मुंबई: ( Panditsheth Patil joins BJP ) रायगडमध्ये शेकाप नेते जयंत पाटील यांच्या घरात उभी फूट पडली आहे. त्यांचे बंधू तथा माजी आमदार पंडितशेठ (सुभाष) पाटील यांनी बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला.
नरिमन पॉइंट येथील भाजपच्या मुख्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला खा. धैर्यशील पाटील, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, अविनाश कोळी, कमलाकर दळवी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. यावेळी जि.प. माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, सवाई पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश आणि राज्य विकासाच्या वाटेवर वेगाने जात आहे. या दोघांवर असलेल्या विश्वासामुळे श्री. पाटील यांनी शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पंडितशेठ पाटील हे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात पक्षसंघटनेला अधिक ताकद मिळणार आहे. पाटील यांचा पक्षात यथोचित सन्मान राखला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
माजी आमदार दिवंगत मीनाक्षी पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा बॅंकेचे संचालक आस्वाद पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे ६ माजी सभापती, ७ जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा बँकेचे दोन संचालक, आजी माजी ६० सरपंच यांसह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. शेकापमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये जनार्दन पाटील, सुगंधा पाटील, संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, भावना पाटील, संदीप घरत, एकनाथ गायकवाड, वैभव चांदे, वसंत यादव, राजा सानप, स्मिता पाटील, महादेव दिवेकर आदींचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याचा सर्वांगीण विकास होणार याची हमी असल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केला. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपाच्या साथीने आगामी काळात जोमाने कार्य करून जिल्ह्यात भाजपाला क्रमांक एक चा पक्ष बनवू.
- पंडितशेठ पाटील, माजी आमदार