मुंबई : गेले काही दिवस जोरदार आपटीमुळे गुंतवणुकदारांचे लाखो कोटी पाण्यात जाण्याचा सिलसिला मंगळवारी खंडीत झाला. भारतीय शेअर बाजाराने १५७८ अंशांची जोरदार मुसंडी मारत ७६ हजारांचा टप्पा ओलांडला. भारतीय शेअर बाजाराची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार ट्रम्प टॅरिफच्या झटक्यातून सावरत, मोठी झेप घेणारा भारतीय शेअर बाजार हा पहिलाच बाजार ठरला आहे. यामागे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला वाढीव आयातशुल्कातून दिलेली ९० दिवसांची सवलत हे मुख्य कारण ठरले आहे. निफ्टीमध्येही ५०० अंशांची वाढ झाली.
मंगळवारी या वाढीत खासगी बँकांचे शेअर्स जोरदार चमकले. त्यांच्याबरोबरीने धातू उत्पादक कंपन्या, आयटी क्षेत्रातील कंपन्या आणि त्याचबरोबर पायाभूत क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्यांचे शेअर्स जोरदार वाढले. खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक या बँकांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ ही बँकांच्या शेअर्समध्ये झालेल्या एकूण वाढीतील ५० टक्के होती. यामध्ये इंडसइंड बँकेचे शेअर्स सर्वात जास्त वाढले.
अमेरिकेकडून अनपेक्षितरित्या वाढीव आयातशुल्क आकारणीला देण्यात आलेली स्थगिती याचे बाजाराकडून स्वागत करण्यात आले आहे. यामुळे भांडवल निर्मितीला प्रोत्साहन मिळत असून त्यामुळेच बँकांचे शेअर्स जोरदार वाढले आहेत. ही अशीच वाढ काही दिवस सुरुच राहिली तर भारतीय उद्योग क्षेत्र रुळावर येईल असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.