'Where ideas have no limit' असे म्हणत, गेली दहा वर्षे पराग गोरे आपल्या ‘बिझनेस आयकॉन’ या कार्यक्रमाद्वारे अनेक उद्योजकांना त्यांच्या उद्योगांचे रुपांतर एका मोठ्या ब्रॅण्डमध्ये करण्यासाठी साहाय्य करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत तब्बल 500 हून अधिक उद्योगांना यासाठी मदतदेखील केली. त्यानिमित्ताने ही ‘ब्रॅण्डनिर्मिती’ नेमकी कशी होते आणि त्याचे एकूणच उद्योगक्षेत्रात महत्त्व काय, या विषयावर पराग गोरे यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.
‘बॅ्रण्ड’ या संकल्पनेशी आपण सुपरिचित आहोत. पण, या ब्रॅण्डची जडणघडण, ‘ब्रॅण्डनिर्मिती’ ही प्रक्रिया म्हणजे नेमके काय?
मुळात ‘ब्रॅण्डबिल्डिंग’ म्हणजेच ‘ब्रॅण्डनिर्मिती’ ही प्रक्रिया सर्वच उद्योजकांनी समजून घेतली पाहिजे. सध्या आपल्याकडे एक ट्रेंड आहे, तो म्हणजे कुठून तरी सोशल मीडियावर, अर्धवट माहिती बघून आपल्या ब्रॅण्डची कल्पना करायची आणि त्यातून आपला ब्रॅण्ड तयार झाला, असे समजायचे. परंतु, ही अतिशय चुकीची संकल्पना आहे. कुठलाही ब्रॅण्ड म्हणजे आज जी काही स्पर्धा चालू आहे, त्यात आपले वेगळेपण कसे उठून दिसेल, याचा विचार करावा. त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. पुण्यात एक ‘गणेश भेळ’ या नावाने एक भेळ बनवणारी कंपनी आहे. मध्यंतरी पाणीपुरीमध्ये वापरल्या जाणार्या पाण्याच्या शुद्धतेबद्दल बर्याच वाईट बातम्या आल्या होत्या. त्यातून मार्ग काढण्यासाठी या ‘गणेश भेळ’वाल्यांनी जाहिरात केली की, आम्ही फक्त ‘बिसलेरी’चेच पाणी वापरतो. त्यामुळे त्यांची ती ओळख बनली. यालाच म्हणतात ‘ब्रॅण्ड.’
‘ब्रॅण्डनिर्मिती’ ही एक मोठी प्रक्रिया आहे, तर प्रत्येक उद्योजकाने ही प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण केली पाहिजे? ब्रॅण्डमागची ‘ब्रॅण्डस्टोरी’ काय आहे?
‘ब्रॅण्डनिर्मिती’ ही प्रक्रिया मोठी आहे. जसे की ‘मर्सिडिज’ म्हटली की आपल्याला गर्भश्रीमंत वर्गच डोळ्यांसमोर येतो. ‘नॅचरल आईस्क्रीम’ घेतले, तर खर्या फळांच्या स्वादासाठी ते ओळखले जाते. यातून आपल्याला दिसते की, या उत्पादनांनी आपला असा एक ग्राहकवर्ग निवडला आहे. त्या ग्राहकवर्गासाठी ते आपली उत्पादने बनवतात. म्हणजे पहिले झाले की, आपला ग्राहक ओळखणे. त्यानंतर त्यासाठी लागणारी प्रक्रिया आपल्याला करावी लागते.
आजच्या युगात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. या बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर ‘ब्रॅण्डनिर्मिती’साठी नेमका कसा करायचा?
मुळात कुठलाही व्यवसाय हा विश्वासावरच चालतो. त्यासाठी विश्वास संपादन करायचा असेल, तर आजच्या काळात संकेतस्थळ असणे गरजेचे आहे. आपल्या ग्राहकांपर्यंत आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. त्याहीपुढे जाऊन आपल्याला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमेही उपयुक्त असतात. त्यामुळे समाजमाध्यमांचा फायदा आपल्या व्यवसायासाठी करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
मग नेमके महत्त्वाचे काय, ‘बिझनेस जनरेशन’ म्हणजे व्यवसायनिर्मिती की ब्रॅण्डनिर्मिती?
हा मुळात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बर्याच उद्योजकांपुढे हाच प्रश्न असतो. नेमके आधी करायचे तरी काय? हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघू. दोन उद्योजक आहेत. एक उद्योजक, आपला व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी दारोदार फिरून आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्यातून तो आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. दुसरा जो उद्योजक आहे, तो मात्र आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा खूप चांगला उपयोग करेल. आपल्या उत्पादनाविषयी चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवेल आणि हळूहळू आपला ग्राहकवर्ग आणि व्यवसायवाढीसाठी काम करेल. पहिल्या उद्योजकाकडे सुरुवातीला खूप ग्राहक वळतील, पण त्यानंतर हळूहळू ती संख्या कमी व्हायला लागेल. त्याउलट, दुसरा उद्योजक जो आहे, त्याची सुरुवातीला धीम्या गतीने ग्राहकसंख्या असेल, पण पुढे ती वेगाने वाढायला लागेल. कारण, त्याने व्यवसाय आणि ब्रॅण्डनिर्मिती या दोन्ही गोष्टींवर एकाचवेळी काम केले.
आपण ‘बिझनेस आयकॉन’ या माध्यमातून स्टार्टअप्सना मार्गदर्शन करीत आहात. आपला हा प्रवास 500 उद्योजकांपर्यंत पोहोचला आहे. या प्रवासाबद्दल काय सांगाल?
मुळात मी ‘बिझनेस मार्केटिंग’ करून देणे हे काम करायचो. ते काम करत असताना माझा बर्याच उद्योजकांशी संपर्क आला. त्यातून मला जाणवले की, बर्याचजणांकडे खूप चांगल्या संकल्पना आहेत, तर सुरुवातीला या सर्वांशी संपर्क करण्यासाठी मी ‘बिझनेस मंत्रा’ या नावाने त्यांच्या मुलाखती घेणे सुरू केले. यात मला खूप चांगल्या आणि मोठ्या उद्योजकांशी जोडता आले. परंतु, आपण जर उद्योजकांनाच सेलिब्रिटी बनवले तर? हे कोणीच करत नाही. त्यातूनच जन्म झाला ‘बिझनेस आयकॉन’ या संकल्पनेचा. यातून आता हळूहळू करत 500 उद्योजकांपर्यंत हा प्रवास पोहोचला आहे.
तुमच्या या प्रवासातील एखादा अविस्मरणीय अनुभव सांगू शकाल का?
पहिला अनुभव. आमच्या ओळखीचेच एक उद्योजक आहेत; त्यांची मुलाखत मी केली होती. पुढे जाऊन त्यांच्या कंपनीला मोठा गुंतवणूकदार हवा होता. तर कुठलीही कंपनी जेव्हा कुठल्याही कंपनीत गुंतवणूक करणार असते, तेव्हा ती त्यांची संपूर्ण प्रोफाईल तपासते. तर त्यांचे काम पूर्ण झाले आणि त्यानंतर ते मला जेव्हा परत भेटले, तेव्हा त्यांनी सांगितले की, त्या कंपनीने ‘बिझनेस आयकॉन’मध्ये घेतलेली मुलाखत आणि लेख वाचला. त्यावरून त्यांना माझ्याबद्दल खात्री पटली आणि त्यांनी आमच्या कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
नवीन उद्योजकांना काय संदेश द्याल?
मुळात ‘ब्रॅण्डिंग’ ही काही मोठी गोष्ट नाही. फक्त थोडा गृहपाठ आणि त्याला मिळालेली आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड यातूनच आपल्याला ही गोष्ट साध्य करता येऊ शकते. त्यामुळे नीट विचार करा. आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करा आणि त्यातूनच आपण आपला व्यवसाय मोठा करू शकतो.
- हर्षद वैद्य