतु या कामामुळे होत असलेल्या धुळधाण व वाहतुक कोंडी विरोधात स्थानिक रहिवाशांनी आवाज उठवला. काही दिवसापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर शनिवारी स्थानिक रहिवासी, एमएमआरडीएचे अधिकारी, ठेकेदार आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली.
 
यावेळी एमएमआरडीएच्या वतीने या प्रकल्पाचे सादीरकरण करण्यात आले. त्यात येथील रहिवाशांच्या मागणीनुसार भुयारी मार्गाचे हे काम ९२ मीटर पुढे सरकविण्यात आल्याचा दावा यावेळी एमएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जांभळे यांनी केला. तसेच येथे २५०० मीटर पर्यंत हरीत पट्टा नष्ट झाला असला तरी टनेलच्या वरील बाजूस दोन टप्यात ५३०० मीटर हरित पट्टा विकसित केला जाणार असल्याचे सांगितले. तर रहिवाशांनी त्यांच्या आवारात वृक्ष लागवड करण्यास सांगितल्यास त्याठिकाणी देखील वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे खा. नरेश म्हस्के म्हणाले.
 
दरम्यान, प्रकल्पाला आमचा विरोध नसून गृहसंकुलाच्या येथून जाणारा रस्ता हा अरुंद झाला आहे. त्यामुळे येथील सोसायटीला संलग्न जोडरस्ता पूर्वी प्रमाणे ठेवण्यात यावा, टोल नाका पुढे हलविण्यात यावा आणि वृक्षांची कत्तल थांबवावी अशा प्रमुख मागण्या रहिवाशांनी केल्या.तसेच जो पर्यंत याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत येथील काम बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी देखील करण्यात आली.
 
ठेकेदारावर कारवाई करा
 
ठाणे - बोरिवली भुयारी कामामुळे रहिवाशांना धुळ आणि ध्वनी प्रदुषणास सामोरे जावे लागते. तेव्हा याला कारणीभुत असलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी असे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी दिले. तसेच रहिवाशांच्या मागणीनुसार अभ्यास करुन पुढील दिशा ठरविण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121