अती गूढ ते होई तत्काळ सोपे

    17-Apr-2025
Total Views | 18
 
Paramatmavarupa
 
रघुनायकाला अर्थात परमात्मस्वरूपाला, व्यापकपणा समजण्यासाठी आकाशाची उपमा देणे बरोबर नाही, असे आपण मागील श्लोकात पाहिले. नभाची उपमा देताना एकच एक परमात्मस्वरूप सर्वत्र भरलेले असतानाही, त्याने आणखी कशाला तरी व्यापले आहे, असा द्वैतभाव होतो व त्यामुळे व्यापकत्वाला बाधा येते. ही तार्किक विसंगती काढून टाकावी म्हणून स्वामी म्हणाले की, “एकमेवाद्वितीय परमात्मस्वरूपाला व्यापक म्हणणे हेच मुळात निष्फळ आहे, निरर्थक आहे. तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे,” असे स्वामींचे शब्द आहेत. बरं परमात्मस्वरूप समजण्यासाठी काही दृष्टान्त द्यावा म्हटले, तरी त्याला साजेसा, त्याच्या योग्यतेचा दृष्टान्त मिळत नाही. सामान्य माणसाच्या तर्कबुद्धीचा परीघ मर्यादित आहे. परमात्मस्वरूप तर्काधिष्ठित नसल्याने, स्वामी त्याचे काही गुणविशेष सांगत आहेत.
 
अती जीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे।
तेथें तर्क संपर्क तोही न साहे।
अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें।
दुजेवीण जें खूण स्वामीप्रतापें॥199॥
 
परमात्मस्वरूपाला व्यापक म्हणणे जसे व्यर्थ आहे तसे परमात्मस्वरूपाला अत्यंत पुरातन व कमालीचे विशाल असे म्हणण्यानेही, त्यातून द्वैतभावच उत्पन्न होतो व परमात्मस्वरूपाला ते बाधा आणते. तरीही स्वामींनी ’अती जार्ण म्हणजे पुरातन आणि विस्तीर्ण’ हे शब्दप्रयोग नाईलाजाने केले. कारण, मानवी बुद्धीला तौलनिकतेची इतकी सवय झालेली असते की, आपल्याला तुलनात्मक स्थलकालाचीच भाषा समजते. स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून अद्वैत, चिरंतन यासंबंधी विचार करण्याचे बौद्धिक सामर्थ्य सामान्य माणसाच्या अंगी नसते, याची जाणीव समर्थांना आहे. म्हणून परमात्मस्वरूप अत्यंत पुरातन, कमालीचे विशाल या म्हणण्यातही तार्किक विसंगती माहीत असूनही, स्वामी ’ते रूप अती जार्ण विस्तीर्ण आहे’ असे म्हणाले. परमात्मस्वरूप स्थलकालातीत असले तरी, तुम्हा-आम्हांला समजावे म्हणून, स्वामींनी येथे कालवाचक व स्थितिवाचक शब्दांचा प्रयोग केला आहे.
 
पूर्वानुभव व अनुमान यांनी माणसाची तर्कबुद्धी काही निष्कर्ष काढते. परमात्मस्वरूप समजण्यासाठी असे निष्कर्ष उपयोगी पडत नाहीत. अर्थात, केवळ तर्कबुद्धीने परमात्मस्वरूप जाणता येत नाही, ते स्वरूप तर्काच्या पलीकडे आहे. स्वामी म्हणतात, ‘तेथे तर्क संपर्क तोही न साहे’. तर्कबुद्धीचाही ज्याला संपर्क होत नाही, ते रहस्यमय आणि गूढ आहे आणि ’असे वाटले तरी ते निश्चितपणे आहे’ अशी ग्वाही संत देतात. पण ते सहजपणे आणता येत नाही. लक्षावधी साधकांत, भक्तांत एखादाच परमात्मस्वरूप जाणू शकतो, असे म्हणतात. त्यात अतिशयोक्ती नाही. असे असले तरी, स्वामींनी एक मोठा दिलासा भक्तांना दिला आहे.
 
स्वामी म्हणतात, ’अती गूढ तें दृढ तत्काळ सोपे... स्वामी प्रतापे.’ म्हणजे गुरुकृपा झाल्यावर, स्वरूपाच्या ठिकाणी असलेले दुजेपण हे खोटे आहे याची खात्री पटल्यावर, भक्ताला परमात्मस्वरूपाशी समरस होऊन ते जाणता येते. अर्थात, हे स्वामीप्रतापे, म्हणजे श्रीगुरुच्या सामर्थ्यावर, त्याची कृपा झाल्यावर घडून येते. शिष्याला यापूर्वी अवघड वाटणारी गोष्ट आता ताबडतोब, सोपी, सहजप्राप्त होऊन जाते. सद्गुरूकृपा झाल्यावर, सर्वप्रथम शिष्याच्या मनातील देहबुद्धी अहंकार, मीपणा हे नष्ट होतात. मन विशाल होते, त्या मनात आत्मबुद्धीची पहाट उदय पावल्याने सूक्ष्मातिसूक्ष्म, भेदातीत, दुजेपण नसलेले, परमात्मस्वरूप मन सहजपणे अनुभवू शकते. ते सोपे होते. स्वामींच्या शब्दांत ‘अती गूढ तें दृढ तत्काळ सोदें!’
 
परमात्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर मनाला त्याचे आकलन होऊन, त्याची अनुभूती येते. ही अनुभूती आल्यावर काय काय घडते, हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत.
 
कळे आकडे रूप तें ज्ञान होतां।
तेथे आटली सर्व साक्षी अवस्था।
मना उन्मनीं शब्द कुंठीत राहे।
तो गे तो चि तो राम सर्वत्र पाहें॥201॥
 
परमात्मस्वरूपाचे गुणविशेष वर्णन केल्यावर, ब्रह्मानुभूतीची अवस्था स्वामींना सांगायची आहे. तेथे मनाची स्थिती कशी होते, भाषेतील शब्द कोठे राहतात याचे वर्णन करायचे आहे. सभोवतालच्या सृष्टीतील दृश्य ज्ञान मिळवताना, मनाचा ज्ञानेंद्रियांच्या शक्तीवर व बुद्धीच्या कार्यक्षमतेवर विश्वास असतो. त्यापासून मन काही प्रमाणात सुख अनुभवते. परंतु, त्यासाठी आवश्यक घटकांत थोडा जरी बदल झाला, तरी सुखाची श्रेणी खालावते व श्रमाचे अथवा सुख गमावल्याचे दुःख मनाला सहन करावे लागते. ते दुःख मोठ्या प्रमाणावर असेल, तर मनाला नैराश्यही येऊ शकते. ज्ञानेंद्रिये आपल्याला पाहाणे, ऐकणे, चव घेणे, स्पर्श यांद्वारा दृश्य वस्तूंची ओळख करून देतात. या मनाच्या क्रिया आहेत. तत्संबंधी तर्कशास्त्राचा वापर करून, बुद्धी अनुमानाद्वारा निष्कर्ष काढण्यास मदत करते. या सर्वांच्या साहाय्याने मानवाने विज्ञाननिष्ठ ज्ञानात, आश्चर्यकारक प्रगती केली हे निर्विवाद आहे.
 
या विज्ञाननिष्ठ ज्ञानाच्या भौतिक प्रगतीचा विचार करता, माणसाला ऐषाराम, शरीरस्वास्थ्य मिळाले. त्याने अप्रत्यक्षरित्या देहबुद्धीत वाढ केली. हे सर्व बाह्य साधनांवर अवलंबून असल्याने, मनाला खर्‍या सुखाची प्राप्ती झाली नाही. संत विज्ञाननिष्ठ सुखाला कमी लेखत नाहीत. पण त्या सुखाच्या लालसेने वाहावत जाणार्‍या मनाला ते अभ्यास व वैराग्याची शिकवण देऊन, परमात्मस्वरूप ज्ञानाचा आग्रह शाश्वत समाधानासाठी धरतात. अध्यात्म विचारांशिवाय माणसाला शाश्वत समाधान मिळणार नाही आणि जीवाची जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून सुटकाही होणार नाही. अध्यात्मज्ञानाची दृष्टी तात्पुरता विचार न करता, अनंत काळाचा विचार करते.
 
आत्मस्वरूपाचे ज्ञान मिळवताना मनावर त्याचा कसा परिणाम घडून येतो, हे स्वामी या श्लोकातून सांगत आहेत. त्यासाठी विज्ञाननिष्ठ पदार्थविज्ञानाची पार्श्वभूमीवर सांगावी लागली. आत्मस्वरूपाचे ज्ञान होणार्‍या मार्गातील काही टप्पे समजून घेतले पाहिजेत. सर्वसाधारणपणे माणसाच्या मनात देहबुद्धी दृढ असते, देह म्हणजेच मी असे ’ज्ञान’ मनाला होते, ते देहबुद्धीमुळे. वस्तुतः ते ’ज्ञान’ नसून ती मनाची समजूत असते. त्याला ‘विपरीत ज्ञान’ म्हणता येईल. खर्‍या ज्ञानाची म्हणजे, परमात्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यावर मनातील देहबुद्धी, विपरीत नाहीसे होते. एवढेच नव्हे, तर मीपणा नाहीसा झाल्याने सर्व विश्वात केवळ परब्रह्म, परमात्मस्वरूप विलसत आहे, असा प्रत्यय येतो.
 
मी त्यापासून वेगळा नाही अशी अवस्था निर्माण झाल्याने, मला ज्ञान झाले हा विचार आटून जातो. मनच शिल्लक न उरल्याने आणि सर्वत्र ब्रह्मसाक्षात्कार झाल्याने, मनाची उन्मनी अवस्था होते. मनाच्या अज्ञानी अवस्थेत शब्दांना महत्त्व असते. तथापि, मनाच्या उन्मनी अवस्थेत शब्द शिल्लक राहात नाहीत.
 
मनसुद्धा परब्रह्मात विलीन झाल्याने, कुणी कुणाचे शब्दांत वर्णन करावे? केवळ राम, परब्रह्म, परमात्मा सर्वत्र असल्याने त्याशिवाय आणखी काही उरतच नाही. ही तुर्यातीत अवस्था अनुभवणे, हे आध्यात्मशात्रातील ध्येय समजले जाते. ती अवस्था साधल्यावर, साधक सिद्ध होतो आणि मग ’तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे’ असे होऊन जाते. देहभान हरपून जाणार्‍या या अवस्थेचे आणखी वर्णन समर्थांनी, पुढील श्लोकात केले आहे.(क्रमशः)
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121