क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकामध्ये तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18-Apr-2025
Total Views | 12
पुणे : क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकामध्ये तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करण्यात आला आहे. प्रत्येकाने हे स्मारक पाहायलाच हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, १८ एप्रिल रोजी केले. क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकाचे लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकातं पाटील, मंत्री जयकुमार रावल, अण्णाजी बन्सोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकामध्ये तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करण्यात आला आहे. चापेकर बंधूंच्या जीवनातील चौदा प्रसंग इथे पाहायला मिळतात. त्यासाठी अतिशय सुंदर पुतळे तयार करण्यात आले असून ते बघितल्यावर प्रत्यक्ष ती व्यक्तीच तिथे बसली आहे, असे वाटते. यासोबतच हा परिवार, त्यांचे संस्कार, विचाराची पद्धत या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात."
"लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हजारों क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. त्यांच्या सळसळत्या रक्तामध्ये स्वातंत्र्य लक्ष्मीची अर्चना तयार केली. टिळकांनी मांडलेला हा विचार चापेकर बंधूंच्या डोक्यात जाऊन बसला आणि यातूनच त्यांनी गोंद्या आला रे आला अशा घोषणा देऊन रॅण्डचा वध केला. चापेकर बंधू पकडले गेले नसते. पण आपल्याकडे फितुरांचा इतिहास असून तिथेही अशीच फितुरी झाली आणि ते पकडले गेले. पण त्यानंतरही चापेकर बंधूंचा लढा सुरु राहिला. चापेकर बंधू छत्रपती शिवरायांच्या चरित्राने भारावले होते. त्यांनी त्यांच्यावर पोवाडे रचले. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात चापेकर बंधूंनी केलेला रॅण्डचा वध हा क्रांतीकारकांच्या इतिहासात वॉटरशेड मुव्हमेंट आहे. त्यातून इतिहास पूर्णपणे बदलला. दुर्देवाने केवळ बोटांवर मोजण्याइतक्या क्रांतीकारांच्या गाथा आपल्याला माहिती होत्या. पण पंतप्रधान मोदीजींनी देशभरातील साडेबारा हजार क्रांतीकारकांच्या कथा आणि गाथा शोधून काढत आपल्यापर्यंत पोहोचवल्या," असेही ते म्हणाले.