संत तुकारामांनी आपल्या वैकुंठगमनाची पूर्वकल्पना इतरांना दिली होती. ‘आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा।’ असे महाराज देहत्यागापूर्वीच लिहून ठेवतात आणि सर्व वृत्तींना सम करून, जेथे गतीच कुंठित होते अशा शून्य, निर्वाण अवस्थेत लीलया जातात. काही अज्ञानी जन म्हणतात, संत तुकारामांना मारण्यात आले. परंतु, तुकारामांसारख्या इच्छामरणी महान संतयोग्याच्या शरीराला हात लावण्याची कोणाची हिंमत! पंचमहाभूतांत स्वतःचे शरीर विसर्जित करून, महाराज स्वेच्छेने वैकुंठात गमन करते झाले. ‘विगतः कुण्ठः अस्य वैकुण्ठः.’ वैकुंठ, निर्वाण, शून्य हे एकाच अवस्थेचे विभिन्न शब्दप्रकार होत. आद्य शंकराचार्यसुद्धा वालीप्रमाणे एका गुहेत गेले, ते परत आलेच नाहीत.
‘अंतश्चरति भूतेषु गुहायां विश्वतोमुखः त्वं यज्ञ वषट्कारस्त्वं विष्णुः पुरुषं परः।
योगिराज कबीरांचे मरण
योगिराज कबीरांच्या मृत्यूबद्दल एक कथा आहे. त्या कथेतील संभाव्यता लक्षात घेऊन, काही चिकित्सक ती कथा केवळ काल्पनिक असावी असे मानतात. आक्षेप खरा असूही शकतो, कारण उत्तर भारतात काही काळ वास्तव्य असताना, लेखकाने असल्याच प्रकारची कथा नानकजी व तुलसीदासजींच्या बाबतीत ऐकली होती. लेखक स्वतः चिकित्सक वृत्तीचा असल्यामुळे संत कबीरजींच्या कथेत सत्यता असू शकते, असेही लेखकाला वाटते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांप्रमाणे कबीर महान योगी होते. साधारण माणसांच्या बाबतीत जर चमत्कृतिजन्य घटना घडू शकतात, तर कबीरांसारख्या महान योग्यांच्या बाबतीतही तशी घटना घडणे असंभव नाही. म्हणून ती कथा चिकित्सक वाचकांकरिता मुद्दाम देत आहे.
कथा अशी की, आपल्याला आता जायचे आहे याची कबीरांना कल्पना आली. त्यांनी आपल्या शिष्यांना दुसर्या दिवशी, त्यांचे मरणाची तयारी करण्यास सांगितले. शिष्यांना कबीराच्या योग्यतेची जाणीव होती. त्यांनी शवयात्रेचे सर्व सामान आणून ठेवले. ठरल्याप्रमाणे कबीरांनी देह ठेवला. त्यांचे शव एका तिरडीवर बांधण्यात आले. शवावर फुले आणि माळा यांचा मोठा ढीग सजला. मुसलमान आणि हिंदू शिष्य, मोठ्या भक्तिभावाने शव घेऊन स्मशानाकडे धून म्हणत चालले. ‘रामनाम सत्य हैं सत्य बोलो गत हैं।’ शवयात्रा एका घराच्या दारावर आली.
त्याच वेळेस त्या घरातील एक बाई 16 शृंगार करून, 12 वर्षांनंतर भेटीला येत असलेल्या आपल्या पतीला भेटण्यास शहराबाहेरील मंदिराकडे जाण्याला निघाली. किती भावना तिच्या मनात उचंबळल्या असतील! बाहेर जाण्याकरिता ती ललना दारात पाय टाकते, तोच दारावर तिला कबीरांच्या शवयात्रेची धून ऐकू आली. ‘रामनाम सत्य हैैं, सत्य बोलो गत हैं।’ वास्तविक शवयात्रा दिसणे शुभ लक्षण मानतात, पण त्या बाईला ते शास्त्र काय माहीत असणार? तिला ते अशुभ लक्षण वाटले आणि मनात ती चरकली.
ती उत्स्फूर्त उद्गार काढती झाली, मेल्यांना आजच मरून मला अपशकून करायचा होता तर! माझ्या प्रिय पतीला मी भेटण्यास निघाले, तर याने स्वतः मरून मला अपशकून केला. ती शवयात्रा कबीरांची होती, हे तिला काय माहीत? ती सहज उद्वेगाने बोलली.
कबीर बाह्यार्थाने मृत झाले असले, तरी ते योगी व अंतर्यामी असल्यामुळे त्यांनी त्या बाईचा संताप ऐकला. लगेच ते तिरडीवर उठून बसले आणि परत चलण्यास आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितले. सर्व शिष्य आश्चर्यचकित झाले. मेलेला पुन्हा जिवंत झाला कसा? शिष्यांना गोंधळात पडलेले पाहून कबीर उद्गारले, “बाबा रे, केव्हा तरी मरायचेच आहे. पण, त्या माऊलीला आपल्या मरणामुळे जर अशुभ लक्षण होत असेल, तर त्या मरणात काय अर्थ? मी उद्या मरेन. परत चला!” कबीराचे शिष्य व कबीर परत गेले.
कबीर पुन्हा दुसर्या दिवशी मरण पावले. दुसर्या दिवशी पुन्हा शवयात्रा निघाली. ‘रामनाम सत्य हैं, सत्य बोलो गत हैं।’ स्मशानघाटावर गेल्यावर, शिष्यगणात मतभेद उत्पन्न झाले. हिंदू शिष्यांना कबीरांचे शव जाळायचे होते, तर मुसलमान शिष्यांना कबीरांचे शव रिवाजाप्रमाणे पुरायचे होते.
वादावादी सुरू झाली. शेवटी शव उचलून गाडण्याकरिता मुसलमान शिष्यांनी हार-फुलांच्या ढिगात हात घातला पण, त्यांना शव कोठेच दिसले नाही. काय झाले? कसे झाले? सर्व आश्चर्यचकित झाले. आपल्या सर्व शिष्यांचे अज्ञान पाहून, कबीरांनी आपल्या देहाचे विसर्जन त्या फुलांत केले. त्यांचा देह फुलाच्या रुपाने शिल्लक राहिला. हिंदू शिष्यांनी फुले जाळली, तर मुसलमान शिष्यांनी फुले दफन केली. पुन्हा अज्ञान कायमच! अज्ञान सुटता सुटत नाही. संस्काराच ते! संस्कार सुटणे महाकठीण!
आपल्या मरणाची कल्पना संत कबीरांना स्पष्टपणे होती, असे दिसते. मरणापूर्वी कबीरांनी एक पद लिहून ठेवले. ते पद साधकांच्या दृष्टीने अभ्यासनीय आणि अनुभवगम्य आहे. काव्याचा तो एक उत्कृष्ट नमुनाच आहे. कबीर कोष्टी असल्यामुळे, त्यांनी शरीराला एका चादरीची उपमा दिली. ते म्हणतात,
झिनि झिनि झिनि झिनि बिनि चदरिया।
काहे का ताना काहे की भरनी।
कौन तार से बिनि चदरिया॥1॥
ईडा पिंगला ताना भरनी।
सुषमन तार से बिनि चदरिया॥2॥
साई को सीयत मास दस लगे।
ठोक ठोक के बिनि चदरिया॥3॥
सौ चादर सुरनरमुनी ओढी।
ओढ के मैली कर दिनी चदरिया॥4॥
दास कबीर जतन से ओढी।
ज्योंकी त्यों ही रख दिनी चदरिया॥5॥
परमेश्वराने शरीराची झिरझिरित अशी पारदर्शक चादर विणली आहे. त्या चादरीतील उभे धागे (ताना) आणि आडवे धागे (भरनी) कशाचे आहेत? योगनाड्या ईडा आणि पिंगला नाड्या ताना असून, सुषुम्ना नाडी भरनी आहे. ही दिव्य चादर विणण्याकरिता, परमेश्वराला दहा मास लागले.
ही चादर सर्वांनी पांघरून मळवून टाकली; परंतु कबीरांनी ती अतिशय सांभाळून जतन करून वापरली आणि परमेश्वराला ती परत करताना जशी त्याने दिली, तशीच शुद्ध स्वरुपात परत केली. वरील दोह्यावरून कबीरांचा अधिकार लक्षात येतो. वरील दोह्याचा गूढार्थ चिंतन करून जाणावा. मरण्याकरिता श्रेष्ठ योग्यांना रोग वा अपघाताची आवश्यकता असतेच, असे नाही. कबीरांप्रमाणे आपणही आपली शरीररुप चादर जशीच्या तशीच परत करण्याचा प्रयत्न करूया!(क्रमशः)
- राजेश कोल्हापुरे