मुंबई : जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच 'एआय' तंत्रज्ञानाचा मोठा गाजावाजा सुरू असतानाच, कन्नड चित्रपटसृष्टीने एक अभूतपूर्व पाऊल उचललं आहे. 'लव यु' नावाचा चित्रपट संपूर्णपणे एआय च्या मदतीने तयार करण्यात आला असून, हा अशा प्रकारचा जगातील पहिलाच चित्रपट ठरतो. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती केवळ १० लाख रुपयांत करण्यात आली आहे.
या अनोख्या चित्रपटाचे दिग्दर्शन नरसिंह मूर्ती यांनी केले आहे. ते बेंगळुरूमधील बगलाकुंडे अंजनेयर मंदिराचे पूजारी असून, याआधी त्यांनी प्रेम या विषयावर आधारित चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. 'लव यु' या चित्रपचटात केवळ कथा सांगणं नव्हे, तर अभिनय, संगीत, गाणी, पार्श्वसंगीत, डबिंग यासह प्रत्येक तांत्रिक आणि सर्जनशील पैलू एआय च्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे.
या चित्रपटासाठी एआय कामकाजाची जबाबदारी नुथन या तरुणाने सांभाळली आहे. तो कायद्याचा पदवीधर असून, गेल्या काही वर्षांत कन्नड चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक व संपादक म्हणून कार्यरत आहे. एआय वापरून चित्रपट तयार करण्याच्या उद्देशाने त्यांनी विविध एआय साधन वापरण्याचं प्रशिक्षण घेतलं. रनवे एमएल, क्लिंग एआय, मिनी मॅक्स अशा जवळपास २०-३० टूल्सचा वापर या चित्रपटासाठी करण्यात आला आहे.
'लव यु' या चित्रपटाची लांबी ९५ मिनिटांची असून, यात एकूण १२ गाणी आहेत. चित्रपटाला सेन्सॉर बोर्ड कडून U/अ प्रमाणपत्र मिळाले आहे. एआय वापरून चित्रपटनिर्मिती करणे सहज जरी वाटते असले चित्रपट तयार करताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. उदाहरणार्थ, एखाद्या वयोवृद्ध पात्राची गरज असताना, एआय हजारो फोटो दाखवतं, पण त्यातून योग्य चेहरा निवडणं ही मोठी प्रक्रिया असते. पात्रांची चालण्याची गती, धावण्याचा वेग यांसारख्या तपशीलांसाठीही स्पष्ट निर्देश द्यावे लागतात.
निर्माते-दिग्दर्शक नरसिंह मूर्ती सांगतात,'एआय' चं सामर्थ्य जसजसं वाढतंय, तसतशी ही प्रक्रिया अधिक सोपी होत चालली आहे. आम्ही केवळ सहा महिन्यांत हा चित्रपट पूर्ण केला आहे.''
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मे महिन्यात निश्चित करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन केवळ ए.आय चा वापर करून केलेला 'लव यु' हा चित्रपट कन्नड सिनेसृष्टीसाठी क्रांतिकारी पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रेक्षकांसाठीही हा एक आगळावेगळा अनुभव ठरणार आहे, यात शंका नाही.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.