मुंबई : विकी कौशलचा छावा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास दोन महिने उलटले असतानाही, या चित्रपटाचं प्रभावी वर्चस्व अजूनही कायम आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटासमोर 'सिकंदर' आणि 'जाट'सारखे मोठे चित्रपट अपयशी ठरले असून, त्यानंतर आलेल्या 'गुड बॅड' सिनेमालाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र छावाचं हे घोडदौड कायम असताना, सिनेमात सूर्याची भूमिका साकारलेल्या अभिनेता आस्ताद काळेने या चित्रपटातील काही मुद्द्यांवर थेट सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
आस्तादने आपल्या पोस्टमध्ये काही दृश्यांवर आक्षेप घेत स्पष्ट लिहिलंय, ''औरंगजेबाचे वय आणि प्रकृती बघता, तो इतक्या वेगाने चालतोय? सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार नदीकाठी? असं कुठे होतं? आणि त्या परपुरुषासमोर पान लावतात आणि तो खातो? हे कसं चालेल?"
त्याच्या पुढील पोस्टमध्ये तर त्याने थेट सिनेमाची समीक्षा करत म्हटलंय, ''छावा ही एक वाईट फिल्म आहे. चित्रपट म्हणूनही ती अपुरी वाटते, आणि इतिहास म्हणून बघायला गेलं, तर अनेक गोष्टी खटकतात.'' इतकंच नाही तर, ''सोयराबाईंनी औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं? याचे ऐतिहासिक पुरावे कुठे आहेत?'' असा थेट सवालही त्याने उपस्थित केला आहे.
त्याच्या या वक्तव्यांवर आता प्रेक्षकांच्याही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहीजण त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत, तर काहीजण त्याच्यावर टीका करत ''दोन महिने कुठे होतास?'', अशी विचारणा करत आहेत.
दरम्यान, छावाची घौडदौड अजूनही सुरू असून, या चित्रपटाने आतापर्यंत फक्त हिंदी भाषेत ५८४ कोटींचा गल्ला जमवला आहे. ६०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ १६ कोटींची कमाई बाकी आहे. तर एकूण जागतिक कमाई ८०० कोटींच्या दिशेने झेप घेत आहे.
एका बाजूला सिनेमाचं यश, तर दुसऱ्या बाजूला कलाकाराकडूनच आलेली टीका त्यामुळे छावा चित्रपट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.