टॅरिफ युध्दाचा फायदा करुन घेण्यासाठी भारताची योजना तयार

निर्यातक्षम १० क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करणार

    15-Apr-2025
Total Views |
tariff
 
 
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून आयातशुल्क लादण्याच्या निर्णयास ९० दिवसांची स्थगिती देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या स्थगितीचा फायदा उठवत भारताने आपली निर्यात वाढवण्यासाठी एक महत्वाची योजना आखली आहे. भारत सरकारकडून अशी महत्वाची दहा क्षेत्रे निवडण्यात आली आहेत, या दहा महत्वाच्या क्षेत्रांमध्ये कापड उद्योग आणि तसेच इतर सौंदर्य प्रसाधने, रसायने, औषधे, प्लॅस्टिक आणि रबर, रेल्वे वगळता इतर वाहने इ. क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. चीन वर लादण्यात आलेल्या आयातशुल्काचा फायदा उठवण्यासाठी भारत सरकारचा हा अॅक्शन प्लॅन आहे.
 
अमेरिकेकडून भारतासह इतर देशांवर लादलेल्या वाढीव आयातशुल्कास स्थगिती देण्यात आलेली असली तरी चीनवरचे आयातशुल्क वाढवून १४५ टक्क्यांवर नेले आहे. सध्या भारतावर फक्त १० टक्के आयातशुल्काचा भार आहे. निती आयोगाकडून याबाबत प्रसिध्द करण्यात आलेल्या अभ्यासानुसार जागतिक बाजारातील या स्थितीमुळे भारताला अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. कापड आणि इतर सौंदर्य प्रसाधने यांच्या बाबतीत बोलायचे तर अमेरिकेच्या या क्षेत्रातील एकूण आयातीत चीनचा वाटा हा २५ टक्क्यांचा आहे तर भारताचा वाटा ३.८ टक्के इतका आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे बोलायचे तर अमेरिकेच्या या क्षेत्रातील एकूण आयातीत चीनचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे, त्याउलट भारताचा वाटा हा ७ टक्के आहे. अशीच परिस्थिती दागिने आणि रत्ने व्यापारातही आहे. यावरुन भारताला या सर्वच क्षेत्रांमध्ये व्यापार विस्तारासाठी भारताला वाव तयार झाला आहे.
 
अमेरिका आणि भारत यांचे व्यापारी संबंध अधिकाधिक दृढ होत चालले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातही याच गोष्टीला अधोरेखित करत २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सवर नेण्याची योजना झाली होती. आताही या लादलेल्या आयातशुल्काच्या परिस्थितीतही भारताला अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारत अमेरिका द्विपक्षीय करार होण्याची शक्यता आहे. हा करार जुलैमध्ये अस्तित्वात येऊ शकतो असे संकेत केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.