स्त्रीआरोग्याच्या नव्या दिशा

    15-Apr-2025
Total Views |
 
womens health
 
स्त्री शिक्षणाचा प्रचार झाला असला तरी तिच्या आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव आजही जाणवतो. शिक्षित असूनही अनेक स्त्रिया स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. नव्या युगात स्त्रियांच्या बदलत्या गरजांना ओळखून आरोग्याकडे पाहण्याची दिशा बदलणं ही काळाची गरज आहे.
 
मुलगी शिकली प्रगती झाली’ अशासारख्या घोषवाक्यांनी नव्या युगात आपण प्रवेश केला खरा, पण आजची स्त्री आरोग्यशिक्षित खरेच आहे का? असा प्रश्न नेहमीच पडतो. 46 वर्षांची शलाका दवाखान्यात आली, तेव्हा तिचा थाट बघण्यासारखाच होता. अत्यंत उच्चशिक्षित, चांगले राहणीमान आणि चेहर्‍यावरचा एक वेगळाच आत्मविश्वास! मूल होण्यासाठी बरीच वर्षे ती प्रयत्न करत होती. एका बँकेत उच्च अधिकारी पदावर काम करणार्‍या शलाकाला, आई होण्याची खूप आस निर्माण झाली होती.
 
शलाका म्हणाली, ’डॉक्टर, आमच्या दोघांचे वय मिळून जर 90 वर्षांपेक्षा जास्त झाले, तर आम्हाला मूल दत्तक घेता येणार नाही. ‘सरोगेट मदर’चा पर्याय निवडला, तर एकंदर 25 लाख खर्च येतोय. दत्तकच घ्यायचे असेल, तर आमच्याकडे फक्त एक वर्ष शिल्लक राहिले आहे डॉक्टर. आधुनिक तपासण्या आणि उपचार सुविधा यांचा जास्तीत जास्त फायदा का करून घेऊ नये?’ या तिच्या सगळ्या प्रश्नांवर माझ्याकडे खरे तर उत्तरे होती पण, मनातल्या मनात मला तिच्या स्वतःच्या आरोग्याविषयी खूप प्रश्न पडले होते.
 
1. तिच्या संप्रेरक असंतुलनाच्या स्थितीमध्ये रजोनिवृत्तीच्या जवळ जात असताना, तिला काही विशेष काळजी घेण्याची प्राधान्याने गरज होती.
 
2. या सगळ्या प्रक्रियांमधून जाताना, तिचे मानसिक व भावनिक आरोग्य जास्त जपण्याची गरज भासणारच होती.
 
3. तिचे घरातल्या इतरांशी नातेसंबंध यावर शांतपणे काम करण्याची गरज आहे, असे तिच्या बोलण्यातून जाणवत होते.
 
या सगळ्यापेक्षाही आताच्या आता काहीही करून मला मूल हवे, हा तिचा अट्टाहास तिला भविष्यात कदाचित त्रासदायक ठरणार होता. शिक्षणाने आरोग्यविषयी जागरूकता येतेच असे नाही, हे माझ्या लक्षात आले किंवा स्त्रिया स्वतःच्या आरोग्याला नेहमीच दुय्यम महत्त्व देतात.
 
जिच्या हाती पाळण्याची दोरी...
 
खरे तर स्त्रियांच्या आरोग्यावरच कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्य अवलंबून असते, ही वस्तुस्थिती विसरून चालणार नाही. स्त्रियांच्या भूमिका आणि जबाबदार्‍या समाजात सतत बदलत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला आणि कल्याणाला प्राधान्य देणे, अत्यंत आवश्यक आहे.
 
स्त्रीआयुष्याचे विविध टप्पे
 
तारुण्य, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती यांसारख्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर, महिलांना अनेक समस्या येतात. या समस्यांवर मात करण्यासाठी योग्य ज्ञान आणि जागरूकता आवश्यक आहे.
 
तारुण्य आणि प्रजनन संस्था आरोग्य
 
यौवनावस्थेत मुलींमध्ये होणार्‍या शारीरिक बदलांविषयी त्यांना शिक्षित करणे महत्त्वाचे आहे. मासिक पाळी, स्वच्छता आणि प्रजननसंस्था आरोग्य यांबद्दल, खुलेपणाने संवाद साधल्यास आत्मविश्वास वाढतो आणि गैरसमजही दूर होतात.
 
पुढील माहिती या युगात खूप आवश्यक
 
मासिक पाळी लांबवण्याच्या गोळ्या मनाने घेऊ नयेत.
 
मासिक पाळीच्या दिवसात खूप अधिक साहसी कामे करू नयेत.
 
बाह्य प्रजनन अंगांची स्वच्छता खूप महत्त्वाची असते. साबणाचा वापर करू नये.
 
नियमित जीवनशैली व तणावरहित आयुष्य, संयमित खाणे मासिक पाळी नियमित करण्यास मदत करते.
 
‘पीसीओडी’सारख्या आजारांचा त्रास असताना, वेळेतच तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावे.
 
केसातील बदल स्वाभाविक आहेत. त्यांवर रासायनिक प्रसाधनांचा मारा करू नये.
 
कर्करोगप्रतिबंधक लसीची माहिती करून घ्यावी.
 
युवावस्था व आव्हाने
 
लग्न करण्यापूर्वी उभयतांची आरोग्यकुंडली जुळणे महत्त्वाचे असते.
 
विवाहपूर्व समुपदेशन
 
रक्ताच्या प्राथमिक तपासण्या
 
तज्ज्ञांचा सल्ला या महत्त्वाच्या बाबींना विसरू नये.
 
कुटुंबनियोजन आणि गर्भधारणा
 
कुटुंबनियोजन हा महिलांच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. गर्भनिरोधक पद्धती, प्रजननक्षमता आणि गर्भधारणेची पूर्वतयारी याबद्दल माहिती असणेही आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान योग्य पोषण आणि काळजी घेणे आवश्यक असून, नियमित तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
 
गोळ्या घेऊन गर्भपात करण्याच्या आधीचा टप्पा, योग्य कुटुंबनियोजन साधनांची माहिती हा आहे.
 
गर्भधारणेपूर्वी उभयतः पतिपत्नींची बीजशुद्धी करून घ्यावी. आयुर्वेदतज्ज्ञांची यासाठी मदत घ्यावी.
 
गर्भधारणेपूर्वी स्त्रीचे आरोग्य खूप महत्त्वाचे असते. यामध्ये कंबर व नितंबाचा घेर प्रमाणात असणे, चरबीचे यथायोग्य प्रमाण असणे महत्त्वाचे ठरते.
 
योग्य आहार-विहार व नियमित जीवनशैली याला पर्याय नाही.
 
गर्भारपणात कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन याचा वापर जपून करावा.
 
गर्भारपणापूर्वी आणि गर्भारपणात, धूम्रपान आणि मद्यपान बाळाच्या विकासासाठी खूप हानिकारक आहे.
 
गर्भारपणातील ताणतणावही गर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी त्रासदायक ठरतात.
 
करिअर आणि प्रगतीच्या मागे धावताना, गर्भारपणाचे वय निघून जाऊ नये हे लक्षात ठेवावे. त्याचबरोबर गर्भारपणात व बाळंतपणात स्त्रीची घेतलेली काळजी, ही तिच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करत असते, हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.
 
गर्भस्राव व गर्भपात यांनंतरसुद्धा, बाळंतपणाइतकीच स्त्रीची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
क्षुल्लक वाटणार्‍या प्रजननसंस्थेसंबंधीच्या तक्रारींकडे, दुर्लक्ष करू नये.
 
रजोनिवृत्ती आणि त्यानंतर
 
रजोनिवृत्ती हा स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. या काळात होणारे शारीरिक आणि भावनिक बदल समजून घेणे आवश्यक आहे. हाडांचे आरोग्य, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी धोके यांबद्दलही माहिती घेणे आवश्यक आहे. पाळी सुरू होत असताना जशी आपण काळजी घेतो, तसेच पाळी बंद होत असतानासुद्धा आपल्याला आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी.
 
योग्य त्या तपासण्या
 
तज्ज्ञांचा सल्ला
 
आहार-विहाराची काळजी,या त्रिसूत्रीला पर्याय नाही. ज्याप्रमाणे आपण सप्लीमेंट्स घेतो, त्याचप्रमाणे काही वनौषधींचा उपयोगही लाभदायक ठरतो.
 
अंगातून वाफा येणे (येऊ नयेत यासाठी) यासाठी जेष्ठमध
 
पचन बिघडणे (बिघडू नये म्हणून) यासाठी सुंठ
 
अशक्तपणा (जावा म्हणून) यासाठी शतावरी, अश्वगंधा
 
अंगावरून जास्त जाण्याचे त्रास, यासाठी अडुळसा अशा अनेक वनौषधींना तज्ज्ञांमार्फत समजावून घेऊन, त्याचा वापर करण्यास हरकत नाही.
 
योगसाधना, वनौषधी व नैसर्गिक जीवनपद्धती ही तर नव्या युगाची नवी मागणी आहे.
 
स्त्रीविशिष्ट तपासण्यांना घाबरू नका
 
नियमित स्त्रीरोगतपासणी करणे खूप महत्त्वाचे आहे. ‘पॅप स्मीअर’, ‘मॅमोग्राम’ आणि ‘एचपीव्ही’ चाचण्यांसारख्या तपासण्यांमुळे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि इतर समस्यांचे लवकर निदान होऊ शकते. स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. चिंता, नैराश्य आणि भावनिक समस्यांसाठी समुपदेशन आणि मानसिक आरोग्यसेवा घेणे आवश्यक आहे.
 
काही महत्त्वाचे
 
स्त्रियांनी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळी आणि ताक यांचा समावेश असावा. जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे. नियमित योगसाधना केल्याने, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. तणाव कमी होतो आणि शरीर निरोगी राहते.
 
सक्षमीकरण आणि स्त्रियांचा परस्पर संवाद
 
महिलांच्या आरोग्यासाठी अचूक माहिती आणि शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. आरोग्यसेवा प्रदात्यांशी नियमित संवाद साधावा आणि आरोग्यविषयक कार्यशाळांमध्ये भाग घ्यावा. एकमेकांना आधार देण्यासाठी महिलांचे समुदाय तयार करणे आवश्यक आहे, ज्यामुळे स्त्रिया एकमेकांचे अनुभव आणि समस्या यांवर चर्चा करू शकतील. स्त्रियांचे आरोग्य हा एक जीवनभर चालणारा प्रवास आहे. योग्य ज्ञान, संतुलित जीवनशैली आणि सामाजिक प्रयत्नाने स्त्रिया सशक्त आणि निरोगी जीवन जगू शकतात. नव्या युगात स्त्री आरोग्याच्या नव्या दिशांचा, जुन्यानेच विचार करणे अपरिहार्य आहे.
 
 - डॉ. मधुरा कुलकर्णी
(लेखिका आरोग्य भारती अखिल भारतीय सुप्रजा आयाम प्रमुख आहेत.)