रोजगारसंधी वाढवण्यासाठी अधिकाधिक भाषा शिका!

- राज्यपालांचे विद्यार्थ्यांना आवाहन; कौशल्य विद्यापीठाचा वर्धापन दिन संपन्न

    19-Apr-2025
Total Views |

Governor on employment opportunities 
 
मुंबई: ( Governor on employment opportunities ) जगातील अनेक देश आज आपल्या कुशल कार्यबळाच्या पूर्ततेसाठी भारताकडे पाहत आहेत. मात्र अनेक देशात नोकरीसाठी तेथील भाषा येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवा वयातच अधिकाधिक अधिक भाषा शिकाव्या. जर्मन, जपानी, इटालियन, फ्रेंच यांपैकी किमान एक भाषा शिकावी, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी शनिवार, दि. १९ एप्रिल रोजी केले.
 
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा वर्धापन दिन सप्ताह विद्यापीठाच्या मुंबई येथील मुख्यालयात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. आपण अश्या राज्यातून येतो जेथे दुसरी भाषा शिकण्यास विरोध केला जात आहे. मात्र देशात हिंदी भाषा येणे आवश्यक आहे, असे सांगून आपणाला स्वतःला हिंदी भाषा येत नाही याची खंत वाटते असे राज्यपालांनी सांगितले. हिंदी भाषा बोलता आली, तर आपण गोर-गरीब जनतेच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो, असे सांगून जनसामान्यांच्या भावना जोवर समजून घेत नाही तोवर चांगला नेता होता येत नाही, असे राज्यपालांनी सांगितले.
 
कौशल्य विद्यापीठाच्या युवा विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपाल म्हणाले की युवकांना जपानला जायचे असेल तर अगोदर जपानी भाषा शिकून घ्यावी, जर्मनीला जायचे असेल तर जर्मन भाषा शिकावी. त्यामुळे नोकरी व्यवसाय करणे सुलभ होते,असे त्यांनी सांगितले. जर्मनीमध्ये दंतवैद्यकाची अपॉइंटमेंट मिळण्याकरिता सहा सहा महिने थांबावे लागते. याकरिता आपल्या डॉक्टरांनी विदेशी भाषा शिकाव्या, असे सांगून आपण राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरुंना जर्मन, फ्रेंच, इटालियन आदी भाषा शिकण्यास वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे सांगितले असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. लहान वयात भाषा शिकल्यास ती मोठेपणी संपदा ठरेल असे राज्यपालांनी सांगितले.
 
मंत्री लोढांनी मानले राज्यपालांचे आभार
 
- कौशल्य विद्यापीठाने आपल्या स्थापनेपासून कमी काळात जागतिक बाजारपेठेच्या गरज लक्ष्यात घेऊन अभ्यासक्रम सुरु केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने उद्योग जगतातून तज्ज्ञांना 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस' म्हणून नियुक्त केल्यामुळे विद्यापीठाला उद्योग जगताच्या कौशल्य गरजांची माहिती होईल असे राज्यपालांनी सांगितले.
 
- कौशल्य विभागाशी निगडित विद्यापीठाला भेट देऊन राज्यपालांनी युवकांना तसेच शिक्षक व बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपालांचे आभार मानले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठातील प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, शिक्षक व बिगर शिक्षक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सत्कार करण्यात आला तसेच नवीन कल्पकता स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.