दुसरे वाचाळ विश्वप्रवक्ते

    15-Apr-2025
Total Views |
 
UBT arvind sawant
 
मातोश्रीच्या अंगणात जागा मिळावी, म्हणून उबाठा गटाचे पदाधिकारी तोंडाची निष्फळ वाफ दवडण्याची एकही संधी सोडत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या नजरेत हिरो ठरण्यासाठी आटापिटा करणारे हे लोक, जनतेच्या नजरेत मात्र झिरो ठरत आहेत हे का बरं त्यांच्या लक्षात येत नसेल? नाशिकमध्ये भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या खा. अरविंद सावंत यांनी, भाजप आणि महायुतीवर आरोप करण्याच्या नावाखाली मुक्ताफळे उधळली.
 
त्यामुळे संजय राऊत यांचा विश्वप्रवक्ते पदाचा किताब आपल्या नावापुढे अरविंद सावंत लावतात की काय, अशी शंकेची पाल नाशिककरांच्या मनामध्ये चुकचुकली नसेल तरच नवल. “पहिल्यांदा मोदी साहेब नतमस्तक होऊन सभागृहात आले तेव्हा वाटले लोकशाहीचा सन्मान होईल, सार्वजनिक कार्यक्रमांना प्रोत्साहन द्या, असे मी सांगितले. एक रेल्वे अपघात झाला, तर लालबहादूर शास्त्री यांनी पदाचा राजीनामा दिला. मात्र, इथेतर रेल्वेचे एवढे अपघात झाले, संविधान खरच खतरे में हैं, ‘वक्फ’चा कायदा, इथे नफेखोरांचे राज्य सेवेचे नाही, मुंबईतली बिल्डिंग कोसळली तरीही चर्चा नाही, प्रयागराजच्या कुंभमेळ्यात भाविक मृत्युमुखी पडले त्याचे काय झाले? आम्हांला तर 30 चाच आकडा सांगितला, सभागृहात चर्चा करू दिली नाही, ‘जीएसटी’ला कोणी विरोध केला, आधार कार्डला विरोध,” यांसारखे एक ना अनेक आरोप, सावंत यांनी नाशकात केले.
 
हे आरोप करताना संसदेत ‘वक्फ सुधारणा विधेयका’ला विरोध करणारे सावंत मियाँ हे साळसूदपणे विसरतात की, त्यांचे सहकारी अनंत गीते पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते. तर स्वतः मियाँ सावंतांनीदेखील केंद्रात मंत्रिपद उपभोगले.
 
यादरम्यान राज्यातही तत्कालीन शिवसेनेने सत्तेचा मेवा खाल्ला. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनाविरोधी निर्णय घेतले असे एकवेळ गृहीत धरले, तर खा. अरविंद सावंत आणि त्यांचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीसुद्धा या निर्णयाला संमतीच होती, असे म्हणावे लागेल. दुसर्‍या विश्वप्रवक्ते पदाच्या भानगडीत न पडता दक्षिण मुंबईच्या मतदारांनी ज्या विश्वासाने निवडून दिले, त्याला तडा जाऊ न देता मतदारांसाठी काम करा सावंतजी...राज्यात आधीच एक विश्वप्रवक्ते आहेत, तेवढचे पुरे झाले. त्यांनीच पक्षाची वाट लावली, आता तुम्ही उरलीसुरली घालवू नका म्हणजे झाले...
 
गेले हिरे कुणीकडे...
 
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता मिळवल्यानंतर, उबाठा गटाचे उपनेते अद्वय हिरे मालेगावमध्ये आता ‘सबकुछ हिरे’ अशा अविर्भावात वावरू लागले. उबाठा गटात प्रवेश केल्यानंतर लगोलग विधानसभेत बाजी मारून आमदार झाल्याचे स्वप्नही, हिरे यांनी अनेक वेळा पाहिले असेल. पण, रेणुका देवी सहकारी सूत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी, त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली.
 
तुरुंगातून सुटून आल्यानंतर अद्वय बाबांनी, विधानसभेचा हट्ट धरला. उद्धव ठाकरे यांनीही पडत्या फळाची आज्ञा मानत, निष्ठावंत बंडूकाका बच्छाव यांना डावलत हिरे यांच्या पदरात उमेदवारी टाकली. पण, बंडूकाका बच्छावदेखील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले. त्यांनी अपक्ष उमेदवारी करत, अद्वय हिरे यांना तिसर्‍या स्थानावर लोटले.
 
त्यात बाजार समितीची मिळालेली सत्ता बंडूकाका बच्छाव यांच्यामुळे मिळाली, हे साळसुदपणे विसरलेल्या हिरे यांना धोबीपछाड देत, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सत्ता पुन्हा मिळवली. भुसे यांचा फटका इतका मोठा होता की, सबंध मालेगाव तालुक्यातून अद्वय हिरे आणि उबाठा गटच गारद झाला. सलग पाचव्यांदा निवडून आलेल्या दादा भुसे यांची गाडी मात्र सुसाट आहे. तर अद्वय हिरे यांचा संपूर्ण नाशिक जिल्ह्यातच थांगपत्ता लागत नाही.
 
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हिरे यांनी, आता आपण कार्यकर्त्यांसाठी काम करणार असल्याचे जाहीर केले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी परिश्रम घेऊ, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने आपल्याला काही फरक पडत नाही, अशी मुक्ताफळे अद्वय हिरे यांनी उधळली. पण, बाजार समितीची सत्ता हातातून गेल्यापासून अद्वय हिरे असे काही गायब झाले आहे की, दिवसाढवळ्या टॉर्च घेऊन त्यांना शोधण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. अद्वय हिरे यांचे पिताश्री प्रशांत हिरेदेखील एकदा निवडणूक पार पडली की, मतदारसंघातून गायब व्हायचे ते पुढील निवडणुकीलाच अवतरायचे. मग मतदारांनीच असा काही धक्का दिला की, हिरे घराण्याचे संस्थानच खालसा केले. आता अद्वय गायब झाल्याने, गेले हिरे कुणीकडे अशी म्हणण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे.
 
 
- विराम गांगुर्डे