अमेरिका – भारत मैत्री पुढे नेण्यास भारत कटीबध्द – पंतप्रधान नरेंद्र मोदी

एलॉन मस्क यांच्याशी साधला संवाद, पंतप्रधानांचे महत्वाचे ट्विट

    18-Apr-2025
Total Views |
modi
 
नवी दिल्ली : अमेरिका आणि भारत यांच्यातील मैत्री अधिक दृढ करण्यास भारत कटीबध्द आहे, असे सांगत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अमेरिका संबंधांची दिशा स्पष्ट केली. या गोष्टीबाबत ट्विटरवर माहिती देत पंतप्रधानांनी यावर भाष्य केले आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी जगातील सर्वात प्रसिध्द उद्योगपतींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधल्याचे सांगितले आहे.
 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये याबद्दल माहिती देताना म्हटले की “एलॉन मस्क यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला, या चर्चेत अमेरिका दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेतील विषयांचाही समावेश होता. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील सहकार्य दृढ होण्यासाठी प्रचंड वाव असून त्यामध्ये मोठा वाटा हा तंत्रज्ञान आणि नाविन्यतेचा असणार आहे. या महत्वाच्या विषयांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटीबध्द आहे” असे आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
 
सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत चीन आणि अमेरिका या दोन बलाढ्य राष्ट्रांत सुरु असलेल्या व्यापारयुध्दाने चिंतेचे वातावरण पसरले आहे. अमेरिकेने २ एप्रिल रोजी भारतासह जगातील ७० देशांवर वाढीव आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यानंतर त्यांनी चीन सोडून इतर सर्व देशांवरील वाढीव आयातशुल्कास स्थगिती दिली होती. यामुळे चीडीस पेटून चीननेही अमेरिकेवर आयातशुल्क लादण्याचे अस्त्र उपसले होते. सध्या अमेरिकेकडून चीनी वस्तुंवर २४५ टक्के आयातशुल्क लादण्यात आले असून त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनकडून अमेरिकेवर १२५ टक्के आयातशुल्क लादण्यात आले आहे. या दोन मोठ्या अर्थसत्तांमधील या व्यापारयुध्दाने जागतिक अर्थव्यवस्थेवर चिंतेचे काळे ढग पसरले आहेत.