नाशिक : नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून काठे गल्ली येथील अनधिकृत सातपिर बाबा दर्गा हटवण्याची मोहिम मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी मध्यरात्री सुरु करण्यात आली. मात्र, यावरून उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना पोटदुखी सुरु झाल्याचे दिसते.
नाशिकमध्ये मंगळवारी सातपीर दर्गा हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. महापालिकेने सातपीर दर्ग्यास यापूर्वीच अनधिकृत घोषित केले होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार, १६ एप्रिल रोजीदेखील ही कारवाई सुरुच होती. तर दुसरीकडे, याच दिवशी नाशिकमध्ये उबाठा गटाचे निर्धार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
त्यामुळे अनधिकृत दर्ग्यावरील कारवाईवरून संजय राऊतांना पोटशुळ उठल्याचे दिसले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "नाशिक शहरात आज दर्गे हटाओ मोहिम सुरु केल्याचे मला समजले. दर्ग्यांवर बुलडोजर फिरवणार आहे. गोंधळ निर्माण व्हावा आणि या शिबीरावरचे लक्ष दुसरीकडे जावे म्हणून दर्ग्यांवर किंवा मशिदींवर बुलडोजर चालवायचा. हे कसले लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे. ही कारवाई नंतर करु शकत होते. पण आजचाच दिवस निवडला. कारण आज इथे उद्धव ठाकरे येत आहेत. आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व नेते इथे आलेले आहे. आज नाशिकमध्ये महत्त्वाचे शिबिर आणि अधिवेशन होत असल्याने आजचा दिवस निवडला. पण यामुळे या शिबिरावर काहीही परिणाम होणार नाही," असे ते म्हणाले.