आपल्याच पोळीवर तूप ओढण्याची शेकाप नेते जयंत पाटील यांची तशी जुनीच सवय. राज्यातून शेतकरी कामगार पक्ष हद्दपार झाला, तो या सवयीमुळेच! आता घरापर्यंत झळ पोहोचल्याने जयंतरावांचे डोळे उघडले. त्यांचे सख्खे बंधू पंडितशेठ पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. भगिनी (माजी आमदार) दिवंगत मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आस्वाद पाटील यांनीही मामांची साथ सोडली. आस्वाद हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच रायगड जिल्हा बँकेचे संचालक होते. पण, इतकी वर्षे जयंत पाटलांच्या खांद्याला खांदा लावून इमानेइतबारे काम करणार्या पंडितशेठ आणि भाचे आस्वाद यांनी अचानक हा निर्णय का घेतला, याचा शोध घेता, त्याची पाळेमुळे थेट जयंत पाटील यांच्यापर्यंत येऊन पोहोचतात.
जयंतरावांचा एककल्ली कारभार या फुटीस सर्वस्वी कारणीभूत. स्वतःपेक्षा पक्षात कोणी मोठा होऊ नये, यासाठी त्यांनी ना-ना तर्हेचे प्रयत्न केले. नवख्यांच्या करिअरला उमेदीच्या वयातच कात्री लावली, तर जुन्याजाणत्यांचे पंख पद्धतशीरपणे छाटले. आपला-परका कोणीही याला अपवाद नाही. विधान परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जयंत पाटलांचे राजकीय अस्तित्व जवळपास संपुष्टात आले. अशावेळी अलिबाग मतदारसंघांतून बंधू पंडितशेठ यांनी उमेदवारीची मागणी केली. बहुतांश सर्वेक्षणात त्यांच्या विजयाचे संकेतही मिळत होते. पण, भाऊ आमदार झाला, तर माझे महत्त्व कमी होईल, या इराद्याने त्यांनी त्यांचे तिकीट कापले. भावाऐवजी सूनबाई चित्रलेखा पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी त्यांचा दारुण पराभव केला.
ज्येष्ठ बंधूच्या या कृतीमुळे पंडित पाटील नाराज झाले आणि त्यांनी समर्थकांसह वेगळी वाट निवडली. आस्वाद पाटील यांचीही तीच गत. जिल्हा परिषद गाजवल्यानंतर आमदारकीची स्वप्न पाहण्याची वेळ आली असताना, मामाने दगा दिला. जो आपल्या भावाचा झाला नाही, तो भाच्याचा काय होईल? असा विचार करून आस्वाद पाटील यांनी भाजपचा मार्ग धरला. 45हून कमी वयाच्या कार्यकर्त्यांची सध्या भाजपमध्ये चलती आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला लवकरच बहर येईल, यात शंका नाही. त्यांना उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा!
आंब्याचा टाळ
घर फिरले की वासेही फिरतात, असे म्हटले जाते. जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शेतकरी कामगार पक्ष सध्या त्याच अवस्थेतून जातोय. एकेकाळी हा पक्ष राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या पंक्तीत होता. पण, कालानुरुप बदल न स्वीकारल्याने उतरती कळा लागली, ती आजपर्यंत! जयंतरावांनी अनेक ठिकाणी दगड मारून पाहिले, पण रायगड जिल्ह्याबाहेर त्यांना स्वीकारले गेले नाही. बरे, घराच्या बाहेर मान मिळत नाही, म्हटल्यावर किमान उंबर्याच्या आत तरी स्वतःची आब टिकवावी, पण नाही! जयंतरावांनी सख्ख्या भावाशीच वैरत्व पत्कारले. शेवटी शेपटीवर पाय दिला, की ‘मनीमाऊ’ देखील नख मारतेच. पंडितशेठ तर माजी आमदार. ते निम्मा पक्ष सोबत घेऊन भाजपमध्ये दाखल झाले. आता उरले ते जयंतराव आणि सुनबाई. त्यामुळे यापुढे जयंत पाटील आणि त्यांचा पक्ष पुनर्भरारी घेण्याची शक्यता जवळपास अशक्य. आता तरी जयंतराव पवारांचा सल्ला घेणे टाळतील, ही अपेक्षा!
येत्या काळात महामुंबईचा विस्तार रोह्यापर्यंत करण्याचे नियोजित आहे. त्यादिशेने पडणारी गतिमान पावले पाहता, रायगड जिल्हा ताब्यात असणे राजकीयदृष्ट्या अत्यंत गरजेचे आहे. कालच्या पक्षप्रवेशाने भाजपला ती वाट खुली झाली. पनवेल, उरण आणि पेणमध्ये पोषक वातावरण असले, तरी अन्यत्र शेकाप आणि इतर पक्षांचा अडथळा होता. बरे, पनवेल आणि उरणचा समावेश मावळ लोकसभा मतदारसंघात होत असल्याने, भविष्यात रायगडमध्ये ‘कमळ’ चिन्हावर खासदार निवडून आणायची अडचण होती. आधी धैर्यशील पाटील आणि आता पंडितशेठ आणि आस्वाद पाटील यांच्या रुपाने त्यावर तोडगा निघाला. बरे ते दोघे एकटे आले नाहीत, तर जिल्हा परिषदेचे सहा माजी सभापती, सात जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचे दोन संचालक आणि आजी माजी 60 सरपंच सोबत घेऊन आले. त्यामुळे येत्या काळात अलिबागमध्ये भाजपचा विजयरथ रोखणे विरोधकांसह मित्रपक्षांनाही सोपे राहिलेले नाही. कोकणच्या प्रवेशद्वारावर भाजपने बांधलेला हा ‘आंब्याचा टाळ’ कोकणवासीयांच्या जीवनात भरभराट आणणारा ठरो, हीच अपेक्षा!