पुणे भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल
19-Apr-2025
Total Views |
मुंबई (Chandrashekhar Bawankule) : पुणे जिल्ह्यातील भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराच्या एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. जमिनीच्या मोजणी आणि हद्द निश्चितीच्या कामासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपांनंतर भूमी अभिलेख विभागाचे उप-अधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटोळे यांच्या विरोधात पुणे शहरातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रकरणाची तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई केली.
तक्रारदाराने पुणे ग्रामीण भागातील एका शेतजमिनीच्या मोजणी आणि हद्द निश्चितीच्या प्रक्रियेसाठी २०२३ पासून भूअभिलेख विभागाकडे सातत्याने अर्ज केले होते. मात्र, उप-अधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटोळे यांनी वारंवार टाळाटाळ केली. याच दरम्यान, या दोन्ही अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे जमिनीच्या कामासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. एवढेच नव्हे, तर “हेलिकॉप्टर शॉट लावतो” अशी धमकी देऊन तक्रारदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्नही केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
महसूलमंत्र्यांकडे तक्रार, तातडीने कारवाई
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार केली. बावनकुळे यांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत पुणे जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, पुणे शहरातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी केली. चौकशीत तक्रारदाराच्या आरोपांना पुष्टी मिळाल्यानंतर अमरसिंह पाटील आणि किरण येटोळे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाने पुणे जिल्ह्यातील भूअभिलेख आणि भूसंपादन विभागातील भ्रष्टाचाराच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
“राज्य सरकार भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाईसाठी कटिबद्ध आहे. भूअभिलेख आणि भूसंपादन विभाग हा सामान्य नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे. अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल.”