सृष्टीतील मानवाचे स्थान

    16-Apr-2025
Total Views |
 
Man Place in Creation
 
सृष्टीतील मानवाचे स्थान यावर आजही शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. मात्र, या विचारामध्ये भारतीय आणि पाश्चात्य असे दोन प्रवाह दिसतात. पाश्चात्य विचारांमध्ये मानवकेंद्रित विश्वाची संकल्पना असल्याने, तोच विचार त्यांच्या संशोधनात आणि नंतरच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये दिसतो, तर भारतीय विचार याहून भिन्न संकल्पनेवर आचरण करतो. त्याविषयीचे चिंतन...
 
आजच्या विज्ञानयुगाचे योग्य आकलन होण्यासाठी विज्ञानाची जड सृष्टीबद्दलची संकल्पना कशी महत्त्वाची आहे, हे आपण पाहिले. संस्कृतीसापेक्ष विचार केल्यास विज्ञान म्हणजे काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. विज्ञानातील ‘विश्व’ संकल्पना विज्ञानाच्या प्रगतीवर प्रभाव पाडते आणि भविष्यातील प्रगतीच्या दिशेवर तिचा परिणाम असतो. ‘विश्व’ संकल्पना भारतीय प्रतिमान या विषयात एक नवीन वाट दाखवू शकेल आणि अशा सर्व पर्यायी वाटांचा विचार, आज पाश्चात्य प्रतिमानाच्या मर्यादा जाणवू लागल्यावर आवश्यक झाला आहे. मात्र, असा कोणताही विचार केवळ जडसृष्टीचा विचार केल्यास अपूर्ण आहे. चेतन सृष्टी, त्यातील परस्परसंबंधांची चक्रे आणि या सर्वांत मानवाचे स्थान याचा विचार, कोणत्याही प्रतिमानात अंतर्भूत असला पाहिजे.
 
भारतीय संकल्पनेनुसार सृष्टीच्या निर्मितीबरोबरच मानवाची निर्मिती होते. निर्मितीची प्रक्रिया ही जड विश्वाच्या निर्मितीनंतर जेव्हा प्रजापती जीवसृष्टीची निर्मिती करतो, तेव्हा एक प्रकारे सुरू होते असे म्हणता येईल किंवा ब्रह्मा प्रजापतीची निर्मिती करून त्याच्यामार्फत, सर्व प्रजेची निर्मिती करतो. विविध वेदपुराणे या निर्मितीची कथा वेगवेगळी सांगतात परंतु, सर्व कथांमध्ये मानवी उत्पत्ती आणि अन्य सजीवसृष्टीची उत्पत्ती, असा भेद आलेला नाही. प्रजापतीने देव, दानव आणि ऋषींची निर्मिती केल्यानंतर मनूची निर्मिती केली, ज्याचे पुत्र म्हणून आपण सर्व मानव या पृथ्वीवर आलो असे मानतात. मनूला ‘पहिला पृथ्वीचा राजा’ असेही म्हटले जाते. भारतीय चक्राकार कालविचारानुसार सृष्टीच्या निर्मितीचे आणि विलयाचे चक्र निरंतर सुरू असल्याने, मनूपासून मानवसमाजाची निर्मिती पुन्हा पुन्हा होत राहते आणि म्हणूनच एका चक्राला ‘मन्वंतर’ म्हटले जाते.
 
या निर्मितीकथेच्या विरुद्ध कथा अब्राहमिक धर्मांत सांगितली जाते. आपल्या ‘मनू’ आणि ‘शतरूपा’ या जोडीसारखीच, ‘अ‍ॅडम’ आणि ‘इव्ह’ ही पहिली मानवांची जोडी तिथे कल्पिली आहे. यातील ‘अ‍ॅडम’ची निर्मिती, ईश्वराने विश्वनिर्मिती करताना सर्वांत शेवटी म्हणजे सहाव्या दिवशी केली. सहा दिवसांच्या निर्मिती प्रक्रियेत, ईश्वराने सहाव्या दिवशी क्रमाक्रमाने संपूर्ण सजीव सृष्टीची निर्मिती केली, ज्यात मानव सर्वांत शेवटी होता. ‘अ‍ॅडम’ची निर्मिती त्याने मृत्तिकेपासून ,स्वतःच्या प्रतिमेत केली आणि तिच्यात स्वतः प्राण फुंकले असे वर्णन ‘बायबल’मध्ये आहे. ‘अ‍ॅडम’ला जोडीदार हवी म्हणून, त्याच्याच शरीराच्या एका भागापासून त्याने ‘इव्ह’ची निर्मिती केली. ‘अ‍ॅडम’ आणि ‘इव्ह’ला त्यानंतर ईश्वराने संपूर्ण सृष्टीचे राज्य बहाल केले.
 

Man Place in Creation 
 
‘अ‍ॅडम’मध्ये प्राण फुंकण्याच्या कथेमुळे, मानव आणि अन्य सजीव सृष्टी यांच्यात आत्म्याचा वास असतो का? याविषयी भेद उत्पन्न होतो. अन्य प्राणीसृष्टीला मानवाच्या तुलनेत कनिष्ठ समजण्यात येते आणि मानवाचा त्यांच्यावर अधिकार असल्याचे मान्य केले जाते. स्त्री आणि पुरुष यांच्यातील तुलनात्मक स्थानाबद्दल मतभेद असले, तरी एका मतानुसार ‘इव्ह’ची निर्मिती ‘अ‍ॅडम’च्या एका अवयवापासून झालेली असल्याने, तिचे स्थान पुरुषाच्या बरोबरीचे असू शकत नाही. अब्राहमिक धर्मांच्या संकल्पनेनुसार, आत्मतत्त्वाचा आविष्कार फक्त मानवातच असतो. या आविष्कारामुळेच मानवाला मुक्त निर्णयाचा किंवा ‘फ्री विल’चा अधिकार प्राप्त होतो. हा मुक्त निर्णयाचा अधिकार, पाश्चात्य विचारातील खूप महत्त्वाची संकल्पना आहे. कारण, अनेक पाश्चात्य तत्त्वज्ञांनी या संकल्पनेचा वापर, मानवाचे अन्य सजीवांपासून वेगळेपण दर्शवण्यास किंवा मानवतेची व्याख्या करण्यास केलेला आहे. इथे हेही पाहायला हवे की, ही कल्पना मूलतः अब्राहमिक ईश्वर कल्पनेशी काहीशी विसंगत आहे.
 
अब्राहमिक ईश्वर हा एकाच वेळी सर्वत्र, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असतो. अशा ईश्वराच्या इच्छेविरुद्ध मानवास स्वेच्छेने काही करता येईल, हे अशक्य भासते आणि ख्रिस्ती आणि इस्लामी धर्मशास्त्रे, या प्रश्नाची विविध प्रकारे उकल करण्याचा प्रयत्न करतात. यातूनच त्यांच्या पाप-पुण्य, स्वर्ग-नरक आणि निवाड्याचा अंतिम दिवस या कल्पनांचा उगम होतो. इथे हेही लक्षात घ्यायला हवे की, अब्राहमिक धर्मांमध्ये शरीर आणि आत्मा यात भिन्नत्व मानले जात नाही. त्यामुळे सुखाच्या कल्पना, या इहलोकात आणि परलोकातही शरीर सुखाशी जोडलेल्या असतात.
 
याच बरोबरीने असा प्रश्न उद्भवतो की, मानवाव्यतिरिक्त सजीव सृष्टीतील अन्य प्राण्यांमध्ये आत्मतत्त्व जर नसेल, तर या सृष्टीचा मानवाशी संबंध काय? मानवाची निर्मिती ही ईश्वराने स्वतःच्या प्रतिमेने केली आहे आणि या स्वतःच्या निर्मितीस उपभोगता यावे, यासाठी त्याने त्यापूर्वी संपूर्ण विश्वाचे निर्माण केले होते. त्यामुळे या सृष्टीतील सर्व संसाधने, येथील वनस्पती आणि प्राणी अशी संपूर्ण सजीव सृष्टी, ही मानवाच्या उपभोगार्थ ईश्वराने निर्माण केली आहे असे तत्त्वज्ञान पाश्चात्य संस्कृती मांडते. जसा ईश्वर हा संपूर्ण विश्वाचा राजा आहे, तसा मानव हा पृथ्वीचा राजा असून हे राज्य त्याला प्रत्यक्ष ईश्वराने बहाल केलेले आहे, अशी त्यांची मान्यता आहे.
 
भारतीय मान्यता या सर्व संकल्पनेच्या पूर्ण विरोधात जाते. सर्वप्रथम हिंदू संकल्पनेनुसार चराचरात चैतन्यतत्त्वाचा वास असतो. त्यामुळे एका मूलभूत पातळीवर, सर्वसामान्य भारतीय व्यक्ती सृष्टीची कल्पना भोगदासीच्या स्वरूपात करत नाही. दुसरे म्हणजे ‘भारतीय पाप-पुण्य संकल्पना’ या निवाड्यासाठी ईश्वरावर अवलंबून नाहीत, तर कर्माच्या सिद्धांतानुसार प्रत्येकास त्याच्या कर्माचे फळ, एका निरंतर चक्रात मिळत राहते. याचाच एक भाग म्हणून, आपल्याला आपले गुणदोषयुक्त शरीर प्राप्त होत असते आणि शरीर आणि आत्मतत्त्व यामध्ये, हिंदू तत्त्वज्ञान भिन्नतेची कल्पना करते.
 
स्वाभाविकपणे मानवाचे रूप हे ईश्वराच्या प्रतिमेत असते, ही संकल्पना भारतीयांसाठी अतिशय विसंगत आहे. पहिले म्हणजे निर्गुण निराकार ईश्वराच्या प्रतिमेत, काही रूप असू शकत नाही आणि त्यामुळेच सगुण ईश्वराची कल्पना करतानाही हिंदू मन त्यातील आवश्यक गुणांचा विचार करून, त्याप्रकारचे अतिमानवी रूप किंवा प्रसंगी प्राणीरूप ईश्वराला बहाल करते. या सर्व कल्पनांचा परिपाक म्हणून, भारतीय संकल्पनेतील मानवाचे स्थान हे सृष्टीचक्रातील एक घटक अशा प्रकारचे आहे.
 
परंतु, मानव हा अन्य सजीवसृष्टीप्रमाणे नसून त्यावर एक अधिकची जबाबदारी भारतीय चिंतन देते, ती म्हणजे धर्माचे पालन. हिंदू संकल्पनेनुसार संपूर्ण सजीव प्राणीसृष्टी आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार प्रेरणांच्या प्रभावाखाली वागत राहते आणि तोच त्यांचा सामान्यधर्म असतो. परंतु, मानवासाठी मात्र इतके पुरेसे नसून, त्याला जी विचार करण्याची शक्ती प्रदान झाली आहे, तिच्या वापराने मानवधर्माचे पालन त्याच्याकडून अपेक्षित आहे. किंबहुना मानवी समाज व्यवस्थितपणे चालत राहावा, यासाठी ते आवश्यकच आहे.
 
मानवाविषयीच्या भारतीय आणि पाश्चात्य संकल्पनांची थोडक्यात तोंडओळख झाल्यावर, आता आपण त्यांच्यातील संकल्पनात्मक भिन्नत्व नेमके काय? आणि विज्ञानाच्या आकलनावर त्याचा परिणाम कसा होतो, हे समजून घेऊ शकतो. सर्वप्रथम म्हणजे मानव हा अन्य सृष्टीपेक्षा वेगळा कसा, हे पाहताना पाश्चात्य विचार हा नेहमी मानवश्रेष्ठत्व आणि त्यामुळे निसर्गाकडून आपल्या इच्छापूर्तीकरिता सतत ओरबाडत राहणे योग्य समजतो. याउलट हिंदू विचार हा मानव आणि अन्य सृष्टी यात अभिन्नत्व मानून, अवयव-अवयवी न्यायानुसार मानवाला सृष्टीचे एक अंग मानतो.
 
त्यामुळे संपूर्ण शरीराशिवाय एका अवयवाची कल्पना जशी करता येत नाही, तशी अन्य सृष्टीच्या अभावात केवळ मानवाची कल्पना करता येणार नाही, हे जाणून हिंदू विचार हा आपले सृष्टीच्या प्रतिचे कर्तव्य धर्मकर्तव्यात अंतर्भूत करतो. दुसरे म्हणजे चक्राकार कालसंकल्पनेमुळे, केवळ आजचा विचार भारतीय मानसिकतेत बसत नाही. कारण, आज केलेली पापे उद्या भोगावीच लागतील याची जाणीव असते. याउलट रेषीय क्रमविकासाच्या कालसंकल्पनेमुळे, उद्याचा विचार न करता आजच अमर्याद भोग घेण्याची प्रवृत्ती बळावते. त्यातून सर्व पापांचा पाढा थेट निवाड्याच्या दिवशी वाचायचा असल्याने आणि त्यातही, प्रभूच्या मनोभावे केलेल्या क्षमाप्रार्थनेने सूट मिळत असल्याने, दूरगामी परिणामांचा विचार न करण्याचा सामाजिक स्वभाव बनतो.
 
तंत्रज्ञानाच्या प्रगतीत या मानवकेंद्रित दृष्टिकोनाचा मोठा वाटा असल्याचे, थोडा खोलवर विचार केला तर जाणवत राहते. विशेषतः एकोणिसाव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर झालेली युरोपातील विज्ञानाची घोडदौड पाहता, प्रगतीची दिशा ही अधिकाधिक उपभोगाची आणि यंत्रावलंबित्वाची राहिलेली आहे. मोठमोठ्या कारखान्यांमधून यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने प्रचंड प्रमाणात उत्पादन आणि त्याकरिता मानवी श्रमासहित सर्व संसाधनांचे शोषण, हा या काळातील साधारण प्रवाह बनलेला होता.
 
जीवनाच्या या यांत्रिकीकरणाचे आणि त्याकरिता आवश्यक अशा संसाधनांच्या अमर्याद शोषणाचे, समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंचे जे चिंतन या काळात मांडले गेले त्याच्या मुळाशी सृष्टीतील मानवाचे स्थान याच संकल्पनेची चर्चा दिसते. आज जड विश्वाचे आपले आकलन जरी 100 वर्षे पुढे गेले असले, तरी चेतन विश्वाच्या आकलनाचे प्रतिमान बदललेले नाही. या प्रतिमानाची संस्कृतीसापेक्षता लक्षात घेऊन, भारताच्या प्राचीन चिंतनावर आधारित जड आणि चेतन विश्वाचे एकात्म प्रतिमान मांडणे, ही आजची गरज आहे. वैचारिक दास्यातून मुक्त होऊन, शाश्वत भविष्याकडे जाण्याचा हाच एक प्रशस्त मार्ग आहे.
 
 
 डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)