सध्या काही लोकांना उद्योग राहिले नाही म्हणून...; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोचक टोला

    18-Apr-2025
Total Views |
 
Ajit Pawar
 
पुणे : सध्या ज्यांना उद्योग नाहीत ते भाषेवरून वाद घालतात आणि त्यातच ते वेळ घालतात, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आले. परंतू, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयाला जाहीर विरोध दर्शवला आहे. यावर अजितदादांनी प्रतिक्रिया दिली.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "सध्या कुणाला उद्योग नाहीत. मराठी आपली मातृभाषा आहेच. त्याबद्दल कुणाचे दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली आपली मातृभाषा असते. त्याबद्दल आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा असतो. तो टिकला पाहिजे. पंतप्रधान मोदी साहेबांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. खूप वर्षे हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होते. परंतू, कुणीही ते करण्याचे धाडस दाखवले नाही. एनडीए सरकारने आणि मोदी साहेबांनी ते दाखवले. आता मरीन ड्राईव्हला मराठी भाषा भवन ही चांगल्या प्रकारची वास्तू तयार करण्याचे ठरवले आहे."
 
हे वाचलंत का? -  क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकामध्ये तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
नवीन पीढीला मराठी आलेच पाहिजे!
 
"जगात सर्वात जास्त इंग्रजी भाषा बोलली जाते. महाराष्ट्रात राहायचे असल्यास नवीन पीढीला मराठी आलेच पाहिजे. भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये हिंदी पण चालते. काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा आहे, पण त्यावर वाद आहे. मला त्या वादात शिरायचे नाही. सध्या ज्यांना उद्योग नाहीत ते असे वाद घालतात आणि त्यातच ते वेळ घालतात. जगात बहुतेक देशात इंग्रजी चालते. त्यामुळे ती सुद्धा आली पाहिजे. तिन्ही भाषेला महत्व आहे. पण शेवटी आपल्या मातृभाषेला पहिल्या नंबरचे स्थान आहे. समोरच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांना कुठलाही मुद्दा राहीलेला नाही," अशी टीकाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.