अहार, निद्रा, भय, मैथुन या नैसर्गिक वैशिष्ट्यांचा उपजत अंतर्भाव असलेला माणूस हाही एक प्राणी आहे,’ असे भगवद्गीता सांगते. गमतीचा भाग असा की, दि. 27 नोव्हेंबर 1967 रोजी भायखळा येथील रुग्णालयात एका बाळाने जन्म घेऊन हा आध्यात्मिक सिद्धांत सत्यात उतरवण्याचा प्रयत्न आपल्या जन्मापासूनच केला. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात!’ या म्हणीप्रमाणे, भावी आयुष्यात लिखित गोष्टींशी त्याचा कायम संबंध राहील, याचे जणू काही ते सूतोवाच होते. नितीन हिरवे हे त्यांचे नाव
मुंबईतील लालबागच्या गिरणगावात नितीन यांचे बालपण गेलेे. वडील गिरणी कामगार असल्याने त्यांची तुटपुंजी कमाई. दहा बाय बाराच्या खोलीतला मोठा कुटुंबकबिला. अशा दारिद्य्र रेषेखालील सर्व बाबी असल्या तरी संस्कारांची श्रीमंती या मुलाने तशी पुरेपूर उपभोगली. मोलमजुरी करणार्या, भाजीविक्रेत्या आईने त्यांच्यावर श्रमसंस्कार केले. वडील आध्यात्मिक प्रवृत्तीचे. ते कायमच धार्मिक ग्रंथांचे वाचन करीत असत. विशेषतः श्रावण महिना आणि चातुर्मासात आसपासच्या मंदिरांमध्ये जी पारायणे होत, त्यामध्ये त्यांच्या रसाळ वाणीतून सुश्राव्य निरूपण ऐकत असताना हे बाळ वडिलांच्या मांडीवरच झोपी जात असे. जाणिवेच्या पातळीवरील ही श्रवणभक्ती सातत्याने बाळाच्या नेणिवेच्या पातळीवर पोहोचली आणि त्यातून त्यांची आध्यात्मिक प्रकृती आणि कष्टकरी पिंड जोपासला गेला.
नितीन यांना कल्याणदास वाडीतील ‘श्रीराम बालमित्र मंडळा’ने सुसंस्कारित करून त्याच्या आयुष्याचे कल्याण केले; तर ‘श्रीस्वयंभू रामेश्वर क्रीडा मंडळा’ने त्यांच्यातील सुप्त क्रीडागुणांना मुक्त वाव दिला. ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळा’ने विवेकानंद व्याख्यानमालेच्या माध्यमातून त्याच्या सांस्कृतिक अभिरुचीची पायाभरणी केली. लालबाग-परळची ती कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकवस्ती असली, तरी तेथील सांस्कृतिक वातावरण उच्च दर्जाचे होते. ‘सोशल सर्व्हिस लीग’ वाचनालयाच्या बालविभागाचा हा बालवाचक अजाणत्या वयात जाणिवांनी समृद्ध झाला. पुढील काळात पत्रकार नंदकुमार पांचाळ या ज्येष्ठ मित्राने दिवाळी अंकाच्या वाचनालयात सहभागी करून त्यांना निष्ठावान वाचक केले. इयत्ता सातवीत असताना शाळेतील हस्तलिखित ‘बालमित्र’ अंकाचे संपादन करण्याची सुवर्णसंधी म्हणजे नितीन यांच्या भावी सांस्कृतिक भावविश्वाची जणू पहिलीच पायरी होती.
‘चिंचपोकळी दक्षिण गणेशोत्सव मंडळा’ने त्यांच्यातील सार्वजनिक कार्यकर्त्याला घडवले. ‘आयडियल स्तंभ मंचा’ने त्यांना संस्कारक्षम वयात अनेक प्रथितयश साहित्यिकांचे दर्शन घडविले. चंदू आणि शशी रेडिओ यांच्या साऊंड सिस्टिमने त्यांना जुन्या गाण्यांची अवीट गोडी लावली. लालबागमधील जयंत, अविनाश, प्रमोद, मिलिंद, नंदू अशा जीवाभावाच्या मित्रांनी नितीन यांच्या आयुष्यातील अनेक क्षण संस्मरणीय केले आहेत; तर शैलेश गोसावी आणि अतुल फणसे या मित्रांच्या जोडगोळीच्या सान्निध्यात ‘भावसरगम’, ‘चैत्रबन’, ‘अक्षयगाणी’, ‘मंगलगाणी दंगलगाणी’ अशा अफाट लोकप्रियता लाभलेल्या कार्यक्रमांसाठी शिवाजी मंदिर, दामोदर मंदिर, रंगमंदिर यांच्या वार्या ते करू लागले. एक होतकरू आयोजक म्हणून नितीन यांची वाटचाल सुरू झाली; तर जयहिंद सिनेमा, भारतमाता सिनेमागृह, गणेश सिनेमा यांनी नितीन यांच्या चित्रपटांच्या छंदाला खतपाणी घातले.
1987 साली मराठी साहित्यविश्वात एक भाग्यकारक घटना घडली. वि. वा. शिरवाडकर यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या समारंभाचे साक्षीदार होण्याचे भाग्य नितीन यांना लाभले. तात्यासाहेब शिरवाडकरांनी त्यावेळी आत्मीयतेने केलेली विचारपूस त्यांना सुखावून गेली. कविवर्य अरुण म्हात्रे यांच्यासोबत अक्षरचळवळीचा उपसंपादक म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल तात्यासाहेब शिरवाडकरांनी घेतली. ‘अक्षरवाड्मया’त नवकवींच्या कवितासंग्रहांची निर्मिती करण्याची त्यांची सूचना त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. याबरोबरच त्यांच्या अंतरंगातील सामाजिक कार्यकर्ता हिरिरीने सामाजिक घटना, प्रसंगांमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला उद्युक्त करीत होता. ‘मातृभूमी सेवा संघा’च्या या क्रियाशील संस्थापक सदस्याने त्या प्रेरणेतूनच दि. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवक म्हणून त्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्याची संधी घेतली.
1994 साली प्रवीण दवणे यांच्या ‘दिलखुलास’ या साहित्य उपक्रमाने त्यांच्या ‘गप्पोत्सवा’ची सुरुवात झाली. त्यांनी केलेले ‘संवेदना गप्पोत्सव’ हे त्या कार्यक्रमाचे नामकरण त्यांच्या संवेदनशील मनाला भावले आणि त्यातूनच 1995 साली ‘संवेदना प्रकाशन’ या संस्थेची पायाभरणी झाली. तात्यासाहेब शिरवाडकरांचे आशीर्वाद, अफाट कष्ट उपसण्याची तयारी, अर्धांगिनी नीताची भक्कम साथ हेच ‘संवेदना’चे खरे भांडवल होते. शंकर वैद्य, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, व. पु. काळे, शं. ना. नवरे, गझलनवाज भीमराव पांचाळे, ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक, साहित्यिक नारायण जाधव अशा अनेक दिग्गजांनी या धडपडणार्या होतकरू प्रकाशकाला पाठबळ दिले.
‘संवेदना प्रकाशना’ने आपली विजयी घोडदौड सातत्याने कायम राखली आहे. दि. 27 नोव्हेंबर रोजीचा हा त्यांचा जन्मदिवस आणि ‘संवेदना प्रकाशना’ची 30 वर्षांची यशस्वी वाटचाल हा एक सुवर्णकांचन योग साधला गेला. 2006 साली ‘अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था’, पुणे तसेच मुंबई येथील ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळा’चा विशेष सन्मान, 2010 साली ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’चा महासाधू मोरया गोसावी पुरस्कार’, 2018 साली ‘कलारंग चिंचवड’चा ‘कलासंगम आणि नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळा’चा विशेष सन्मान, 2020 साली मुंबई येथील ‘विनायक पाटील स्मृती मंच सन्मान’, 2021 साली ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान’, 2022 साली ‘कलाक्षम मुंबई आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी पुरस्कार’, नुकताच दि. 6 एप्रिल 2025 रोजी मुंबईतील ‘श्रीराम बालमित्र मंडळा’ने आपल्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केलेला विशेष सन्मान अशा विविध पुरस्कार, मानसन्मान यांनी ही वाटचाल गौरविण्यात आली आहे.
माणूस हा जन्माच्या वेळी अध्यात्माच्या निकषांवर प्राणी म्हणून गणला जात असला, तरी सुसंस्कारांमुळे आपली बुद्धिमत्ता, प्रतिभा, विवेक, सर्जनशीलता या सद्गुणांच्या साहाय्याने तो एक संवेदनशील माणूस म्हणून ओळखला जातो, असेही अध्यात्म सांगते. नितीन हिरवे यांनी सुसंस्कारांतून आपले माणूसपण सिद्ध केले आहे. त्यांच्या भविष्यातील कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!
- अतुल तांदळीकर