वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या ऑफरचा दावा करणारे रणजीत कासले आहेत कोण?

    16-Apr-2025   
Total Views |
 
ranjeet kasle beed walmik karad encounter offer
 
Ranjeet Kasle Beed : गेल्या काही महिन्यांत बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापल्याचे पहायला मिळाले. मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सध्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर या प्रकरणातील त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याच्या चर्चा आहेत. या प्रकरणी पार पडलेल्या तिसऱ्या सुनावणीत आरोपी वाल्मिक कराडने "माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नसल्याने मला या खटल्यातून निर्दोष मुक्त करावे", असा अर्ज न्यायालयास दिला आहे. तर दुसरीकडे याच सुनावणीदरम्यान सरकारी वकीलांकडून वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यादरम्यान बीडचे निलंबित पीएसआय रणजीत कासले यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा सर्वत्र खळबळ उडाली आहे. 'मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती,' असा दावा रणजीत कासले यांनी केला आहे. एका व्हिडीओमध्ये बोलताना त्यांनी वाल्मिक कराडसह अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाबाबतही काही दावे केले आहेत. या व्हिडिओनंतर पुन्हा त्यांनी दुसरा व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्यांनी मला पकडून दाखवा असं म्हणत महाराष्ट्र पोलिसांना थेट आव्हान दिले. महाराष्ट्र पोलिसांना चँलेज देणारे पीएसआय कासले नेमके आहेत कोण ? या दोन्ही व्हिडीओंमधून त्यांनी कोणते दावे केलेयत? त्यांनी केलेल्या एन्काउंटर ऑफरच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? या सगळ्याविषयी सविस्तर जाणून घेऊया... 
 
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर या दाव्यामुळे खळबळ उडवून देणारे रणजीत कासले बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर २१ डिसेंबरला नवनीत काँवत यांची बीडचे नवे पोलीस अधीक्षक नियुक्ती झाली. देशमुखांच्या हत्येनंतर बीड पोलिसांवर अनेक गंभीर आरोप झाले, काहींची बदली झाली तर काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, यातच नवनीत काँवत यांनी पैशांच्या देवाणघेवाणीच्या आरोपातून एका पीएसआयला निलंबित केल्याची माहिती समोर आली. हेच ते पीएसआय रणजीत कासले. रणजीत कासले हे गेल्या २० वर्षांपासून पोलिस खात्यात काम करत होते. हवालदार म्हणून खात्यात रुजू झालेले कासले प्रमोशन मिळवून पीएसआय झाले. काही वर्ष त्यांनी पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी खात्यातही काम केलेलं आहे. निलंबन होण्यापूर्वी ते बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. मार्च महिन्यात सायबर विभागात दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासाकरिता ते गुजरातला गेले. यावेळी प्रोटोकॅालनुसार परराज्यात जाण्यासाठी वरिष्ठांची परवानगी आवश्यक असताना देखील ते परवानगी न घेता गुजरातला गेले. त्याचबरोबर तिथे गेल्यावर आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. चौकशीदरम्यान याबाबत पुरावे मिळाल्यानंतर गैरव्यवहाराचा ठपका ठेवून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी कासले यांना निलंबित केलं. त्यामुळे कासले बरेच वादग्रस्त राहिले आहेत.
 
निलंबित झाल्यापासून रणजीत कासले यांनी सोशल मीडियावर पोलिस खात्यापासून ते राजकीय नेत्यापर्यत बऱ्याच जणांवर नाव घेत आरोप करत व्हिडीओ शेअर केले आहेत. असाच एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय ज्यात ते म्हणाले ,"मी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर बोलणार आहे. एन्काऊंटर कसे बोगसपणे केले जातात, याबाबत सांगणार आहे. चौकशीसाठी एसआयटी बसवून काहीच उपयोग होणार नाही. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची खरंच चौकशी करायची असेल तर केंद्राची एसआयटी बसवा. तरच सत्य बाहेर येईल. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची मला ऑफर दिली होती. त्यासाठी लमसम अश्या मोठ्या अमाऊंटची ऑफर होती. आधी १०, नंतर २० आणि ५० कोटी देऊ असं सांगितलं गेलं. अशा केसमध्ये तुम्ही मागाल ती रक्कम मिळते. कोणताही पोलीस आपल्या करीयरमध्ये कमावणार नाही, एवढी रक्कम दिली जाते. त्यासाठी कोणत्याही विभागातून अधिकारी बोलावून घेतला जातो. जसं मला सायबरमधून बोलावणं आलं होतं. त्यांना माहीत होतं हा माणूस करू शकतो. त्याच्यात दम आहे. गट्स आहेत. मात्र त्याला मी नकार दिला होता. कराडच्या एन्काऊंटरचं पाप मी करणार नाही, असं त्यांना सांगितलं."  यानंतर एन्काऊंटरची प्रक्रियेबद्दल सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
 
अशातच १४ एप्रिल रोजी रणजीत कासले यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिली. अनुसूचित जमातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने निलंबित पीएसआय कासलेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर मतदारसंघात कुत्रादेखील निवडून येईल, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावर पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बोललो नाही, समाजाची माफी मागतो, असं रणजीत कासले म्हणाले आहे. पुढे याच व्हिडिओतून त्यांनी पोलिसांनी मला पकडून दाखवावे असे आव्हान दिलंय. यावेळी ते म्हणाले, " काल मी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरबद्दल अनेक चॅनलला मुलाखत दिली आणि मी माझं मत मांडलं. त्यानंतर १४ एप्रिलच्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गजानन कांडकर यांनी माझ्याविरुद्ध अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. मी त्यांची माफी मागतो, त्यांच्या समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. आता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, त्यामुळे मी सांगून टाकतो की, एन्काऊंटरची ऑफर कुणी दिली होती", असं म्हणत रणजीत कासले यांनी धक्कादायक खुलासा केलाय."धनंजय मुंडे यांनाच वाल्मीक कराड नको होते. त्यांनीच एन्काऊंटरची ऑफर दिली होती. मुंडेंचीच अंडीपिल्ली वाल्मीक कराड बाहेर काढणार होते. धनंजय मुंडे ३०२ मध्ये अडकले असते",असंही रणजीत कासले यांनी म्हटले आहेत. तसेच रणजीत कासले यांनी पोलिसांना खुलं आव्हान दिलंय. "मी सायबरमध्ये काम केलं आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतोय की त्यांनी मला पकडून दाखवावं. पोलिसांनी कितीही टीम पाठवू द्या, मी त्यांना भेटणार नाही. मी दररोज दोन गाड्या चेंज करतो. दोन मोबाईल मी चेंज करतो, आता दोन राज्य बदलणार, माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे, त्यांनी मला पकडून दाखवावं. त्याआधी मी खऱ्या मार्गाने जाणार आहे. न्यायालयात मी अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे", असं रणजीत कासले म्हणाले.
 
बरं हे एखाद्या दुसऱ्या व्हिडिओपुरतं नसून असे सरकार आणि पोलिस खात्यांवर गंभीर आरोपाचे व्हिडिओ कासलेंनी आधीही केले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या पकडणं, पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावा रणजीत कासले यांनी केला होता. स्वतःच्या निलंबनाविषयी सुद्धा त्यांनी अनेक दावे केलेत. मात्र आता केलेल्या एन्काऊंटरच्या दाव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले. कासलेंच्या दाव्याप्रमाणे हे खरंच गंभीर प्रकरण आहे की निव्वळ स्वप्रसिद्धीसाठी केलेला कांगावा ? याचं उत्तर रणजीत कासलेंच्या चौकशीतूनच समोर येऊ शकेल. 
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\