मुंबई (विशेष प्रतिनिधी) - चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाच्या मानवी हल्याच्या घटना थांबता थांबत नाही आहेत (chandrapur tiger attack). मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील रहिवासी मारुती बोरकर हे वाघाच्या हल्ल्यात ठार झाले (chandrapur tiger attack). जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात वाघाच्या हल्ल्यात चार लोकांचा मृत्यू झाला असून २०२४-२५ सालात मानव-वन्यजीव संघर्षात ६७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (chandrapur tiger attack)
ब्रम्हपूरी वन विभागातील तळोधी वनपरिक्षेत्रात गंगासागर हेटी येथे ६० वर्षीय मारुती बोरकर हे गावालगच्या जंगलात सकाळी सहा वाजता मोहफुले वेचण्यासाठी गेले होते. दररोज साडेआठ वाजेपर्यंत घरी परतणारे मारुती दहा वाजून गेले तरी घरी न आल्याने त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी त्यांना जंगलात चप्पल आणि टोपली पडल्याचे आढळले. काही अंतरावर त्यांना वाघाने ठार केलेला मारुती यांचा मृतदेह देखील आढळला. लागलीच याची माहिती वन विभागाला देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा पंचनामा केला.
मागील आठवड्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव आणि चिचखेडा येथे मोहफुले वेचायला गेलेल्या दोन व्यक्तींवर वाघाने हल्ला केला होते. तसेच सिंदेवाही येथे देखील अशाच प्रकारच्या हल्ल्यामुळे एक व्यक्ती ठार झाला होता. आता मंगळवारी नागभीड तालुक्यातील मारुती यांच्या मृत्यूमुळे आठवड्याभरात चंद्रपूरमध्ये चार जणांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला आहे. राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षामध्ये मृत्यूमुखी पडेलल्या व्यक्तींची गेल्या चार वर्षांतील आकडेवारी गंभीर आहे. २०२१ मध्ये ८४, २०२२ मध्ये १११, २०२३ साली ६४ आणि २०२४ साली ६७ लोकांना वन्यजीवांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे.