ड्रोन माझा मित्र

    15-Apr-2025
Total Views |

Drones now human companion
 
रोबोटिक्स या क्षेत्राचा विस्तार आणि विकास सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याच्याच मदतीने अनेक नवीन ड्रोनही विकसित होत आहेत. त्यांचा वापर कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये केला जात आहे. यावरून अनेक मतमतांतरे असली, तरीही ड्रोन आता मानवी जीवनात त्याचा सहकारी मित्र म्हणून येऊ पाहत आहे...
 
वृत्तपत्रे अगदी वरवर वाचणार्‍या किंवा टीव्हीवरील बातम्यांकडे नजर टाकणार्‍या व्यक्तींपैकी, बहुतेकांना ‘ड्रोन’ हा शब्द गेल्या वर्षात नक्कीच माहीत झाला असेल. अमेरिकेने पाकिस्तान व अफगाणिस्तानात केलेल्या ड्रोन-हल्ल्यांमुळे याबाबतच्या चर्चेला जरा वेग आला, अन्यथा ड्रोनचा वापर अगदी दुसर्‍या महायुद्धापासून चालू आहे! त्याचे तंत्र आता खूपच प्रगत झाल्याने, त्याचा प्रभाव आणि वापर वाढला आहे एवढेच. ड्रोन म्हणजे वैमानिक नसतानाही उडणारे विमान. त्याचे नियंत्रण विमानातीलच संगणकाद्वारे किंवा दूरवरून केले जाते. अनेक आकार-प्रकारांचे ड्रोन असतात व त्यांच्यावर सोपवलेल्या कामगिर्‍याही, तितक्याच वैविध्यपूर्ण असतात. सगळेच ड्रोन हल्ला करण्यासाठी वापरले जात नाहीत. सैन्याला रसद पोहोचवणे, उड्डाणादरम्यान विमानांना इंधन पुरवठा करणे या कामांबरोबरच मोठी आग विझवणे, दुर्गम प्रदेशातील पाईपलाईन्स किंवा विजेच्या तारांवर नजर ठेवणे, मानवाच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या वातावरणात जाऊन माहिती मिळवणे, चेहरा ओळखणार्‍या ‘फेशिअल रेकग्निशन’ या संगणकीय तंत्राने, विशिष्ट व्यक्तीला मदत पुरवणे किंवा अगदी तिचा काटा काढणेही! यांसारख्या बाबीदेखील ड्रोनकडून करवून घेता येतात.
 
आजच्या आपल्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आहे. फक्त दहा ते 20 वर्षांपूर्वी कोणाच्या स्वप्नातही आले नसेल, अशी कामे आता संगणकीय तसेच स्मार्टफोनमधील विविध ‘अ‍ॅप्स’द्वारे आपण सहजपणे करतो. हे इतके सरावाचे झाले आहे की, यामध्ये काही विशेष आहे असे देखील वाटत नाही. ड्रोनचाही आपल्या काही नित्य व्यवहारांना स्पर्श होणार आहे, हे वाचून काहींना आश्चर्य वाटेल. परंतु, अशी यंत्रे प्रायोगिक स्वरूपात तयार झाली असून, त्यामध्ये मानवी गरजांनुसार सुधारणाही केल्या जात आहेत. कसे ते पुढे वाचूच. परंतु, त्याआधी आपण ‘रोबोटिक्स’ या अभियांत्रिकी शाखेबाबत थोडी माहिती घेऊ.
 
‘रोबो’ (ठेलेीं) उर्फ यंत्रमानव आणि ‘रोबोटिक्स’ हे शब्द समरूप भासले, तरी त्यामधील यंत्रणा आणि त्यांच्या कार्यपद्धतींमध्ये बर्‍यापैकी फरक आहे. यंत्रमानव हा थोडाफार मानवासारखा दिसतो (आणि त्याचे ‘सायबोर्ग’ व ‘अ‍ॅन्ड्रॉईड’ हे भाऊदेखील) तर रोबोटिक्समध्ये, मुख्यतः कारखान्यातील विविध उत्पादनांवर अतिशय अचूकतेने आणि वेगाने प्रक्रिया करणार्‍या यांत्रिक हात आणि तत्सम यंत्रणांचा समावेश असतो. तांत्रिक प्रगतीचा सध्याचा वेग लक्षात घेता, हे हात लहान आकाराचे होत असून, त्यांची तांत्रिक क्षमता वाढत चालली आहे. तसेच, या वाढत्या क्षमतांचा वापर बदलत्या आकारात करून घेणेही शक्य झाले आहे. तर ‘ड्रोन’ आणि ‘रोबोटिक्स’ या दोन तंत्रशाखांच्या संयोगातून, ‘क्वाडकॉप्टर’ प्रकारचे ‘ड्रोनमित्र’ तयार केले गेले आहेत. त्यांनी चक्क एका नृत्याच्या कार्यक्रमात, मानवी कलाकारांसोबत भाग घेतला.
 
न्यूयॉर्कमधील ‘फॉकोर सिस्टिम्स’ या रोबोटिक्स कंपनीने हा ‘ड्रोनमित्र’ तयार केला आहे. नृत्यामध्ये सहकारी होण्याबरोबरच, हा खेळाडू आणि अ‍ॅथलेट्सबरोबर उडू शकतो आणि त्यांच्या खेळाचे अगदी जवळून आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता चित्रण करू शकतो. हा ड्रोनमित्र लवकरच आपल्या दैनंदिन कामांत मदत करू लागेल, असा विश्वास संबंधित संशोधक आणि कंपनीने व्यक्त केला. त्याची ही क्षमता सिद्ध करण्यासाठीच, त्याला नृत्यातील सहकारी केले गेले आहे. ‘बार्किन सेलिसन’ नामक या प्रकल्पामार्फत, नृत्यासारख्या पारंपरिक कलाविष्कारांना नवतंत्रज्ञानाची जोड देण्याचे प्रयोग केले जातात.
 
आपल्यासमोरील नृत्यांगनेच्या हालचाली समजून घेऊन त्यानुसार तिला योग्य प्रतिसाद देता यावा, यासाठी या ड्रोनमध्ये ‘ओपन सीव्ही इमेज डिटेक्शन’ तंत्रज्ञान बसवले आहे. ड्रोनच्या हालचाली घडवून आणण्याचे काम, सायमन फ्राझर विद्यापीठातील संशोधकांनी बनवलेल्या ‘आरड्रोन ऑटोनॉमी’ या सॉफ्टवेअरमार्फत केले जाते. फॉकोर सिस्टिम्सने या दोन तंत्रावलींचा संयोग (इंटरफेस) घडवला आहे. रोबोमधील ‘ओएस’चा वापर करून, ओपन सीव्ही तर्फे नृत्यांगनेच्या हालचाली टिपून त्यांचे त्वरित विश्लेषण केले जाते आणि त्यानुसार प्रतिसाद देण्याचे काम, ‘आरड्रोन ऑटोनॉमी’कडून या ‘ओएस’द्वारे घडवून आणले जाते.
 
ड्रोन्सचा अशा रितीने वापर करण्याचा प्रयत्न करणारी, ‘फॉकोर’ ही एकच कंपनी नाही. ऑस्ट्रेलियातील रॉयल मेलबर्न तंत्रसंस्थेने, अ‍ॅथलेट्ससाठी धावता साथी बनवला आहे. त्याचा वापर खेळाडूंच्या हालचालींचे जवळून चित्रण व विश्लेषण करण्यासाठी केला जातो. ‘ऑल्वेज इंप्रूव्हिंग’ या कंपनीनेदेखील, याच कामासाठी एक छोटे स्वनियंत्रित क्वाडकॉप्टर बनवले आहे. त्याची किंमत 50 डॉलरपेक्षाही कमी आहे.
 
मानव आणि यंत्र यांचे संबंध कसे आहेत आणि कसे असावे, यावर पूर्वीपासून चर्चा सुरू आहे. ड्रोनमित्राच्या निमित्ताने तिला पुन्हा उधाण येईलच. उदा. काही जणांना नृत्यातील जोडीदार ड्रोन असण्याची संकल्पनाच पटलेली नाही. ड्रोनला भावना नसल्यामुळे, तो त्या समोरील मानवी नृत्यांगनेशी मनाने तद्रुप होऊ शकत नाही, शकणार नाही, असे त्यांना वाटते आणि ते खरेही आहे. परंतु, यामागील खरा मुद्दा असा की, आपण कोणावर प्रेम करू शकतो? रोबोवर? अन्य पशुपक्ष्यांवर? की भावना असलेल्या व समजून घेणार्‍या कोणावरही? हाच प्रश्न उलटा करायचा झाला तर असे विचारता येईल की, आपल्याला रोबो आवडत असेल तर त्याला भावभावना असल्याच पाहिजेत काय? जिज्ञासूंनी ‘आय रोबो’ हा चित्रपट पाहावा!
 
 - डॉ. दीपक शिकारपूर
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)