कैद्याचा कोठडीत मृत्यू झाल्यास वारसदारांना भरपाई

16 Apr 2025 13:41:28
 
Compensation to family member if prisoner dies in custody
 
मुंबई : ( Compensation to family member if prisoner dies in custody ) राज्यातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास, त्याच्या वारसांना ‘राष्ट्रीय मानव अधिकार आयोगा’च्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास मंगळवार, दि. 15 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
 
या धोरणानुसार कारागृहामध्ये काम करताना झालेल्या अपघातामुळे, वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे, कारागृह कर्मचार्‍यांच्या मारहाणीमुळे किंवा कैद्यांच्या आपापसांतील भांडणात मृत्यू झाल्यास आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाचा निष्काळजीपणा चौकशीतून सिद्ध झाल्यास, कैद्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.
 
तुरुंगवासातील आत्महत्येच्या प्रकरणात कैद्याच्या वारसांना एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये हे धोरण लागू राहणार आहे. कैद्याचा मृत्यू वार्धक्य, दीर्घ आजार, कारागृहातून पलायन करताना अपघातात, जामिनावर असताना किंवा उपचार नाकारल्याने झाला असल्यास कोणतीही भरपाई देण्यात येणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्यास मात्र शासनाच्या विद्यमान धोरणानुसार भरपाई मिळेल.
 
दोषी अधिकार्‍यांवर कारवाई
 
भरपाईसाठी संबंधित कारागृह अधीक्षकांनी प्राथमिक चौकशी, शवविच्छेदन, पंचनामा, वैद्यकीय अहवाल, न्यायालयीन व जिल्हाधिकार्‍यांचा तपास आदी कागदपत्रांसह अहवाल प्रादेशिक विभाग प्रमुखांकडे सादर करावा लागेल. यानंतर प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सादर केला जाईल. त्यांच्या शिफारसींच्यानंतर शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल आणि भरपाई दिली जाईल. मृत्युच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0