‘नॅशनल हेराल्ड’ घोटाळाप्रकरणात गांधी कुटुंबास धक्का

- सोनिया आणि राहुल गांधींविरोधात ‘ईडी’कडून दोषारोपपत्र दाखल

    16-Apr-2025
Total Views |
 
ED files chargesheet against Sonia and Rahul Gandhi In the National Herald scam case
 
नवी दिल्ली: ( ED files chargesheet against Sonia and Rahul Gandhi In the National Herald scam case )‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दोषारोपपत्र दाखल केले असून त्यामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावे आहेत. याप्रकरणी दि. 25 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
 
‘ईडी’ने ‘नॅशनल हेराल्ड’ घोटाळ्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या प्रमुख नेत्यांसह ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि अनेक कंपन्यांसह इतरांची नावे आहेत. हे प्रकरण दि. 25 एप्रिल रोजी दिल्ली राऊज अव्हेन्यू न्यायालयात युक्तिवादासाठी सूचिबद्ध करण्यात आले आहे.
 
‘मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002’च्या ‘कलम 44’ आणि ‘45’ अंतर्गत, ‘मनी लॉण्ड्रिंग’च्या गुन्ह्यासाठी, ‘कलम 3’, ‘कलम 70’ सह आणि ‘पीएमएलए, 2002’च्या ‘कलम 4’अंतर्गत दंडनीय, खटल्याची तक्रार दाखल केली आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगने यांनी सांगितले की, “ईडी’चे प्रतिनिधित्व करणार्‍या वकिलाच्या सादरीकरणानुसार, तक्रार प्रकरण क्रमांक 18/2019 अंतर्गत नोंदवलेल्या पूर्वनियोजित गुन्ह्यात ‘भारतीय दंड संहिता (आयपीसी), 1860’च्या ‘कलम 403’, ‘406’ आणि ‘420’अंतर्गत आरोप समाविष्ट आहेत आणि सध्या त्याची सुनावणी नवी दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात सुरू आहे.”
न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, ‘पीएमएलए’च्या ‘कलम 44(7)(क)’अंतर्गत, ‘पीएमएलए’च्या ‘कलम 3’अंतर्गत ‘मनी लॉण्ड्रिंग गुन्ह्याची दखल घेतलेल्या न्यायालयातच प्रेडिकेटेड गुन्ह्याचा खटला चालवला पाहिजे.
 
न्यायालयाने पुढे असे नमूद केले की दोन्ही गुन्हे - प्रेडिकेटेड गुन्ह्याचा आणि ‘पीएमएलए’ गुन्ह्याचा एकाच अधिकारक्षेत्रात निकाल दिला पाहिजे. दरम्यान, “नॅशनल हेराल्ड’च्या मालमत्तेची जप्ती हा राज्य पुरस्कृत गुन्हा आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर काहीजणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणे, हे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून सूडाचे राजकारण आहे,” अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे.
 
काय आहे ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण?
 
“नॅशनल हेराल्ड’ वृत्तपत्राची स्थापना 1938 मध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. त्याचे ‘प्रकाशन असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ म्हणजेच ‘एजेएल’तर्फे करण्यात येत असे.
 
2008 मध्ये आलेल्या आर्थिक संकटानंतर हे वृत्तपत्र बंद झाले आणि येथूनच हा वाद सुरू झाला. यानंतर, 2010 मध्ये ‘यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ (वायआयएल) नावाची कंपनी स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा 38-38 टक्के हिस्सा आहे.
 
या प्रकरणात, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये आरोप केला होता की, ‘वायआयएल’ने ‘एजेएल’च्या दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता फक्त 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतल्या आहेत. त्यामुळे हा फसवणूक आणि ‘मनी लॉण्ड्रिंग’चा प्रकार आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
 
राहुल गांधींचे मेहुणे रॉबर्ट वाड्रा यांची ‘ईडी’ चौकशी
 
काँग्रेस खा. प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना मंगळवार, दि. 15 एप्रिल रोजी दुसर्‍यांदा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले. हरियाणा जमीन घोटाळ्याशी संबंधित ‘मनी लॉण्ड्रिंग’ प्रकरणात चौकशीसाठी ‘ईडी’ने हे समन्स जारी केले होते. काँग्रेस खा. प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा मंगळवारी ‘ईडी’ कार्यालयात पोहोचले. हरियाणातील गुरुग्रामच्या शिकोपूर जमीन घोटाळ्यात त्यांची चौकशी झाली. जमीन व्यवहाराशी संबंधित ‘मनी लॉण्ड्रिंग’ प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘ईडी’ने त्यांना दुसरे समन्स पाठवले होते. दि. 8 एप्रिल रोजी पाठवलेल्या पहिल्या समन्समध्ये वाड्रा हजर राहिले नव्हते. वाड्रा यांच्यासोबत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा हेदेखील या प्रकरणात आरोपी आहेत. मुख्यमंत्री असताना वाड्रा यांच्या कंपनीसाठी नफा कमावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.