ठाणे: ( Dr. Ashutosh Javadekar on Dr. Narendra Pathak book launched ) शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ! असा संदेश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. मात्र, आज समाज दुभंगला असुन संघर्षच (एजिटेट) करीत आहे. याला कारणीभूत आजची शिक्षणपद्धती आहे, तेव्हा ज्ञान देणाऱ्या शिक्षकापेक्षा 'जाण' देणारा गुरु हवा. असे मौलिक सल्ला सुप्रसिद्ध साहित्यिक, वक्ते, गायक दंतवैद्यक डॉ.आशुतोष जावडेकर यांनी दिला.
सृजनसंवाद प्रकाशन प्रकाशित ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक लिखित 'वानोळा' या ललित लेखसंग्रहाचे व 'काही निवडक' या शिक्षण व साहित्य क्षेत्रावर भाष्य करणार्या वैचारीक लेखसंग्रहाचे आणि २४ व्या चैत्रेय - वासंतिक अंकाचे प्रकाशन सोमवारी (दि.१४ एप्रिल) कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडले. त्यावेळी डॉ. जावडेकर बोलत होते. याप्रसंगी, व्यासपीठावर राष्ट्रीय पुस्तक न्यास, दिल्लीचे अध्यक्ष प्रा. मिलींद मराठे, सुप्रसिद्ध कवी, ज्येष्ठ पत्रकार दुर्गेश सोनार, डॉ.अमोल भानुशाली, सृजनसंवादचे गीतेश शिंदे उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून सोहळ्याचा प्रारंभ केला.
प्रमुख वक्ते डॉ. आशुतोष जावडेकर यांनी, "ज्ञान देणे सोपे असते पण, जाण देणे अवघड असते. शिक्षण क्षेत्राला मोठा व्यापक भारतीय संदर्भ आहे. भारतीय संस्कृतीत शिक्षक नसतो तर गुरू असतो. शिक्षक केवळ ज्ञान देतात, जे आजकाल चॅट - जीपीटी आणि गुगलमधुन देखील मिळते. पारंपरिक भारतीय शिक्षण व्यवस्थेत जाण देण्यास प्राधान्य होते. ब्रिटीश आल्यानंतर मेकॉले शिक्षण व्यवस्थेत केवळ ज्ञानाला महत्व दिले गेल्याने त्यातील जाण हरवून गेल्याचे वास्तव मांडुन, ज्ञानासोबत जाण देणाऱ्या शिक्षकांची आज गरज आहे.
असे स्पष्ट करीत जावडेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूलमंत्राचा दाखला दिला. प्रा. मिलींद मराठे यांनी, "साहित्य चळवळ वाचकांनी टिकवली आहे. लिहिले जाते ते साहित्य नव्हे तर, जे वाचले जाते ते साहित्य आहे, किंबहुना स्वान्त सुखायच्या पलीकडे सामान्य वाचकांचा विचार करून निर्माण होणाऱ्या साहित्याला पसंती मिळते. असे स्पष्ट करून नविन शैक्षणिक धोरणात केवळ पुस्तकी ज्ञान न देता कौशल्य शिकवल्यास विद्यार्थ्याना रोजगार मिळवणे सुलभ होईल.
असे सांगितले. तर, कवी दुर्गेश सोनार यांनी प्रा. डॉ. पाठक, प्रतिभासंगम आणि चैत्रेय वासंतिकासोबतचा प्रवास उलगडुन यात सहप्रवासी होण्याचे भाग्य लाभल्याचे नमुद केले.पुस्तकांचे लेखक प्रा.डॉ. पाठक यांनी मनोगत व्यक्त करताना, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण त्या अभिजात भाषेपर्यंत आपण कितपत पोहचतो. याचा विचार व्हायला हवा.असे नमुद केले.
या प्रकाशन सोहळ्याला मा. नगरसेवक संदीप लेले , प्रदेश प्रवक्ते सुजय पतकी, ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष उत्तम जोशी, ज्येष्ठ कवी प्रा. प्रवीण दवणे, लेखिका अनुपमा उजगरे, डॉ. संजय जोशी, साधना जोशी, सुजाता राऊत, दुरदर्शनचे निवृत्त अधिकारी नितीन केळकर, चित्रकार विजयराज बोधनकर, दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा.वा. दाते, सीए संजीव ब्रम्हे, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव गायकवाड, अरविंद जोशी, युवा कवी आदित्य दवणे, शिवानी गोखले तसेच साहित्य भारतीचे पदाधिकारी व मावळी मंडळ शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.चैत्रेय वासंतिक वार्षिकांकाच्या व्यवस्थापिका दया पाठक आणि डॉ. अश्विनीकुमार परांजपे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तर कार्यक्रमाचे प्रास्तविक, सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मकरंद मुळे यांनी केले.