नक्षलवाद्यांमध्ये घबराट कायम, छत्तीसगढमध्ये २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

    19-Apr-2025
Total Views | 9
 
22 Naxalites surrender in Chhattisgarh
 
नवी दिल्ली: ( 22 Naxalites surrender in Chhattisgarh ) केंद्र सरकारच्या नक्षलविरोधी धोरणामुळे नक्षलवाद्यांमध्ये घबराट पसरली आहे. छत्तीसगडमधील सुकमा येथे शुक्रवारी पोलीस अधीक्षक (एसपी) किरण चव्हाण यांच्या उपस्थितीत नऊ महिलांसह बावीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
 
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ४० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. एका नक्षलवादी जोडप्यासह २२ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुकमा येथील एसपी किरण चव्हाण, सीआरपीएफचे डीआयजी आनंदसिंग राजपुरोहित यांच्यासमोर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षलवादी मुचाकी जोगा (३३) आणि त्यांची पत्नी मुचाकी जोगी (२८) यांनी जिल्ह्यातील सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले, ज्यांच्यावर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस होते. नक्षलवादी जोगा हा नक्षलवाद्यांच्या पीएलजीए कंपनी क्रमांक एकचा डेप्युटी कमांडर आहे आणि जोगी ही सदस्य होती.
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आत्मसमर्पण करणाऱ्या २२ नक्षलवाद्यांमध्ये किकिद देवे (३०) आणि मनोज उर्फ दुधी बुधरा (२८) यांचा समावेश आहे, ज्यांच्या डोक्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. सरकारने माडवी भीमा (30), माडवी सोमडी (48), संगिता (24), माडवी कोसी (24), वंजाम सनी (24), माडवी मांगली (35) आणि ताती बंदी (35) यांच्यावर प्रत्येकी 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यासोबतच नक्षलवादी पुनीम जोगा वर ५० हजार रुपयांचे बक्षीस आहे.
 
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये ९ महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. सर्व नक्षलवादी माड विभाग आणि नुआपाडा विभागात सक्रिय होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारच्या नवीन पुनर्वसन धोरणांतर्गत सर्व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी ५०,००० रुपये देण्यात आले आहेत.
 
एन्काउंटरचे भय आणि नक्षल विचारांपासून भ्रमनिरास
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ अखेर नक्षलवाद संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, राज्य पोलिस आणि केंद्रीय पोलिस दले नक्षलप्रभावित राज्यांमध्ये कठोर कारवाई करत आहेत. सुरक्षादले मोठ्या प्रमाणात एन्काउंटर करून नक्षलवाद्यांचा खात्मा करत आहेत, त्यामुळे नक्षलवाद्यांमध्ये घबराट पसरली आहे. त्याचवेळी शरणागती पत्करणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी प्रभावी पुनर्वसन योजनाही राबविण्यात येत आहेत. परिणामी घाबरलेले आणि नक्षल विचारसरणीपासून भ्रमनिरास झालेले नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121