आणखी एक कंपनी घोटाळा, जेन्सोल इंजीनीयरिंग मध्ये गैरव्यवहारांचा आरोप
एकाच वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ९० टक्क्यांची घसरण
18-Apr-2025
Total Views | 10
नवी दिल्ली : भारतीय उद्योगक्षेत्रात आणखी एका घोटाळ्याने जोरदार खळबळ माजवली आहे. इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रातील एक स्टार्टअप असलेल्या जेन्सोल इंजीनीयरिंग या कंपनीतीच्या प्रवर्तकांनी कंपनीच्या पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी शेअर बाजारातही गुंतवणुकदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचाही आरोप या कंपनीच्या प्रवर्तकांवर आहे. शेअर बाजार नियंत्रक असलेल्या सेबीकडून या कंपनीच्या प्रवर्तकांवर कारवाई करण्यात आली आहे. शेअर बाजारात यामुळे जोरदार खळबळ उडाली असून गेले काही महिने सातत्याने घसरत असलेल्या जेन्सोल कंपनीचे शेअर्स आता ९० टक्क्यांपर्यंत घसरली आहे.
नक्की काय आहे जेन्सोल इंजीनीयरिंग घोटाळा
भारतातील शेअर बाजार नियंत्रक कंपनी असलेल्या सेबीने कारवाई करताना दिलेल्या कारणांमध्ये या कंपनीचे प्रवर्तक असलेल्या अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी यांच्यावर कंपनीच्या पैशांचा अपव्यवहार केल्याचा आरोप आहे. प्रामुख्याने या कंपनीच्या इव्ही म्हणजे इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीमध्ये झालेला हा घोळ आहे. जेन्सोल कंपनीचा ब्लूस्मार्ट हा ओला -उबेर सारखी ऑनलाईन वाहक सेवा पुरवणारा ब्रँड आहे. याच ब्रँडसाठी कंपनीकडून इलेक्ट्रीक कार खरेदीसाठी ९७७ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. यापैकी ६६३ कोटी रुपयांना ६४०० वाहनेच खरेदी करणे अपेक्षित होते. परंतु ४७०४ इतकीच वाहने खरेदी करण्यात आली.
जग्गी बंधूंवर नेमके आरोप काय आहेत?
या कंपनीचे प्रवर्तक असलेल्या जग्गी बंधूंवर या रकमेचा गैरव्यवहार करण्याचा आरोप आहे. ही उरलेली रक्कम या दोघा बंधूंनी आपल्या नातेवाईकांशी संबंधित खात्यांमध्ये वळवण्यात आले आहेत. या रकमेचा उपयोग या नातेवाईकांकडून रिअल इस्टेट मध्ये गुंतवणुक करण्यासाठी करण्यात आला असा संशय आहे.
सेबीची कारवाई काय आहे ?
सेबीने जेन्सोल इंजीनियरिंगच्या दोघा प्रवर्तकांवर कंपनी व्यवस्थापनात कुठलेही पद भूषवण्यास बंदी घातली आहे. तसेच कंपनीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा अहवाल सहा महिन्यांत येणे अपेक्षित आहे.