मराठी भाषेशी तडजोड नाही, पण हिंदीसुद्धा...; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

    19-Apr-2025
Total Views |
 
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : मराठी भाषेबद्दल कुणीचीही तडजोड नाही. पण हिंदी भाषासुद्धा प्रत्येकाला आली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, १९ एप्रिल रोजी दिली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या अस्मितेची भाषा आहे. मराठी भाषा प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे. यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. मराठी ही सर्वांची भाषा व्हावी अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. पण यावर राजकारण सुरु आहे. काल मी बोलताना चुकून हिंदीला राष्ट्रभाषा ऐवजी राजभाषा बोललो. यावरही काही लोकांनी टीका केली. देशात एखादे विकासाचे पाऊल घेतल्यास त्याला थांबवण्याचे काम होते. महाराष्ट्रात मराठीच आमची भाषा असावी, ही आमची भाषा आहे."
 
 
ते पुढे म्हणाले की, "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, हिंदी विषय असेल. अभ्यासक्रमात हिंदी विषय आला असल्यास त्यावर एवढे मोठे राजकारण करणे, आंदोलन करणे, लोकांना मारपीट करणे हे योग्य नाही. मराठी भाषेबद्दल कुणीचीही तडजोड नाही. पण हिंदी भाषासुद्धा प्रत्येकाला आली पाहिजे. देशातील कुठल्याही भागात गेल्यावर काही लोक हिंदी, इंग्रजी, तामिळ भाषेत बोलतात. त्यामुळे किमान एक कॉमन भाषा असावी. हिंदी ही राजभाषा साधारणपणे सर्वांना येत असते. देशातल्या ६० टक्के राज्यातील कारभार हिंदीत चालतो. त्यामुळे त्या त्या राज्यातील भाषेची अस्मिता टिकवून हिंदी भाषा आली पाहिजे यात काही गैर नाही," असेही ते म्हणाले.
 
राज ठाकरेंनी समजून घ्यावे!
 
"राज ठाकरे समजूतदार आहेत. त्यांनी हा विषय समजून घेतला पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एखादा विषय आला असल्यास काय बिघडले? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणण्यामागचा उद्देष समजून घेतला पाहिजे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.