मुंबई : उबाठा गटाचे कागलचे माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, मालेगाव येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे यांच्यासह हजारों कार्यकर्त्यांनी मंगळवार, १५ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आ. सीमा हिरे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
उबाठा गटाचे कागलचे माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, मालेगाव येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे, श्रीरामपूरचे माजी नगराध्यक्ष संजय फंड, ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शिवाजी देशमुख, श्रीरामपूरचे काँग्रेस नेते आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास विहानी, आगरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक इंद्रजीत पडवळ, फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंग भोसले, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांच्यासह विविध पक्षांतील, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वात महाराष्ट्र विकसित बनवण्यात योगदान देण्यासाठी या सर्व मान्यवरांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर, ठाणे, नाशिक, सातारा, अहिल्यानगर या जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली आहे. मोठा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा समृद्ध अनुभव असलेली ही सर्व मंडळी पक्षाला निश्चित मजबुती देतील, असा विश्वास यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.