मुंबई : सिद्धीविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर या युवकाची हत्या घडली तेव्हा आरोपी सिद्धेश शिरसाट उबाठा गटातच होता. वैभव नाईक यांच्याबरोबर आरोपीचे कितीतरी फोटो आहेत, असा पलटवार आमदार निलेश राणे यांनी मंगळवार, १५ एप्रिल रोजी केला.
कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर या युवकाच्या हत्या प्रकरणाने सध्या राज्यभरात वातावरण तापले आहे. दरम्यान, उबाठा गटाचे नेते वैभव नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे आरोपी सिद्धेश शिरसाटसोबत असलेले फोटो पोस्ट करत सिद्धेशचा आका कोण असा सवाल केला आहे.
त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. निलेश राणे म्हणाले की, "वैभव नाईक जिल्ह्याचे नाव खराब करण्याच्या प्रयत्नात आहेत. दोन वर्षांपूर्वी हे हत्या प्रकरण घडले त्यावेळी आरोपी सिद्धेश शिरसाट उबाठा गटातच होता. त्यामुळे बॉडी कुठे आहे हे वैभव नाईकांनीच सांगितले पाहिजे. तुमच्या आश्रयाखाली असलेल्या माणसाचे तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत. मला शिवसेनेत येऊन आठ महिने झाले. त्यावेळी मी भाजपमध्ये होतो. त्यामुळे आरोप करताना लोकांना विनोद वाटू नये याचा विचार करून वैभव नाईकांनी बोलायला हवे. पण काहीही विचार न करता बोलत राहणे हेच त्यांचे काम आहे."
वैभव नाईकांकडून जिल्ह्याची बदनामी
"वैभव नाईक यांना या प्रकरणातही राजकारण दिसते. त्यांनी आजपर्यंत हेच केले. जिथे डोक्याचा विषय येतो तिथे त्यांचा विषय संपतो. उद्या सिंधुदुर्गात गाडीखाली कुत्रा जरी मेला तरी त्यात राणेंना कसे जोडता येईल या प्रयत्नात वैभव नाईक नेहमी असतात. लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्याची सेवा आम्हीच करणार आहोत. पुढची २५ वर्षे तरी तुम्हाला लोकप्रतिनिधी बनण्याची संधी नाही. त्यामुळे तुम्ही नवीन नवीन आरोप शोधत बसता. परंतू, आम्हाला काहीही फरक पडत नाही. फक्त जिल्ह्याचे नाव खराब होता कामा नये, याची काळजी घ्या. आमच्यावर कितीही टीका करा. पण एकनाथ शिंदे साहेबांना यात खेचू नका. आम्ही आमच्या नेत्यांचा अपमान सहन करणार नाही. तुम्ही दहा वर्षे जिल्ह्याचे वाटोळे केले. आता जिल्ह्याला चांगले दिवस आल्यावर तुम्हाला बदनाम करण्याचे काम करायचे आहे," अशी टीकाही निलेश राणे यांनी केली. तसेच दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तर बोलणार असल्याचेही ते म्हणाले.